ठसा – रामकृष्ण जोशी

नंदकुमार मुळे

रामकृष्ण लक्ष्मण जोशी म्हणजे रा. ल. या आद्याक्षरांनी महाराष्ट्रातील मुद्रकांना परिचित असलेले रा. ल. जोशी म्हणजे महाराष्ट्र मुद्रण परिषदेच्या दुसऱ्या फळीतील एक धडाडीचे कार्यकर्ते व आदर्श क्यक्तिमत्त्व! दुसऱ्या फळीतील म्हणण्याचं कारण संभाजीनगर मुद्रक संघाचे पहिले अध्यक्ष मोहनराव काळे व चिटणीस ज. रा. बर्दापूरकर यांनी १९५८ साली महाराष्ट्र मुद्रण परिषदेस संपर्क साधला व संलग्न सभासद म्हणून मुद्रक संघाच्या परिषदेचे सभासदत्क घेतले. १९५९ मध्ये नगरच्या महाराष्ट्र मुद्रण परिषद अधिकेशनास मोहनराव काळे, के. श्री. देशपांडे, ज. प. मुळे, ज. रा. बर्दापूरकर हे मुद्रक संघाचे सभासद उपस्थित राहिले होते. अधिवेशनाच्या कार्यवाहीत त्यांनी संभाजीनगर मुद्रक संघाच्या वतीने भाग घेतला. तसेच त्यांची निवड महाराष्ट्र मुद्रण परिषदेच्या कार्यकारी मंडळावरही झाली. ही मुद्रक संघाची पहिली फळी. रा. ल. जोशी यांच्या मुद्रण परिषदेतील कार्याचा प्रवास याच सुमारास सुरू झाला. रा. ल. जोशी संभाजीनगर मुद्रक संघाचे १९८७-८९ या काळात अध्यक्ष होते. संघाच्या कार्याला दिशा देणारे चैतन्य त्यांनी या काळात निर्माण केले. सामाजिक आणि व्यावसायिक संघटनांमध्ये सहकार्याचा परिपाठ कसा असावा, याचा धडाच त्यांनी संघाच्या सदस्यांसमोर ठेवला. याचे गमक म्हणजे रा. ल. जोशी पूर्वी सहकार प्रशिक्षण क्षेत्रात ३४ वर्षे कार्यरत होते. सहकारातील तत्त्वे आणि व्यक्तींमध्ये असलेला आदर्श त्यांच्या प्रत्येक नियोजनातून दिसून येत होता. ज. रा. बर्दापूरकरांनी मुद्रण परिषदेचे कार्य करीत असताना अशाच एका स्वप्नाची वेल लावून ठेवली होती. ती वेल म्हणजे पनवेल येथील महाराष्ट्र मुद्रण परिषदेचा मुद्रण तंत्र शिक्षण प्रकल्प. या प्रकल्पाचे बरेचसे काम ज. रा. बर्दापूरकर हयात असताना पूर्ण झाले होते. पण तेथे मुद्रण तंत्र शिक्षणासंबंधी कोर्सेस सुरू व्हावयाचे होते. या तंत्रशिक्षण प्रकल्पाला रा. ल. जोशी यांच्या ‘ममुप’च्या अध्यक्षीय काळात (१९९२-९३) बराच वेग आला. या कामासाठी त्यांनी महाराष्ट्र मुद्रण परिषदेचे मुद्रा हे मासिक निवडले. अध्यक्ष रामकृष्ण जोशी, सरचिटणीस रामा नाईक आणि संपादक म्हणून मी व अन्य सहकारी असा आमचा चमू महाराष्ट्रभर ‘ममुप’च्या कार्याचा आणि उद्देशांचा पाठपुरावा करीत वर्षभर फिरत होता. मुद्रा मासिकाने मुद्रकांच्या मनामध्ये आपले एक वेगळे स्थान निर्माण केले. सर्व राज्यातील सदस्यांना जोडण्याची रा. ल. जोशी यांची मुद्रा मुखपत्राची मात्रा छान लागू पडली. तंत्रशिक्षण प्रकल्पामुळे मुद्रकांमध्ये संघटनेबद्दल जागृती निर्माण झाली. २००५-०६ च्या अध्यक्षपदी रामा नाईक यांची निवड झाली. संभाजीनगर मुद्रक संघाने ममुपला दिलेले हे तिसरे अध्यक्ष रा. मा. नाईक यांच्या अध्यक्ष काळात पनवेल येथील मुद्रण तंत्रशिक्षण प्रकल्पात शैक्षणिक अभ्यासक्रम सुरू करण्यात आले. यावेळी रा. ल. जोशी यांची आग्रही भूमिका आजही सगळ्यांच्या स्मरणात आहे. कुठलेही काम एकदा हाती घेतले की, ते नेटाने पूर्ण करणे हा त्यांचा स्वभावधर्म होता. रामकृष्ण जोशी यांचे वेयक्तिक आयुष्य परिस्थितीशी दोन हात करीत सुरू झाले. ते मूळचे अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापूरचे. मोरकाड हे बर्दापूरजकळ असलेले लहानसे गाव वडिलांच्या भिक्षुकीचे. खुरसाळे कुटुंब हे मोरकाडचे सधन शेतकरी. जोशी कुटुंबाचे आणि खुरसाळे कुटुंबाचे अतिशय घनिष्ट संबंध. त्यामुळे रामकृष्ण जोशी यांचे बालपण आणि प्राथमिक शिक्षण खुरसाळे यांच्या घरीच झाले. डॉ. सुरेश त्र्यंबक खुरसाळे हे रा. ल. यांचे बालमित्र. रा. ल. यांचे माध्यमिक क महाविद्यालयीन शिक्षण हैदराबाद येथे त्यांचे थोरले बंधू जगन्नाथराक ऊर्फ ज. रा. बर्दापूरकर यांच्याकडे झाले. त्यानंतर  त्यांनी आपले उभे आयुष्य सामाजिक आणि शैक्षणिक कार्यासाठी झोकून दिले होते. महाराष्ट्र मुद्रण परिषदेत आपल्या आयुष्याचा बराच काळ सत्कारणी लावल्यानंतर रामकृष्ण जोशी यांनी सरस्वती भुवन शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष म्हणून शेवटपर्यंत काम पाहिले. त्यांच्या या कार्याला तोड नाही. रामकृष्ण लक्ष्मण जोशी यांनी नेहमीच सर्वांना योग्य आणि सकारात्मक मार्ग आचरणाचे मार्गदर्शन केले. त्यांच्यासोबत काम करण्याचे भाग्य अनेकांना लाभले. त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्र मुद्रण परिषदेचा एक आधार निखळून पडला आहे.