लेख : ठसा : रमेश भाटकर

5

>> प्रशांत गौतम

मराठी रंगभूमी, चित्रपट आणि मालिका या तिन्ही माध्यमांत अभिनयाचा ठसा उमटवणारे चतुरस्र अभिनेते रमेश भाटकर गेले. त्यांची एक्झिट सर्वांसाठी नक्कीच दुःख देणारी आहे. रंगभूमीवर ‘अश्रूंची झाली फुले’ या पहिल्याच व्यावसायिक नाटकात आपल्या सशक्त आणि दमदार अभिनयाने त्यांनी लाल्या हे पात्र अजरामर करून छाप सोडली होती. ‘हॅलो इन्स्पेक्टर’, ‘दामिनी’, ‘कमांडर’मधील निर्भीड, निडर पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत तर ते घराघरांत पोहोचले होते. अशा पोलीस अधिकाऱ्याकडे पाहून त्यांच्यामुळे अनेकांनी पोलीस दलात येण्याची स्फूर्ती घेतली होती.

रत्नागिरी जिह्यात भाटय़े या गावी जन्मलेले रमेश भाटकर अस्सल कोकणी होते. प्रख्यात संगीतकार, भजनसम्राट स्नेहल (वासुदेव) भाटकर यांचे लहान सुपुत्र. घरातच संगीताचा वारसा असला तरी त्या क्षेत्रात रमेश रमले नाहीत. त्यांची नाटय़ क्षेत्र ही पहिली पसंती होती. अर्थात रंगभूमीवर त्यांचे पहिले प्रेम होते. संगीत क्षेत्रात करीअर केले नसले तरी त्यांचा आवाज उत्तम होता. मात्र त्यांनी गायनाची आवड केवळ छंद म्हणूनच जोपासली. कलेचा वारसा संगीत क्षेत्रात जपता आला नसला तरी त्यांनी तो अभिनयातून जपला, पुढे नेला. भूमिका-मग ती कोणतीही असो, कोणत्याही माध्यमातील असो- ते त्या त्या ठिकाणी सहजतेने वावरले. त्या त्या माध्यमांच्या तांत्रिक बाबी आत्मसात केल्या. त्यात होणारे बदल लक्षात घेतले. सहजसुंदर अभिनयाने साकारलेल्या भूमिकेचं सोनं केलं. तब्बल तीन दशकं रसिक प्रेक्षकावर आपला प्रभाव कायम ठेवत. 35 वर्षे ते रसिक प्रेक्षकांच्या समोर होते. 1975च्या सुमारास ज्येष्ठ नाटककार प्रा. वसंत कानेटकर यांचे अजरामर नाटक ‘अश्रूंची झाली फुले’ रंगमंचावर आले. या नाटकात काशीनाथ घाणेकर हे लाल्याची भूमिका करत असत. त्यांच्या नंतर या भूमिकेसाठी रमेश भाटकर यांच्याकडे विचारणा झाली. वयाच्या अवघ्या तेविसाच्या वर्षी अभिनय कौशल्य या जमेच्या बाजूवर त्यांना लाल्याची भूमिका मिळाली. नुसती भूमिका मिळाली असे नाही, तर तेविसाव्या वर्षी ते प्रा. विद्याधर सरांच्या वयाचे झाले, त्यावेळी भाटकरांसारखा तेविशीतला तरुण ही भूमिका कशी काय साकारणार? असा प्रश्न त्यांची निवड करणाऱ्यासह अनेक जाणकारांना पडला. पण सकस, दमदार, तडाखेबाज अभिनयाच्या बळावर त्यांनी ते प्रत्यक्षात करून दाखवले. एवढेच नव्हे तर प्रभाकर पणशीकरांसारख्या दिग्गज नटश्रेष्ठांसमोर लाल्याच्या भूमिकेतून समोर उभे ठाकले. दमदार, सशक्त अभिनयातून रमेश भाटकरांनी साकारलेला लाल्या त्यांनी जिवंत केला. त्यांची ही अजरामर भूमिका कोणीही विसरू शकणार नाही. त्यानंतर ‘केव्हातरी पहाटे’, ‘अखेर तू येशीलच’, ‘राहू-केतू’, ‘मुक्ता’ यांसारखी नाटकं आणि नाटकातील भूमिका, एकांकिकांमधील भूमिका रमेश भाटकर यांनी वैविध्यपूर्ण केल्या.

नाटय़ क्षेत्रात भरीव, ठसठशीत योगदान हे तब्बल तीनेक दशकांचे होते. या क्षेत्राप्रमाणेच ते मराठी चित्रपटसृष्टीतही कायम रसिकांसमोर होते. 1977 च्या सुमारास त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले ते ‘चांदोबा चांदोबा भागलास का?’ या चित्रपटातून. याही क्षेत्रात त्यांचा प्रवास उल्लेखनीय झाला. ‘अष्टविनायक’, ‘दुनिया करी सलाम’, ‘आपली माणसं’ यांसारख्या 90 चित्रपटांतून त्यांनी भूमिका साकार केल्या. त्यातीलच एक महत्त्वाचा चित्रपट म्हणजे ‘माहेरची साडी’ आणि गतवर्षी प्रदर्शित झालेला ‘भावेश जोशी सुपरहिरो’ हे सांगता येतील. अलका कुबल यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘माहेरची साडी’ या चित्रपटाने अनेक रेकॉर्ड तोडले. निर्माण केले, विक्रम प्रस्थापित केले. इतर चित्रपट, नाटकांतून डॅशिंग अभिनय ते करीत असले तरी ‘माहेरची साडी’मधील भाटकर यांच्या भावनिक अभिनयाने मात्र सिनेरसिकांच्या मनात घर केले होते. मराठीसोबतच अनेक हिंदी चित्रपटांतून त्यांनी भूमिका साकारल्या. ‘ऑक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ या काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या चित्रपटात त्यांनी पृथ्वीराज चव्हाण यांची भूमिका साकारली होती. आपल्या सशक्त आणि दमदार अभिनयाने भाटकर यांनी मोठा पडदा काबीज केला होता तशाच सहजतेने छोटा पडदाही. ‘हॅलो इन्स्पेक्टर’, ‘कमांडर’मधील त्यांच्यातील गुन्हेगारांसाठी कर्दनकाळ ठरणारा भारदस्त पोलीस अधिकारी रसिकांना विलक्षण भावला. या क्राइम मालिकांनी भाटकर यांना लोकप्रियतेच्या शिखरावर नेऊन ठेवले. त्याचप्रमाणे ‘दामिनी’, ‘युगंधरा’, ‘तू तिथे मी’, ‘माझे पती सौभाग्यवती’ या मालिकांतूनही त्यांनी अभिनय साकारला. ‘माझे पती सौभाग्यवती’मध्ये अलका कुबल, रमेश भाटकर पती-पत्नीच्या भूमिकेत होते. 50 नाटकं, 90 चित्रपट, पंधरा – वीस मालिका असा त्यांचा प्रवास होता.

2018 सालच्या जून महिन्यात मुलुंड (मुंबई) येथे 98व्या अ.भा.मराठी नाटय़ संमेलनात नाटय़ परिषदेने रमेश भाटकर यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले होते. रंगभूमी, चित्रपट, मालिका या क्षेत्रांत प्रदीर्घ काळ योगदान दिल्याबद्दलचा हा गौरव होता. सत्काराला उत्तर देताना भाटकर कमालीचे भावुक झाले होते. खरे तर हा पुरस्कार त्यांना कोणत्याही भूमिकेसाठी नव्हता तर योगदानासाठी होता. त्यावेळी ते म्हणाले होते, ‘‘जोपर्यंत माझे शरीर साथ देईल तोपर्यंत मला काम करायचे आहे.’’ शेवटी तेच खरे झाले. दुर्धर कॅन्सरने ग्रासले आहे याचे निदान झाल्यावरही शेवटपर्यंत उत्साहाने कार्यरत राहिले. मागच्या आठवडय़ात एका वाहिनीवर स्नेहल भाटकर स्मृती समारंभातही त्यांनी हजेरी लावली, सहभागी झाले. त्यावेळी जे मनोगत व्यक्त केले तेच अखेरचे ठरले.