शुद्ध पेयजलाचे आव्हान

2

>> डॉ. दत्ता देशकर

जगात पाण्याचे संकट दिवसेंदिवस गंभीर होत आहे. त्यातही शुद्ध पेयजल समाजातील सर्व घटकांना मिळणे हे एक मोठे आव्हान म्हणून सध्या सर्वच देशांसमोर उभे आहे. यंदाच्या जागतिक जल दिनाची संकल्पना (थीम) म्हणूनच ‘कोणालाही मागे सोडू नका’ म्हणजेच शुद्ध पेयजलापासून कोणीही वंचित राहू नये अशा अर्थाची आहे. आपल्या देशात तर शुद्ध पेयजलाचे आव्हान खूपच मोठे आणि जटील आहे. ते पेलण्यासाठी ‘भगीरथ’ प्रयत्न करणे आवश्यक आहे.

यंदाच्या जागतिक जल दिनाची थीम ‘कोणालाही मागे सोडू नका’ अशी आहे. त्याचा नेमका अर्थ काय, हे खालील माहितीवरून समजू शकेल.

 • आजही जगातील 2 दशलक्ष लोक शुद्ध पेयजलापासून वंचित आहेत.
 • चारपैकी एका शाळेत शुद्ध पेयजल उपलब्ध नाही.
 • दररोज पाच वर्षांखालील 700 बालके अशुद्ध जलसेवनामुळे दगावतात.
 • 80 टक्के ग्रामीण जनता शुद्ध पेयजलापासून वंचित आहे.
 • 10 घरांपैकी 8 घरांतील महिला आणि मुली पाणी मिळवण्यासाठी झगडतात.
 • 68 दशलक्ष लोक पाण्याच्या अनुपलब्धतेमुळे स्थलांतरित झाले आहेत.
 • 159 दशलक्ष लोक उघडय़ा तळ्यातील किंवा ओढय़ांतील पाणी पितात.
 • जगातील दोन तृतीयांश लोकांना पाण्याची तूट जाणवते
 • 2030 पर्यंत 700 दशलक्ष लोकांना पाण्यासाठी स्थलांतर करावे लागेल.

एखादी महत्त्वाची घटना समाजाच्या लक्षात राहावी म्हणून विशिष्ट दिवस पाळण्याची प्रथा समाजात आहे. महिला दिन, योग दिन, पर्यावरण दिन, अभियंता दिन अशी अनेक उदाहरणे देता येतील. पाणी प्रश्नही आता ऐरणीवर आला असून या प्रश्नाचे महत्त्व समाजाच्या मनावर बिंबवण्यासाठी दरवर्षी यूएनओ जागतिक जल दिन साजरा करते. 1993 पासून सर्व जग 22 मार्च हा जागतिक जल दिन म्हणून पाळत आहे.

आपल्या देशात तर याही आधीपासून जल दिन पाळण्यास सुरुवात झाली होती. देशाला ही प्रेरणा कोणी दिली माहीत आहे तुम्हाला ? ती दिली जागतिक ख्यातीचे जलतज्ञ आणि स्टॉकहोम पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले डॉ. माधवराव चितळे यांनी. जगालाही प्रेरणा देणारे तेच. 1992 साली ब्राझीलमधील रियो-डी-जानेरो येथे घेतल्या गेलेल्या युनायटेड नेशन्स कॉन्फरन्स ऑन एन्व्हायर्नमेंट ऍण्ड डेव्हलपमेंट या परिषदेत यासंबंधात ठराव संमत करण्यात आला आणि युनायटेड नेशन्स जनरल असेंब्लीने डिसेंबर 1992 मध्ये 22 मार्च हा जागतिक जल दिन पाळला जावा हा ठराव संमत केला. 1993 पासून दरवर्षी या दिवशी हा दिन साजरा केला जातो.

हा दिवस साजरा करण्याचा उद्देश काय हाही सामान्य माणसाला प्रश्न पडू शकतो. जगात पाण्याच्या संबंधात जे विविध प्रश्न आहेत त्यांची जाणीव समाजाला व्हावी आणि ते सोडविण्याच्या दृष्टीने त्याला प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने हा दिवस पाळला जातो. पाण्याचे दुर्भिक्ष, जलप्रदूषण, पाण्याचे समन्यायी वितरण, पाणी हा माणसाचा मूलभूत हक्क आहे याची जाणीव निर्माण होणे, सामाजिक आरोग्य आणि पाणी, हवामानात होणारे बदल आणि पाणी यांच्याबद्दल समाजात विचारमंथन व्हावे व या समस्यांवर उत्तर शोधून काढण्याचा प्रयत्न व्हावा या उद्देशाने हा दिवस पाळणे महत्त्वाचे समजले जाते. निव्वळ याच दिवशी हे केले जावे असे नसून वर्षभर हा विचार पेटत राहावा यासाठी हा दिवस सुरुवात समजला जावा हीही अपेक्षा केली जाते.
पाणी प्रश्नाच्या कोणत्या पैलूवर या वर्षी समाजाचे लक्ष केंद्रित केले जावे याचा विचार करून यासंबंधात यूएनओतर्फे एक थीम प्रसारित केली जाते. याचा उद्देश असा की, संपूर्ण जगाने वर्षभर एकाच ध्येयाने प्रेरित होऊन तो प्रश्न धसाला लावण्यासाठी प्रयत्न करावा. या वर्षी जी थीम दिली गेली आहे ती ‘कोणालाही मागे सोडू नका’ अशी दिली गेली आहे.

गेल्या काही वर्षांत जागतिक जल दिनाच्या संकल्पना (थीम्स) पुढीलप्रमाणे आहेत –
‘2014 -ः पाणी आणि वीज निर्मिती’, ‘2015 -ः पाणी आणि शाश्वत विकास’, ‘2016 -ः पाणी आणि रोजगार’, ‘2017 -ः पाणी कशाला वाया घालविता?’, ‘2018 -ः निसर्ग आणि पाणी, ‘2019 -ः कोणालाही मागे सोडू नका.’

जगात पेयजलाचा प्रश्न खूपच गंभीर बनला आहे याची जाणीव यंदाच्या जल दिनासाठी निवडलेल्या थीमवरून सहज होते. शुद्ध पेयजलापासून समाजातील कोणालाही आपल्याला मागे सोडायचे नाही असाच या वर्षीच्या जागतिक जल दिनाच्या संकल्पाचा (थीम) अर्थ आहे. आजही अगणित लोक शुद्ध पेयजलापासून वंचित आहेत. त्यात प्रामुख्याने स्त्रिया, बालके, शरणार्थी, दिव्यांग आणि सापत्नभावामुळे वंचित हा वर्ग भरडला जातो. हा सर्व दुर्लक्षित वर्ग इतर वर्गाच्या पातळीवर आणून त्याला शुद्ध पेयजल कसे उपलब्ध करून देता येईल यावर आपल्याला आपले लक्ष केंद्रित करायला हवे. शुद्ध पेयजलाचे हे आव्हान पेलण्यासाठी ‘भगीरथ’ प्रयत्न करणे गरजेचे आहे.

शुद्ध पेयजल संकल्पना
कोणत्याही प्रदूषित घटकांपासून मुक्त आणि जेव्हा हवे तेव्हा शुद्ध पेयजल मिळावे ही अपेक्षा करणे स्वाभाविक आहे. तुम्ही कोणीही असा, कुठेही असा, शुद्ध पेयजल मिळणे हा तुमचा जन्मसिद्ध हक्क आहे. असे झाल्याशिवाय शाश्वत विकास हे मृगजळच ठरेल. यूएनओने प्रत्येकाला शुद्ध पेयजल मिळणे हा त्याचा मानवी हक्क आहे ही गोष्ट जगाच्या 2010 साली निदर्शनाला आणून दिली आहे. कोणताही भेदभाव न होता, प्रत्येकाला पुरेसे, सुरक्षित, मान्य होण्यासारखे, परवडण्यासारखे, सहज प्राप्य असे पाणी पिण्यासाठी, व्यक्तिगत स्वच्छतेसाठी, कपडे धुण्यासाठी, अन्न शिजवण्यासाठी आणि आरोग्यासाठी मिळायलाच हवे असा याचा अर्थ होतो.

एवढे स्पष्ट धोरण घोषित करूनसुद्धा लोक मागे का राहतात, हा प्रश्नही महत्त्वाचा ठरतो. लिंग, धर्म, जात, भाषा, राष्ट्रीयत्व, अपंगत्व, वय, संपत्ती, आर्थिक आणि सामाजिक दर्जा, पर्यावरणीय अधोगती, लोकसंख्यावाढ, हवामानातील बदल, कलह, स्थलांतर या कारणामुळे लोक मागे राहतात असे लक्षात आले आहे. हे सर्व अडथळे पार करून आपल्याला पुढे जायचे आहे व 2030 पर्यंत आपले लक्ष्य गाठायचे आहे असा या थीमचा अर्थ होतो.

हे ध्येय कसे गाठता येईल?

 • पाण्याचे संकट दूर होण्यासाठी चार दिशांनी प्रयत्न होण्याची गरज आहे
 • कोण व किती मागे राहिले आहेत हे शोधून काढणे.
 • त्यांचा आवाज उठवण्यासाठी प्रयत्न करणे.
 • त्यांना इतरांच्या पातळीपर्यंत आणण्यासाठी कायदेशीर तरतुदी करणे.
 • त्या कामासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून देणे.

वर वर्णिलेले बरेचसे अडथळे निसर्गाशी आणि मानवी मनाशी निगडित आहेत हे आपल्या लक्षात येईल. जे निसर्गाशी निगडित आहेत त्यासाठी उपाय सहजपणे केले जाऊ शकतात, पण जे मानवी मनाशी निगडित आहेत त्यासाठी व्यापक प्रयत्न होणे गरजेचे आहे. वर्षानुवर्षे बरेच प्रयत्न करूनसुद्धा जात नाही ती जात हे आपण पाहिलेले आहे. अनेक थोर नेते या कामासाठी आयुष्य वेचून अस्तंगत झाले, पण माणूस आजही जातीच्या कवचापासून बाहेर यायला तयार नाही इतकी ती माणसाच्या मनात खोलवर रुजली आहे. याउलट असेही म्हणता येईल की, प्रत्येक समाज आपले जातीचे बुरूज अधिक बळकट करीत आहे. त्यामुळे आपल्याला यासाठी किती कठोर प्रयत्न करावे लागतील याची जाणीव होईल.

(लेखक ‘जलसंवाद’ या मासिकाचे संपादक आहेत.)