आठवणींची झाडं


>> बाळासाहेब दारकुंडे

नेरुळमध्ये स्मृती उद्यानाच्या माध्यमातून वृक्षारोपणाचा एक छान उपक्रम सुरू होत आहे.

समाजातील नामवंत व्यक्तींच्या स्मृतीचे भावी पिढीला कायम स्मरण व्हावे यासाठी अनेक वास्तूंना किंवा चौकांना त्यांची नावे दिली जातात. ही बाब खर्चिक असल्याने ती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे. मात्र सर्वसामान्यांच्या स्मृतीही कायम स्मरणात राहाव्यात यासाठी नवी मुंबई महापालिकेने नेरुळ येथे स्मृती उद्यान तयार केले आहे. या उद्यानात नागरिकांना आपल्या नातेवाईकांच्या स्मृतिप्रीत्यर्थ झाडे लावता येणार आहेत. आयुष्यातील कौतुकाच्या क्षणाची आठवण म्हणूनही या उद्यानात आनंदवृक्ष लावण्याची संधी महापालिका प्रशासनाने दिली आहे. त्यामुळे या स्मृती उद्यानात आयुष्यातील आठवणींना उजाळा मिळणार आहे.

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आणि प्रदूषणाची वाढत चाललेली पातळी कमी करण्यासाठी नवी मुंबई महापालिकेने वृक्षारोपणावर भर दिला आहे. वृक्षारोपणामध्ये शहरातील नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी महापालिका प्रशासनाने नेरुळ येथील सेक्टर 26मध्ये ज्वेल ऑफ नवी मुंबईच्या बाजूला 22 हजार 500 चौ.मी. जागेवर स्मृती उद्यान तयार केले आहे. या उद्यानात 108 जातींची 1 हजार 55 वृक्ष लावण्यात येणार आहे.  वड, पिंपळ, रानबोर, बाभूळ, खैर, हिवर, निंब आदी शहरी भागात सहजासहजी नजरेस न पडणारी वृक्ष या उद्यानात पाहायला मिळणार आहे. कुटुंबातील व्यक्तीचा वाढदिवस किंवा स्वर्गवासी झालेल्या व्यक्तींच्या आठवणी कायम स्मरणात ठेवण्यासाठी या ठिकाणी वृक्ष लावता येणार आहेत. त्या वृक्षाजवळ संबंधित वृक्षाचे नाव आणि व्यक्तींच्या नावाचा एक फलकही लावण्यात येणार आहे.

उद्यानात स्मृतिप्रीत्यर्थ वृक्षांबरोबर आनंदवृक्षही लावता येईल. एखाद्या विद्यार्थ्याला दहावी किंवा बारावीच्या परीक्षेत चांगले गुण मिळाले तर त्याच्या कुटुंबातील व्यक्तींना हा आनंदाचा क्षण या स्मृती उद्यानात आनंदवृक्ष लावून साजरा करता येणार आहे. या आनंदवृक्षाशेजारी लावण्यात येणाऱ्या फलकावर वृक्षाचे नाव, विद्यार्थ्याचे नाव आणि आनंदाचा क्षण यांचा उल्लेख केला जाणार आहे.

रानमाळपाठोपाठ दुसरा उपक्रम

पुणे जिह्यातील रानमाळ गावात माहेरहून सासरी जाणाऱ्या मुलीच्या हस्ते एक झाड लावले जाते. पर्यावरण वाचविण्यासाठी रानमाळने सुरू केलेल्या उपक्रमाच्या धरतीवरच नवी मुंबई महापालिकेने हे स्मृती उद्यान तयार केले असून येत्या डिसेंबर महिन्यापासून नवी मुंबईकरांना तिथे स्मृती आणि आनंदवृक्ष लावता येणार आहे.

नाममात्र खर्च

एखाद्या व्यक्तीच्या स्मृतिप्रीत्यर्थ एखादी वास्तू किंवा चौक उभा करायचा असेल तर मोठा खर्च येतो. मात्र या ठिकाणी स्मृती उद्यानात स्मृतिप्रीत्यर्थ वृक्ष लावण्यासाठी फक्त नातेवाईकांकडून 800 रुपये घेण्यात येणार आहेत. याच रकमेत संबंधित वृक्षाची सर्व देखभाल महापालिका प्रशासन करणार आहे, असे महापालिका उपायुक्त नितीन काळे यांनी सांगितले.