रंगावली कलेची ६० वर्षे!


>> एन. एस. मोरे

चिन्मय रंगावलीचे चित्रकार वसंत थिटे रंगावली कलेची ६० वर्षे व वयाचा अमृत महोत्सव असा सुरेख मिलाफ साजरा करत आहेत. यानिमित्त त्यांच्या कलाविश्वाचा घेतलेला वेध

प्रत्येक माणसाने आपल्या आयुष्यात, आपल्या वाटय़ाला आलेली भूमिका व कार्य अशा ईश्वरार्पण बुद्धीने करावे की, असे काम करणारा कोण आहे याचा शोध जगन्नाथास घेता येईल. आज ही प्रस्तावना करण्याचे कारण म्हणजे अगदी सामान्य कुटुंबात, परिस्थितीत जन्माला येऊन आपल्या कर्तृत्वाने मोठी झालेली अनेक माणसे आहेत. वयाची ८०वर्षे पूर्ण करून सहस्रचंद्रदर्शनाचा सोहळा साजरा करणारे चिन्मय रंगावली चित्रकार वसंतराव थिटे.

एका गरीब कुटुंबात १९३८ साली वसंतरावांचा जन्म झाला. त्यांचे वडील तिथे १९५० ते १९५८ अशी आठ वर्षे राहिले. मंदिरातच असलेल्या दोन छोटय़ा खोल्यांमध्ये वास्तव्य केले. रामाच्या मंदिरात श्रीराम पुढे व दारापुढे आई रोज सुरेख रांगोळी काळात असे. त्या १०-१२ वर्षांच्या मुलाच्या मनावर त्या रंगावलीचा परिणाम संस्काररूपाने कळत नकळत होत होता. आई राममंदिरात देवपूजा, झाडलोट ही सेवा न कंटाळता करीत असे. काकडय़ाची गाणी, संत जनाबाई, बहिणीबाईंची गाणी, अभंग तोंडपाठ होते. अपूर्व अशी परमेश्वराची सेवा आईच्या हातून घडली. तिच्या आशीर्वादाचे फलस्वरूप संस्कार आपल्याला मिळाले असे थिटय़ांना आज वाटते.

आईबरोबर वसंतरावांचे आळंदीलाही वारंवार जाणे होई. तेव्हापासून त्यांना आळंदीचे व माऊलींचे वेड लागले. त्यांची आई सुवर्ण पिंपळाजवळ रांगोळी काढायची. याच काळात मुलाला त्यांनी एक गोष्ट सांगितली, या सुवर्ण पिंपळाला ज्ञानदेवांच्या आईवडिलांनी सवा लक्ष प्रदक्षिणा घातल्या आहेत. तू जीवनात जे करशील ते सवापटीत कर. आपल्याकडे आजही सवा रुपया दक्षिणा, सवा लाख बेलाची पाने, पारिजातकाची फुले, तुळशी यांनी देवतांना फुले वाहण्याचा संस्कार ऐकू येतो.’ त्याचवेळी वसंतरावांनी संकल्प केला की, हिंदुस्थानभर ज्ञानेश्वर माऊलींसाठी सवा लाख रांगोळय़ा काढीन आणि खरोखरच हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत त्यांनी सवा लाख किंवा त्यापेक्षाही जास्त रांगोळय़ा काढल्या आहेत.
हलाखीच्या परिस्थितीमुळे वसंत थिटे यांनी ११ वीनंतर खेड सोडले व ते पुण्यात आले. पीएमटीमध्ये कंडक्टरची नोकरी पत्करली. कामातील प्रामाणिकपणा व गोड बोलणे यामुळे प्रगती करीत ‘पुणे दर्शन’ या बसवर काम करीत मॅनेजर या पदापर्यंत पोहोचले व तिथूनच निवृत्त झाले. पुण्यात आल्यानंतर पहिली रांगोळी पुण्याचे ग्रामदैवत असलेल्या कसबा गणपतीसमोर काढली. त्यानंतर श्रीमंत दगडूशेठ हलवाई, अखिल मंडई मंडळासमोर रांगोळय़ा काढल्या होत्या. त्या पाहून अनेक मंडळांची आमंत्रणे आली.

पहिली आळंदी ते पंढरपूर वारी सोनोपंत दांडेकरांबरोबर केली. या मार्गावर सासवड, लोणंद, जेजुरी, फलटण, माळशिरस या छोटय़ा वाटेने येणाऱया गावांमध्ये गावातील मुलांना रांगोळय़ा शिकविल्या व मुलांच्या मनात अशी भावना जागवली की, आपल्या गावात माऊली येणार आहे ना! तिचे स्वागत आपण रांगोळय़ा काढून करूया. ज्या ज्या ठिकाणी मुलांबरोबर रांगोळय़ा काढल्या त्या मुलांमध्येच देव पाहिला.

नारायण असे विश्वी ।
त्याची पूजा करीत जावी ।
तेणे कारणे झिजवावी ।
कोणीतरी काया ।

ज्ञानेश्वरांच्या समाधीला ७०० वर्षे झाली तेव्हा त्यांनी पहिली रांगोळी आळंदीत काढली. त्या रांगोळीत सात मोठय़ा परातीत पाण्यावर रांगोळय़ा काढल्या होत्या. भोवताली दिवे लावले होते. कल्पना करा काय दृश्य असेल! बघणाऱयांच्या डोळय़ांचे पारणे फिटले असेल. दानपेटीत जमलेले सवा लक्ष रुपये माऊलींना अर्पण केले. ज्ञानदेवांच्या समाधीला स्मरून जे कार्य केले तो संस्कार अगदी लहान वयात झाला होता. ज्ञानदेवांपुढे सुरू केलेल्या ७०० रांगोळय़ांच्या संकल्पाची सांगता ७०० वी रांगोळी पंढरपूरला विठ्ठलाच्या साक्षीने काढून केली. दहा राष्ट्रपतींनी जवळून रांगोळी पाहून शाबासकी दिली. पु. ल. देशपांडे, भीमसेन जोशी, आर्ट ऑफ लिव्हिंगचे रविशंकर, फुलगावचे स्वरूपानंद सरस्वती, पीएनजीचे दाजीकाका गाडगीळ, रामकृष्ण मठाचे स्वामी भौमानंद अशा अगणित मान्यवरांनी त्यांच्या बोटांचे कौशल्य व रंगावलीचे भरभरून कौतुक केले. त्यांना सन्मानित केल्याची अनेक छायाचित्रे उपलब्ध आहेत.

जवळजवळ ५० हजार किलोमीटर प्रवास थिटे पती-पत्नीने स्कूटरवरून प्रवास करून रांगोळय़ा काढल्या व प्रत्येक ठिकाणी फक्त १-१ रुपया टाकण्याचे आवाहन करून जमलेले लाखो रुपये त्या त्या संस्थेला दान दिले. थिटे काकांचे जीवन चरित्र पाहताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ते म्हणजे त्यांनी जो जो संकल्प केला तो सिद्धीला गेला.

रामदरा लोणीपासून दोन किलोमीटरवर फार मोठी दरी व प.पू. धुंदीबाबा यांचा आश्रम आहे. तिथे विश्वशांतीसाठी सवा कोटी गायत्री मंत्राच्या जपाचा यज्ञ केला होता. त्यासाठी नाशिक, काशी येथून वेदपठण करणारे आचार्य, १०८ ब्रह्मवृंद आले होते. तसेच चारही पीठांचे जगद्गुरू शंकराचार्य उपस्थित होते. सहा-सात दिवस हा यज्ञ चालला होता. थिटे काकांनी पुण्याहून रोज सायकलवर जाऊन रांगोळी सेवा सादर केली. ती पाहून शंकराचार्यांनी व ब्रह्मवृंदाने आशीर्वाद दिले तो प्रसंग विसरणे शक्य नाही, असे थिटे काका म्हणाले.

सारसबागेजवळील सणस मैदानावर दगडूशेठ हलवाई गणेश मंडळातर्फे ५५ दिवस धार्मिक उपक्रम होता. थिटे काकांनी पहाटे ३.३० वाजल्यापासून रोज अभूतपूर्व व विलोभनीय रांगोळय़ा काढल्या व त्याचा मनमुराद आनंद घेतला. सध्याचे पूना हॉस्पिटल ही इमारत बांधण्यापूर्वी तिथे लहान मुलांची स्मशानभूमी होती. ती जागा महानगरपालिकेकडून मिळाली. त्या जागेवर लाहोटी कुटुंबाने अनेकांच्या सहकार्याने पूना हॉस्पिटल उभे केले. ती जागा शुद्ध करण्यासाठी तिथे डोंगरे महाराजांनी सात दिवस भागवत सप्ताह घेऊन ती जागा शुद्ध केली. हा समारंभ पार पडला त्यावेळी व्यासपीठासमोर गाईच्या शेणाने सारवून रांगोळीद्वारे भगवंतांची सेवा केली. थिटे काकांच्या खास पद्धतीप्रमाणे दानपेटीत जमलेली भरघोस रक्कम पूना हॉस्पिटलच्या मदतीकरिता देऊन टाकली. आयुष्यभर देव, देश आणि मानव ही त्रिसूत्री पुढे ठेवून काम केले. त्यांचे सगळे सत्कार निःस्पृह व कलात्मक काम पाहून उत्स्फूर्तपणे व्यक्तींनी व संस्थांनी केले.

एक प्रसंग मानवसेवेचा हृद्य प्रसंग म्हणून नोंदवायलाच हवा. ज्ञानदेवांची आळंदी व तुकाराम महाराजांची मोशी या रस्त्यावर सांगलीच्या महाराणी आदरणीय ताराबाई पटवर्धन यांनी १८ एकर जागा देऊन कुष्ठरोग्यांकरिता आनंदग्राम नावाचा आश्रम काढला आहे. ज्यांचा कुष्ठरोग बरा झाला आहे, पण त्यांना समाजात स्थान नाही अशा गरजू रुग्णांसाठी हा आश्रम स्थापित केला आहे. त्यांच्या मुलांसाठी शाळा बांधली आहे. स्त्रियांकरिता लघुउद्योग सुरू केले आहेत. जवळजवळ २००-२५० मंडळी या आश्रमात आहेत. त्या आश्रमातील शाळेतील मुलांसाठी रांगोळीच्या प्रशिक्षणाचा खर्च थिटे काकांनी केला.

आयुष्यात साध्या राहणाऱया रंगावलीच्या विविध छटांमधून मानवजातीला आधार देऊन समाजाशी नाते जोडून माणुसकीच्या नात्यातून प्रेमभाव व्यक्त करणे किती विलक्षण व अपरंपार आनंद देणारे आहे याची कल्पना येथे येते असे थिटे काका म्हणाले. संपूर्ण हिंदुस्थानात वसंतराव थिटे यांनी असे विविध नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले व आपली चिन्मय रंगावली सेवा सत्कारणी लावली. लहानपणी आईने खेडच्या राममंदिरात व आळंदीच्या माऊलींच्या मंदिरात काढलेल्या रंगावलीचा संस्कार कायम राहिला व तो वसा आयुष्यभर जपला.

पिकलेल्या सेंद कडूपण गेले ।
तैसे मन केले पांडुरंगे ।

असे तुकाराम महाराजांच्या अभंगासारखे रसाळ, मधुर, परिपक्व असे जीवनाचे फळ माझ्या हातात माझ्या आनंदमय ईश्वरार्पण बुद्धीने केलेल्या सेवेचे दान म्हणून मिळाले.
रंगावली कलेची ६० वर्षे व वयाचा अमृत महोत्सव या दोन्ही गोष्टींचा सुरेख मिलाफ या श्रेष्ठ कलाकाराच्या जीवनात दिसून येतो.