मुद्दा : नद्यांचे शुद्धीकरण करणे गरजेचे

4

>>दादासाहेब येंधे<<

[email protected]

वाढते औद्योगीकरण, शहरीकरण आणि लोकसंख्येमुळे नद्यांमध्ये प्रदूषण वाढत चालले आहे. त्याचा परिणाम पर्यावरणासह नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. त्यामुळे नदीचे प्रदूषण रोखणे आणि संवर्धन करणे गरजेचे असून देशातील सर्वाधिक प्रदूषित नद्या पट्टे महाराष्ट्रात असल्याचे समोर आले आहे. आपल्या देशातील नद्या जीवन रेखा म्हणून ओळखल्या जातात. त्याचबरोबर देशाची संस्कृती आणि सभ्यतेचा आरसा म्हणूनही त्याकडे पाहिले जाते. हिंदुस्थानी संस्कृती, समाज, राज्यकर्ते आणि संतांनी नद्यांना आईची उपमा दिली, परंतु त्या सध्या प्रदूषित झाल्या असून त्याचा परिणाम पर्यावरणावर होताना दिसत आहे.

आजघडीला प्रत्येक नदी-नाला हा उद्योग कृषी आणि सांडपाण्याने प्रदूषित झाला आहे. हे प्रदूषित पाणी भूजलात भरल्यामुळे विहिरी, कूपनलिकांचे पाणी शुद्ध राहात नाही. त्यामुळे हे पाणी पिण्यामुळे विविध रोग होत आहेत. एकीकडे पाणी नाही आणि आहे तेही दूषित, प्रदूषित आहे. नागरिकांमध्ये जनजागरण आणि कायदे कडक करूनच आपण पावसाचे पाणी आणि साठवलेल्या पाण्याचे योग्य नियोजन करू शकतो. आजही राज्यात सर्वाधिक जलप्रदूषण चंद्रपुरात असल्याचे स्पष्ट झाले आहे. सांडपाणी नदीमध्ये टाकल्यामुळे नदीचे पाणी प्रदूषित होऊन त्याचा परिणाम परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. त्यामुळे नदीचे प्रदूषण रोखणे आणि आहे त्या पाण्याचे संवर्धन करणे अत्यंत गरजेचे आहे. नद्यांमधील प्रदूषित पाणी प्यायल्याने कॉलरा, कावीळ, टायफॉईड, पोटदुखी यासारखे आजार उद्भवतात.

राज्यातल्या नागरिकांनी प्रदूषणाकडे अत्यंत गांभीर्याने लक्ष दिले नाही तर आणखी काही वर्षांनी शहरांना स्वच्छ आणि शुद्ध पाण्याचा टँकरनेच पुरवठा करावा लागेल, अशी भीषण परिस्थिती निर्माण होईल. नद्यांवरच्या धरणांचे पाणीसाठे प्रदूषित होत आहेतच, पण त्याचबरोबर बहुतांश नद्यांच्या पाण्याचे प्रवाह औद्योगिक आणि शहरांच्या सांडपाण्याने पूर्णपणे विषारी झाले आहेत, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. त्या वर्षीच्या उन्हाळय़ात बंधाऱयात साठविण्यात आलेले नद्यांचे हे विषारी पाणी बहुतांश शहरांना पिण्यासाठी पुरविले जाते. या घाणेरडय़ा, दुर्गंधीयुक्त आणि मानवी शरीराला अपायकारक असलेले पाणी प्यायल्याने कोल्हापूर, सांगली शहरांना काविळीच्या साथीचा विळखाही पडला होता. त्यासाठीच आतापर्यंत कित्येक लोकांचे बळी गेले होते. हीच स्थिती नद्यांकाठच्या शहरांची व्हायची शक्यता असल्यामुळे सरकारने प्रदूषणाने मृत्युपंथाला लागलेल्या नद्यांचे शुद्धीकरण तातडीने करायला हवे. या नद्यांचे प्रदूषण रोखायला हवे, अन्यथा या शहरातल्या कोटय़वधी जनतेच्या पिण्याच्या पाण्याची समस्या अतिभेसूर होईल.

आपल्याकडे स्वच्छता, शुद्धता आणि गुणवत्ता हे आजवरचे दुर्लक्षित विषय राहिले आहेत. कपडे धुणे, गाडय़ा धुणे, भांडी घासणे, गुरे धुणे, शौचविधी या सर्व कामांसाठी आपल्याकडे नदी-नाले यांचा मुक्तपणे वापर केला जातो. अर्धवट जळालेली प्रेते इथपासून ते देवावरील निर्माल्य हे सगळे नदीत सोडले जाते. परिणामी जलप्रदूषण वाढते.

दरवर्षी पंढरपूरला आषाढी आणि कार्तिकी एकादशीला लक्षावधी वारकरी जातात. तेथील चंद्रभागेचे पाणीदेखील स्वच्छ राहिलेले नाही. धुळे शहरातून वाहणारी पांजरा, वैतरणा, बाणगंगा, निलगंगा, वारणा यांसह बहुतांश नद्यांचे प्रवाह दूषित, प्रदूषित झालेले आहेत. राज्य सरकार औद्योगिक विकासासाठी कारखान्यांना पाणी आणि अन्य पायाभूत सुविधा देते. औद्योगिक विकासासाठी या धोरणाची अंमलबजावणी करणे आवश्यक असले तरीही मोठय़ा कारखान्यातील विषारी सांडपाण्यावर शुद्धीकरणाची प्रक्रिया  करणारी यंत्रणाच नसल्याने औद्योगिकीकरणाची जबर किंमत कोटय़वधी जनतेला मोजावी लागत आहे. सरकारने कारखान्यांच्या, शहरांच्या सांडपाण्यावर प्रक्रिया करणारी यंत्रणा सुरू करायची सक्ती कारखाने आणि नगरपालिका-महानगरपालिका यांच्यावर करायला हवी. अन्यथा, विषारी सांडपाणी प्याल्याने राज्यालाच साथीच्या रोगांचा विळखा बसल्याशिवाय राहणार नाही.  प्रदूषित-मैला पाण्याचे शुद्धीकरण अत्यंत काटेकोरपणे करणे आणि शुद्ध केलेल्या पाण्याचा वापर पुन्हा करणे शक्य आहे. पाणी आयात करणाऱया सिंगापूरला हे जमले. त्यांची शुद्ध प्रक्रिया इतकी काटेकोर आहे की, तिथे हे पाणी पिण्यासाठी देखील वापरतात. तब्बल सहा वेळा ते पाणी पुनःपुन्हा पुनर्वापरासाठी फिरविले जाते. त्यामुळे निम्म्या पाण्यातच त्यांची गरज भागते. आपल्यालाही हा विचार लवकर कृतीत आणावा लागेल.