मुद्दा : वाढीव पेन्शन आणि काही अनुत्तरित प्रश्न!

4

>>पुरुषोत्तम कृ. आठलेकर<<

सर्वोच्च न्यायालयाने 1995 योजनेअंतर्गत असलेल्या पेन्शनधारकांना दिलासा देणारा निर्णय दिला. या निर्णयानुसार सध्या मिळत असलेल्या तुटपुंज्या पेन्शनमध्ये पाचपट वाढ होणार आहे असे सुचविले आहे. या पेन्शनसंदर्भात आजवर अनेक चर्चा झाल्या. वर्तमानपत्रांतून बातम्या. इतकेच नव्हे तर न्यायालयातसुद्धा याचिका दाखल करण्यात आल्या.  लोकसभेत ठराव मांडून त्यावर एकमत घेऊन श्रम मंत्रालयाकडे तसा प्रस्तावसुद्धा पाठविला, परंतु आजतागायत EPFO कार्यालयाकडून कोणताही खुलासा अथवा रीतसर योग्य माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे काही प्रश्न हे अनुत्तरितच राहिले आहेत. त्यामुळे सर्वांमध्ये गैरसमज आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर दर्शविलेला वाढीव पेन्शनचा तक्ता आणि त्यानुसार पडलेला प्रश्न खालीलप्रमाणे. त्याचा खुलासा होणे गरजेचे आहे.

1) या योजनेत 50 वर्षांचासुद्धा पर्याय होता, ज्यांनी तो स्वीकारला त्यांना वाढीव पेन्शन मिळणार काय?

2) वाढीव पेन्शनसाठी पीएफ खात्यात रक्कम कधीपासून आणि किती भरायची?

3) या रकमेवर व्याज किती टक्के आणि कधीपासून आकारले जाणार?

4) अनेक कारखाने बंद झाले, काही स्थलांतरित झाले तर काही दुसऱ्या कंपनीत विलीन झाले. अशा पेन्शनधारकांचा प्रश्न कोण सोडवणार?

5) वाढीव पेन्शनची थकबाकी मिळणार काय? आणि ती कधीपासून मिळणार?

6) ही योजना मालक, कामगार व केंद्र शासन यांच्या सहभागातून राबवली जात असताना आज जवळपास 40 ते 45 हजार कोटी रुपये  Unclaimed  Amount सरकारी तिजोरीत पडून आहेत. त्या रकमेचे काय?

7) किमान 1000 रुपये पेन्शन ही वाढसुद्धा अजून सर्वांना का मिळाली नाही?

8) वाढीव पेन्शनमध्ये सरसकट एकरकमी सर्वांना सारखे पेन्शन देण्यात काय हरकत आहे?

9) पेन्शनचा क्लिष्ट कारभार आणि EPFO कार्यालयातील इन्फ्रास्ट्रक्चर पाहता वाढीव पेन्शन तर सोडा, निदान त्याबद्दलची योग्य माहिती व खुलासा तप्तरतेने मिळेल काय ?

यासारखे अनेक प्रश्न पेन्शनधारकांच्या मनात आहेत. अनेक वर्षे मिळणारे पेन्शन तुटपंजे वाढणार म्हणून सर्वांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत, पण वस्तुस्थिती आणि रक्कम भरून वाढीव पेन्शन म्हणजे ‘भीक नको, कुत्रा आवर’ अशीच परिस्थिती झाली आहे. तेव्हा वाढीव पेन्शन जोपर्यंत आपल्या बँक खात्यात जमा होत नाही, तोपर्यंत ते दिवास्वप्नच ठरणार आहे.