लेख  : पाकिस्तानातील पश्तून स्वायत्तता चळवळ

84

>> ब्रिगेडियर हेमंत महाजन  

खलिस्तानी दहशतवाद्यांना पाकिस्तानच पैसा पुरवत असतो. तेव्हा आपणही पाकिस्तानातील स्वतंत्र चळवळींना अप्रत्यक्ष मदत पुरवून त्यांचे महत्त्व का वाढवत नाही? म्हणजे जी कारवाई पाकिस्तान आज कश्मीरमध्ये करतो आहे किंवा हिंदुस्थानच्या इतर भागात करतो आहे तशाच प्रकारची कारवाई जशास तसे उत्तर देऊन आपण बलुचिस्तान, खैबर पख्तुनवा आणि सिंधमध्ये का करत नाही? पाकिस्तानला कळले पाहिजे की ते कश्मीरमध्ये ज्याप्रकारे फुटीरतावाद्यांना, दहशतवाद्यांना प्रोत्साहन देतात तशाच प्रकारच्या कारवाया  हिंदुस्थान पाकिस्तानात करू शकतो. पाकिस्तानमधील विविध स्वतंत्रता चळवळींना मदत करायला हवी. ही मदत आर्थिक आणि नैतिक स्वरूपाची आणि मानव अधिकार जपणारी असावी.

पाकिस्तानातील पश्तून समाजाने पुन्हा एकदा आंदोलन सुरू केले आहे. पाकिस्तानातील राष्ट्रविरोधी भावनेला खतपाणी मिळण्यास  हिंदुस्थान व अफगाणिस्तान जबाबदार आहे असेच पाकिस्तान वाटते. पश्तुनी जनतेचा प्रश्न हा पाकिस्ताननेच निर्माण केला आहे. एक राष्ट्र म्हणून पाकिस्तान तेथील जनतेवर इस्लामी संस्कृती आणि उर्दू भाषा लादली जाते. त्या देशातील विविध समूहांची स्वतंत्र ओळख, प्रादेशिकता आणि भाषेची पाकिस्तानने कधीही फिकीर केली नाही.

राजकीय हक्क मिळवण्यासाठी वा भाषिक ओळख जपण्याचा आग्रह हा तिथे राष्ट्रविरोधी आणि म्हणूनच वादग्रस्त समजला जातो. मात्र पश्तून चळवळ आजवर कुठल्याही विदेशी शक्तींच्या आर्थिक व अन्य पाठिंब्याशिवाय यशस्वी झाली आहे. पाकिस्तानच्या विविध भागांत मोठय़ा संख्येने निघत असलेले मोर्चे पश्तूनबहूल आदिवासी भागात जबरदस्तीने उभारण्यात आलेले चेकपोस्ट काढून टाका, तेथील जमिनीत जागोजाग पेरण्यात आलेले भू-सुरुंग निकामी करा, बेपत्ता पश्तुनी कार्यकर्त्यांना शोधा व त्यांची सुटका करा, पाकिस्तानी लष्कराने गेल्या अनेक वर्षांपासून केलेल्या अटका व दमनसत्राची न्यायालयीन चौकशी करा, अशा मागण्या करत आहेत. ‘पीटीएम’च्या या मागण्या न्याय्य व स्पष्ट आहेत. मात्र पाकिस्तान सरकारने त्या देशद्रोही ठरवल्या आहेत. पश्तून आदिवासी प्रांतात बरंच काही करण्याची गरज आहे हे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान व पाक लष्कराने मान्य केले आहे.

2018 मधल्या जानेवारीमध्ये कराची येथे पश्तुनच्या कार्यकर्त्यांची हत्या झाली आणि आंदोलन पेटले. पाकिस्तानी लष्कराने नकीबुल्लाह मेहसूद याची हत्या केली. मेहसूद राहात असलेल्या दक्षिण वझिरीस्तानात मोर्चे आणि निदर्शने सुरू झाली. हे लोण काही दिवसांतच संपूर्ण पश्तून प्रांत व नंतर देशभरात पसरले. पेशावर, लाहोर, कराची, क्वेट्टा, स्वात, डेरा इस्माइल, बन्नू आणि राजधानी इस्लामाबादेत मोठमोठय़ा सभा झाल्या. पाक सरकार व लष्करी दडपशाहीखाली पिसल्या गेलेल्या बलुच आणि हाजरा या अल्पसंख्य समाजाचे लोकही पीटीएमच्या आंदोलनात सहभागी झाले. अफगाणिस्तान व पाकिस्तानच्या सीमेलगत पसरलेल्या पश्तून प्रांतातील पश्तुनींची स्वतंत्र पश्तुनीस्तानची मागणी जुनी आहे. पीटीएमच्या आंदोलनाच्या यशामुळं पाकमध्ये फुटिरतावादी चळवळ जोर धरेल, अशी भीती पाकिस्तान सरकारला आहे. तसे झाल्यास इतर प्रांतही आपल्या मागण्यासाठी लढण्याची शक्यता आहे.

पीटीएमचे आंदोलन आजवर नेहमीच अहिंसक राहिले आहे. देशात अराजक माजवणे वा देशाची फाळणी करणं हे या आंदोलनाचं ध्येय नाही. लोकशाहीच्या चौकटीत राहून आपल्या घटनात्मक हक्कांची मागणी ते करीत आहेत. पश्तून चळवळीचे सर्वोच्च नेते मंजूर पश्तीन हे लोकशाही मूल्यांवर विश्वास ठेवणारे नेते आहेत. पश्तुनी जनतेच्या समस्यांवर राज्यघटनेच्या चौकटीतच उपाय शोधायला हवा, असं त्यांचं ठाम मत आहे. मात्र, पाकिस्तानी लष्करावर ते जाहीर टीका करताना दिसतात. पश्तुनींची ही चळवळ शक्य त्या मार्गाने चिरडून टाकण्याचा प्रयत्न भविष्यातही पाक लष्कराकडून होणार आहे. न्याय्य मागण्यांसाठी निदर्शनं करणार्‍या नागरिकांना सरळसरळ राष्ट्रविरोधी ठरवण्यापर्यंत लष्कराची मजल गेली आहे. पण त्यापुढं जाऊन लष्कराकडून पीटीएमला दहशतवादी ठरवले जाण्याची शक्यता आहे.

पाकिस्तानमधील इतर राज्यातील कुठलीही राजकीय संस्था स्वायतत्ता मागते, आमच्यावर अन्याय करू नका, आर्थिक प्रगती झाली पाहिजे असे म्हणते, तेव्हा त्यांच्यावर मोठय़ा प्रमाणात अत्याचार केला जातो. पाकिस्तान तिथल्या पंजाब प्रांतावर सर्वात जास्त पैसा खर्च करतो आणि उर्वरित बलुचिस्तान, खैबर पख्तुनवा यांच्यावरती आर्थिकदृष्टय़ा अन्याय केला जातो. अशा प्रकारचा आर्थिक अन्याय 1971 सालामध्ये शेख मुजीबुर रहमान यांचा पक्ष अवामी लीग आणि त्या वेळच्या पूर्व पाकिस्तानवर केला गेला होता. ज्यामुळे पूर्व पाकिस्तानचे रूपांतर 1971 च्या लढाईनंतर बांगलादेशात झाले.

अशाच प्रकारे पाकिस्तानमधून काही प्रांत वेगळे होऊ शकतात का?

बलुचिस्तान चळवळ जोरात सुरू आहे. तिथे हिंसाचारही मोठय़ा प्रमाणावर सुरू आहे. खैबर पख्तुनवा चळवळीला अफगाणिस्तानातून बर्‍यापैकी मदत मिळते आहे.  जिओ सिंध ह्या चळवळीत आंदोलने सुरू आहेत, पण हिंसाचार होत नाही. अशा परिस्थितीत  हिंदुस्थानची भूमिका काय असावी.  हिंदुस्थानचे याबाबतीतील धोरण स्वच्छ आणि स्पष्ट असले पाहिजे. जोपर्यंत पाकिस्तान कश्मीरमधील दहशतवादाला विविध प्रकारे मदत करून खतपाणी घालतो तशाच पद्धतीने पाकिस्तानातील बलुचिस्तान आणि खैबर पश्तुनवा येथील  संस्थांना मानसिक, आर्थिक मदत का करू नये. या लोकांवर पाकिस्तानी सैन्य अत्याचार करते आहे. पाकिस्तानी सैन्याचे अत्याचार आपण आंतरराष्ट्रीय पातळीवर का पोहोचवत नाही? आंतरराष्ट्रीय पातळीवर अमेरिका आणि युरोपचे प्रबोधन करून या चळवळीला महत्त्व का प्राप्त करून देत नाही?.

खलिस्तानी दहशतवाद्यांना पाकिस्तानच पैसा पुरवत असतो. तेव्हा आपणही पाकिस्तानातील स्वतंत्र चळवळींना अप्रत्यक्ष मदत पुरवून त्यांचे महत्त्व का वाढवत नाही? म्हणजे जी कारवाई पाकिस्तान आज कश्मीरमध्ये करतो आहे किंवा  हिंदुस्थानच्या इतर भागात करतो आहे तशाच प्रकारची कारवाई जशास तसे उत्तर देऊन आपण बलुचिस्तान, खैबर पख्तुनवा आणि सिंधमध्ये का करत नाही. पाकिस्तानी सैन्य आणि गुप्तहेर संस्था आयएसआय यांना कळले पाहिजे की ते कश्मीरमध्ये ज्याप्रकारे फुटीरतावाद्यांना, दहशतवाद्यांना प्रोत्साहन देतात तशाच प्रकारच्या कारवाया  हिंदुस्थान पाकिस्तानात करू शकतो. पाकिस्तानी लष्कर आणि आयएसआय यांना किंमत चुकवावी लागत नाही तोपर्यंत  हिंदुस्थानमध्ये पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद थांबणे कठीण आहे. पाकिस्तानमधील विविध स्वतंत्रता चळवळींना आपण मदत करायला हवी. ही मदत आर्थिक आणि नैतिक स्वरूपाची आणि मानव अधिकार जपणारी असावी. सशस्त्र मदत न करता, दहशतवादी कृत्याला पाठिंबा नसेल, पण नैतिक पाठिंबा देऊन या चळवळींना प्रोत्साहन देऊ शकतो.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या