पुणे-नाशिक रेल्वे

>> राजा गायकवाड

पुणे-नाशिक रेल्वेमार्गाचा सर्वंकष प्रकल्प आराखडा (डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट-डीपीआर) गेल्या एक वर्षापासून अंतिम मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. पुणे-नाशिक या बहुप्रतीक्षित रेल्वेमार्गाचा डीपीआर मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने २०१७ मध्ये रेल्वे बोर्डाला सादर केला आहे. याचा अभ्यास करून रेल्वे बोर्डाकडून त्यास मान्यता मिळणार होती. मात्र एक वर्ष उलटूनही रेल्वे बोर्डाकडून अद्याप कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. लालूप्रसाद यादव रेल्वेमंत्री असताना सर्वप्रथम या लोहमार्गाच्या सर्वेक्षणाचा विषय रेल्वे अंदाजपत्रकात आला. या प्रकल्पासाठी सर्वेक्षण करून अहवाल देण्यात आला होता. तब्बल तीनवेळा या मार्गाचे सर्वेक्षण करण्यात आले. अखेर आता पुणे विभागाने अंतिम डीपीआर तयार करून रेल्वे बोर्डाला पाठवला आहे. दरम्यान, राज्यातील विविध रेल्वेमार्ग तसेच इतर रेल्वे प्रकल्प वेगाने पूर्ण व्हावेत यासाठी महाराष्ट्र शासन आणि रेल्वे बोर्डाने संयुक्तरीत्या महाराष्ट्र रेल इफ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट लिमिटेड (एमआरआयडीएल) या कंपनीची स्थापना करण्यात आली आहे. या कंपनीच्या माध्यमातून महाराष्ट्र शासन आणि रेल्वे बोर्ड ५०-५० टक्के खर्चाची जबाबदारी घेऊन हा प्रकल्प पूर्ण करणार आहे. तळेगाव, राजगुरू नगर, चाकण, सिन्नरमार्गे नाशिक अशा प्रकारे या मार्गाची निश्चिती करण्यात आली आहे. हा मार्ग एकून २६५ किलोमीटरचा आहे. जमिनीचा खर्च धरून या मार्गाला एकूण ५ हजार ३४१ कोटी एवढा खर्च अपेक्षित आहे.