मंत्रसामर्थ्य


>> डॉ. तुषार सावडावकर

आपले स्त्रोत्र, मंत्र हे ध्वनिलहरींतून प्रगटतात त्यांच्या शब्दस्वरशक्तीने अनेक विकार बरे होण्यास मदत होते.

वेदपठण, स्त्रोत्रं, श्लोक, ऋचा, आर्या हा आपल्या हिंदुस्थानी संस्कृतीचा आत्मा. सामवेदातील सुरांमधून ही स्त्रोत्रं आपल्यासमोर प्रकटतात. यातील ध्वनीलहरी अत्यंत सामर्थ्यवान असतात. यामुळे अनेक विकार बरे होण्यास मदत होते.

रामरक्षा स्त्रोत्र पठणाने अद्भुत अशी कंपने निर्माण होतात त्यामुळे त्याच्या शरीरावर अत्यंत सकारात्मक प्रभाव पडतो विशेषतः पोटावर. ‘र’ या अक्षराच्या उच्चाराने संप्रेरकाचे स्रवण व्हायाला लागते ज्या संप्रेरकाचा थेट संबंध पोटाशी असतो.‘र’ या अक्षराच्या उच्चाराने नाळेमार्फत इपिनेफ्रीन नावाचे संप्रेरक स्रवते व या संप्रेरकाने गर्भाची प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. रामरक्षेत ‘र’ या अक्षराची सुंदर गुंफण आहे. रामरक्षेत अशाच अक्षरांची रचना करण्यात आली आहे. ज्याच्या उच्चाराने इपिनेफ्रीनची निर्मिती योग्य प्रमाणात होते. केवळ गर्भासाठी नाही तर जन्मभर जर एखाद्या व्यक्तीने रामरक्षा पठण कायम ठेवले तर रोगप्रतिकारशक्ती मोठ्या प्रमाणात वाढते व रोगापासून बचाव होऊ शकतो.

‘सायमॅटिक्स’ ही उपचारपद्धती शरीराच्या विविध भागातील रोगग्रस्त पेशींना बरे करण्याकरिता विविध वारंवारितेचे तरंग निर्माण करणारी यंत्रे वापरतात. ऑप्लिकेटरने किंवा पेन्सिलच्या आकाराच्या, शरीरावर चिकटकून ठेवता येण्याजोग्या ‘सायमॅटिक प्रोब्स’च्या माध्यमातून शरीराच्या विशिष्ट रोगग्रस्त भागात या विशेष ध्वनीलहरी सोडल्या जातात. सायमॅटिक्स उपचार सुमारे 900 तरंगांमधून, रोगानुसार व पेशींनुसार, विशिष्ट तरंगांची निवड करतो व नेमक्या त्याच ध्वनीलहरी शरीराच्या रोगग्रस्त भागात सोडतो. रोगानुसार या लहरींचा वापर अर्धा ते एक तास केला जातो. सुरुवातीस साधारणपणे आठवड्यातून दोनदा व पुढे पुढे आठवड्यातून एकदा अशा पद्धतीने हे उपचार केले जातात.

ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगंधि पुष्टिवर्धनम् ।

उर्वारुकमिव बंधनान्मृत्योर्मुक्षीयमामृतात् ।।

एखाद्या रुग्णावर महामृत्यूंजय या मंत्राचा वापर केल्यास त्याला त्याचा बराच फायदा होतो. पण हा मंत्र नीट उच्चारांसह बोलल्यास त्याचा फायदा होतो. ध्वनीवर अनेक संशोधन चालू आहेत. ज्या मातेच्या स्तनातून दूध येत नाही ते विशिष्ट ध्वनी परिणामामुळे येऊ शकते असे पाश्चात्य देशांत सिद्ध झालेले आहे. ज्या रोपटय़ांना संगीत ऐकवले असता त्यांच्यामधील वाढ ही जोमाने होते. जे रोपटे सहा महिन्यात फूल देते ते ध्वनी परिणामी दोन महिन्यात देऊ शकते.

उपयुक्त थेरपी

आज ब्रिटन, अमेरिका, कॅनडा, जपान व ऑस्ट्रेलिया, तसेच अन्य युरोपीयन देशात ‘सायमॅटिक्स’ उपचार केंद्रे मोठ़या प्रमाणात आहेत व ती लोकप्रियही आहेत. या थेरपीमुळे शरीरातील वेदना व सूज कमी होण्यास मदत होते व त्यामुळे साहजिकच हालचालींत सहजता येते. म्हणूनच विविध प्रकारचे सांध्यांचे विकार, संधीवात, पाठदुखी, शल्यक्रियेनंतर एखादा भाग आखडणे, नीट न भरून येणारे अस्थिभंग, खेळांमुळे होणाऱ्या दुखापती, स्नायूंचे विकार इत्यादींवर ही उपचारपद्धती बऱ्यापैकी परिणाम साधते असे या शास्त्राचे अभ्यासक म्हणतात. आधुनिक विज्ञानामध्ये ध्वनीलहरींचा वापर उपचारपद्धती म्हणून केला ज़ातो.