लेख : द्विधा आणि त्रेधा

109

>>दिलीप जोशी<<

आमचा एक मित्र आहे. परोपकारी, उदार वगैरे. कोणाच्याही मदतीला सदैव तत्पर असणारा. अभ्यासात कमालीचा हुशार असल्यामुळे यशस्वी, संपन्न जीवन जगणारा. त्याच्यात एकच उणीव आहे, ती म्हणजे निर्णय क्षमतेची. कोणीतरी सांगितलेली गोष्ट पटली की, ती बिनबोभाट आणि उत्तम प्रकारे पार पाडण्यात त्याचा हात कोणी धरणार नाही, पण ‘‘तू या बाबतीत निर्णय घे’’ असं म्हटलं की, तो कमालीचा गोंधळतो. शालेय जीवनात उत्तम शिक्षक, नोकरीच्या बाबतीत घरच्यांचं मार्गदर्शन आणि लग्नानंतर पत्नीचा सल्ला यामुळे त्याचं सहसा कुठे अडत नाहीण् पण ‘‘तू स्वतःच ठरव आणि आम्हाला गाइड कर’’ म्हटलं की, त्याला घाम फुटतो.

मित्रांबरोबर हॉटेलात जाण्याची साधी गोष्ट. जो तो आपल्या आवडीचंच खाणार. याला विचारलं ‘‘काय घेणार?’’ तर तो उलट प्रश्न करतो ‘‘तुम्ही काय घेणार? मला तेच चालेल.’’ यावर आमचा आणखी एक मित्र एकदा वैतागून बोलला, ‘‘आम्ही नुसती रिकामी प्लेट खाणार… तू खातोस?’’ तो वरमला. मग बराच वेळ मेन्यू कार्ड चाळत बसला आणि शेवटी ‘ते शेजारच्या टेबलावर काय दिलंय तसंच आणा’’, असं वेटरला म्हणाला. साऱयांनी त्याची टर उडवली, पण त्याला त्याचं काही नाही. त्याच्यासाठी कपडेसुद्धा घरची मंडळी आणतात. कारण दुकानात गेल्यावर कोणता कपडा घ्यावा हे त्याला ठरवताच येत नाही.

अशी माणसं उत्तम दिग्दर्शक असल्यावर उत्तम अभिनय करणाऱयांसारखी असतात. प्रत्येक बाबतीत त्यांना एक दिग्दर्शक गरजेचा असतो. त्याने दिशा दाखवली की, मग हे एकदम सुसाट!

योग्य वेळी योग्य निर्णय घेता येणं आणि न येणं याचे अनेक फायदे-तोटे असतात. एखाद्या व्यक्तीने आयुष्यातील सगळे निर्णय अगदी आखीव-रेखीव पद्धतीने घेतलेले असतात. परिचयात येणाऱ्या अनेक माणसांपैकी त्यांचे स्वभाव समजले की, त्यांच्या जीवनशैलीचा अर्थ उमगतो. एका परिचिताला अगदी त्याने ठरवल्यानुसार आयुष्य घालवता आलं. साठीच्या घरात आल्यावर तो असं नक्कीच म्हणू शकतो. संगीत, खगोलशास्त्र्ा, छायाचित्रण, खेळ अशा सगळय़ाच गोष्टींची आवड असलेल्या या व्यक्तीने आपल्या यशाविषयी बोलताना एकदा सांगितलं, ‘‘खरं तर नेमकं काय करावं तेच कळत नव्हतं. कला शिक्षण घ्यावं की तंत्रज्ञानाचं? दोन्हीत सारखीच गती होती. वडील आर्टस् कॉलेजात अध्यापक होते. त्यांनी सांगितलं, तुला हवं ते कर, पण समाधनी रहा. यात नेमका सल्ला काहीच नव्हता आणि म्हटलं तर फार मोलाचा होता. मी ‘करावे मनाचे’ हे तत्त्व अंगीकारलं. एक दिवस स्वतःशी विचार केला. मी फार मोठा नावाजलेला कलाकार होऊ शकेन का? उत्तम खेळाडू होऊन अद्वितीय कामगिरी करता येईल का? परखड आत्मपरीक्षण केल्यावर या दोन्ही गोष्टींत गती असली तरी प्रचंड प्रगती दिसेना. मग विचार केला की, छायाचित्रणात नाव कमवायचं तर त्या प्रकारचे कॅमेरे, खर्चिक दौरे हे सारं परवडेल का? उत्तर नकारार्थी होतं. मनाची समजावणी पटवली आणि तंत्रविज्ञान संस्थेत दाखल झालो. कॉम्प्युटर क्षेत्रात प्रावीण्य मिळवून स्वतःचा व्यवसाय यशस्वी केला. पस्तिशीपर्यंत बऱ्यापैकी यश आणि पैसा मिळाल्यावर पूर्वी मनात दडवून ठेवलेल्या अनेक गोष्टींना धुमारे फुटले. उत्तम कॅमेरे घेतले. जगभर फोटोग्राफीसाठी फिरलो, हिमालयात भ्रमंती केली. कितीतरी प्रेक्षणीय स्थळं पाहिली… आणि सुरुवातीपासूनच अनेकांना मदतीचा हात दिला. मला जिद्दीने काम करणारे स्ट्रगलर्स आवडतात… मजा आली.’’

त्याच्या शेवटच्या ‘मजा आली’मधे वडिलांनी ‘समाधानाने रहा’ असा दिलेला संदेश पूर्णत्वाला गेला होता, पण प्रत्येकाला असं जमेलच असं कसं सांगावं? एक विद्यार्थ्याने तो यशस्वी होऊन एका मोठय़ा कंपनीत मोठय़ा हुद्यावर काम करत असताना सांगितलं, ‘‘पण सर, मला हे असं नव्हतं जगायचं. घरची परिस्थिती उत्तम होती. मी सतार, संतूर अशी तंतुवाद्य खूप छान वाजवायचो. त्यात प्रावीण्य मिळवलं तर तेच करीअर होईल असं वाटायचं, परंतु घरच्यांच्या आग्रहापायी इंजिनीअर झालो. आयटीत स्थिरावलो. लौकिकार्थाने उत्तमच चाललंय, पण… पण सतारीचे ‘दीड दा दीड दा’ बोल त्याच्या मनाच्या कोपऱ्यात झंकारत तसेच राहिले. ‘‘मग आता ती इच्छा पूर्ण कर…’’ ‘‘इतक्या वर्षांनी?’’ ‘‘नक्की जमेल!’’ संवादातून त्याला आत्मबळ मिळालं असावं. दोन वर्षांतच त्याने स्वतःचा कार्यक्रम केला. पूर्वी मला निर्णय घेता आला नाही आणि कोणी मार्गदर्शनही केलं नाही. आता बरं वाटतं.

आयुष्यातल्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला मार्गदर्शन करायला कोणी भेटेलच असं नाही. काही वेळा परखड आत्मसंवादातूनच निर्णय घ्यावे लागतात. मी स्वतः कॉमर्स कॉलेजच्या दारातून अट्टहासाने परत फिरलो आणि आर्टस्ला गेलो होतो. कदाचित त्या ‘ट्रेड’मध्ये पैसा जास्त असेलही. लेखन, संभाषण या शब्दांच्या राज्यात मन रमलं. आपला निर्णय योग्यच होता असं आजही वाटतं. मनःस्थिती द्विधा झाली की, कालचा निर्णय आज चुकीचा वाटतो आणि आजचा उद्या. असं झालं तर ठामपणे काहीच करता येणार नाही. द्विधा मनःस्थितीतून होणारी त्रेधा टाळायची तर स्वतःशीच मोकळेपणाने (मनातल्या मनात) बोलावं असं म्हणे आता एक नवं संशोधन सांगतं. आता यात नवीन ते काय! ‘तुझे आहे तुजपाशी’ हा संदेश तर आम्हाला कधीचाच ठाऊक आहे.

आपली प्रतिक्रिया द्या