प्रासंगिक : उपक्रमशील अध्यापिकेचा गौरव

1
दुबई येथे झालेल्या ग्लोबल एज्युकेशन स्कील फोरममध्ये आमंत्रित करण्यात आलेल्या ग्लोबल टीचर ऍवॉर्ड (मराठी) विजेत्या अनुजा प्रकाश चव्हाण यांना माजी प्रसिद्ध क्रिकेटपटू ब्रायन लारा यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.

>> स्नेहा चव्हाण

‘डॉ. आनंदीबाई गोपाळ जोशी’ या चित्रपटातलं हे गाणं मनात रुंजी घालत असतं. आजही या वाटांवरून चालत असताना महिलांना अनेक अडचणी, अडथळे यांना सामोरे जावे लागते. अशा या वाटेवर चालत असताना मला त्या भेटल्या. त्यांच्या वाटेतही अनेक आव्हानांचे काटे होते. अनुजा चव्हाण यांना भेटले तेव्हा या कर्तृत्वाचा प्रत्यय मला आला.

कुठल्याही शाळेत न गेलेल्या त्यांच्या आईबाबांनी मात्र अनुजाला शाळेत घालून शिकवायचे हे स्वप्न बघितले आणि प्रत्यक्षातही आणले. भावंडांबरोबर त्याही शाळेत जाऊ लागल्या. शाळेत शिक्षण घेत असताना त्यांची हीच भावंडं त्यांची दिशादर्शक ठरली, तर शाळेचा चेहराही न बघितलेल्या आईबाबांनी जगाच्या शाळेतले संस्कार आणि रीतिरिवाज यांची उत्तम शिकवण आणि शिदोरी त्यांना दिली. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून डी.एड. ते पीएच.डी.चा (चालू आहे) प्रवास खरोखरच वाखाणनीय आहे.

1989 पासून 2019 पर्यंत जवळजवळ 30 वर्षांचा हा कालावधी. व्रतस्थ राहून अनुजा चव्हाण अध्ययन, अध्यापन करीत आहेत. मात्र एकाच एक पठडीतला शिक्षक होऊन अध्यापन न करता एक पिढी घडविण्यासाठी त्यांच्यातला कलावंत त्यांनी जोपासला आहे. नवनवीन उपक्रमांची कास धरणार्‍या विद्यार्थ्यांना केवळ शिकवण्यापेक्षा त्यांना शिकतं करण्यासाठी, शिक्षण प्रवाहात टिकून राहण्यासाठी त्या सतत प्रयत्नशील असतात. याचा अनुभव मला आला तो जेव्हा मी त्यांच्या शिकवणीतून घडलेल्या अनेक विद्यार्थ्यांची मनोगतं ऐकली. त्यामधील खासकरून उल्लेख करावासा वाटतो तो रिझवान व समीरचा. रिझवान परिस्थितीचा बळी जाणार होता तर समीर हुशार असूनही दहावीनंतर शिक्षण थांबेल की काय या चिंतेने हताश झालेला. अशा अनेक मुलांना अनुजा यांनी योग्य दिशा दाखविली.

समाजसेवेचे मूळ हे त्यांच्या तनामनात असं घट्ट रुजलेलं आहे. त्यांच्या कृतीतून त्यांच्या सामाजिक कार्याचा झरा वाहताना दिसतो. कुठे गरीब, गरजू विद्यार्थ्यांना अर्थसहाय्य मिळवून दे, तर कुठे आदिवासी पाडय़ात जाऊन त्या मुलाच्या पालकांच्या गरजा समजावून घे, कुठे आश्रमशाळेसाठी मदत कर, तर कुठे कॅन्सर रुग्णांसाठी उत्तम समुपदेशक बनून त्यांना जगण्याचं बळ दे असे कितीतरी उपक्रम त्यांचे चालू असतात. अध्यापन क्षेत्रात काम करत असताना त्यांच्या शिक्षणविषयक जाणिवा समृद्ध होत गेल्या व हळूहळू बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण क्षेत्रात त्या उपक्रमशील आणि विद्यार्थीप्रिय शिक्षिका म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या.

याची दखल केवळ समाजानेच नाही, तर महाराष्ठ^ शासनानेसुद्धा घेतली. आदर्श शिक्षिका महापौर पुरस्कार (2009-10), डॉ. राधाकृष्णन बेस्ट टीचर मेमोरियल ऍवॉर्ड (2016-17), राज्य आदर्श  शिक्षक पुरस्कार (2018-19) अशा अनेक पुरस्कारांची शृंखला ही त्यांच्या यशाची साक्ष देत आहेत. त्यांच्यातल्या प्रतिभेचा बहर, बुद्धिवाद, नवनवोन्मेषशालिनी कला यामुळे महाराष्ट्र राज्य पाठय़पुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ पुणे, एस.एस.सी. बोर्ड पुणे, एन.सी.ई.आर.टी. पुणे, महाराष्ट्र मुक्त विद्यालय सांस्कृतिक स्रोत एवं प्रशिक्षण केंद्र सीसीआरटी, नवी दिल्ली (हिंदुस्थान सरकार), शिक्षणाची वारी अशा अनेक ठिकाणी लेखिका, सदस्य, छायाचित्रकार, संवाददाता, तज्ञ प्रशिक्षक अशा अनेक भूमिका यशस्वीपणे पार पाडल्या. केवळ महाराष्ट्र व देशपातळीवरच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावर (Teaching professional Olympiad) हिंदुस्थानातून National Topperच्या त्या मानकरी ठरल्या. GESF म्हणजे Global Education Skill Forumमध्ये दुबई येथे त्यांना आमंत्रित करण्यात आले. आंतरराष्ट्रीय स्तरावर वार्के फाऊंडेशन आयेजित “Global Teacher Award” मराठी विषयाच्या विजेत्या म्हणून अनुजा प्रकाश चव्हाण यांचा माजी क्रिकेटपटू ब्रायन लारा यांच्या हस्ते दुबई येथे गुणगौरव करण्यात आला.

त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला पैलू पाडण्यात शिक्षण क्षेत्रात झोकून काम करणार्‍या मुख्याध्यापिका डॉ. सुहासिनी वैद्य यांचेही योगदान आहे. त्यांच्याशिवाय डॉ. कल्पना चित्रे, डॉ. जीवबा केळूसकर, श्रीमती खरे, श्रीमती ममता राव, श्रीमती तेरे यांसारखे अधिकारी त्यांचे प्रेरणादाते झाले, पण याहून श्रेष्ठ व्यक्तिमत्त्व म्हणजे त्यांचे सदगुरू

वाटा वाटा वाटा गं… चालीन तितक्या वाटा गं…

अजूनही कित्येक वाटा त्यांना साद घालीत आहेत.

 लेखिका करीअर समुपदेशक आहेत