रुमीचे गहिरे मैत्र

सानिया भालेराव

रुमीच्या कविता आणि विचार आजही भुरळ घालतात. सहज सोप्या भासणाऱ्या परंतु अनेक पदर असणाऱया रुमीच्या कवितांमधून मिळणारी अनुभूती वेगळीच. या शब्दांमधील गहिरा अर्थ समजून घेण्याचा हा प्रवास.

३० सप्टेंबर हा रुमीचा जन्मदिवस. १२०७ साली पर्शियामध्ये जन्मलेला जलालुद्दीन महंमद बालखी / रुमी हा त्याचे वडील आणि आजोबांसारखाच विद्वान होता, पण त्याचं आयुष्य खऱ्या अर्थाने ट्रान्सफॉर्म झालं ते शम्स तबरेजी (shams tebrizi) या मौलवीमुळे. या दोघांच्या पहिल्या भेटीच्या अनेक कथा आहेत. त्यातली एक अशी आहे की, एक दिवस रुमी बाजारात एक पुस्तक वाचत असतो. तिथून जात असताना हा मौलवी त्याला विचारतो, ‘‘तू काय वाचतो आहेस ?’’ यावर रुमी म्हणतो, ‘‘तुला ते कधीच समजणार नाही. म्हणजे असं ज्ञान की, तुझ्या सारख्या अशिक्षिताला ते कधीच समजणार नाही.’’ हे ऐकून तो सगळी पुस्तकं पाण्यात फेकून देतो. रुमी धावत जाऊन ती पुस्तकं पाण्यातून बाहेर काढतो आणि बघतो तर काय ती पुस्तकं चक्क कोरडीठाक असतात. तो त्याला विचारतो, ‘‘हे कसं शक्य आहे?’’ यावर मौलवी उत्तरतो, ‘‘तुझ्या सारख्या उच्चशिक्षिताला हे कधीच उमगणार नाही.’’

मग रुमी आणि त्याची मैत्री होते. तो रुमीचा गुरू बनून त्याला आध्यात्मिक दुनियेत आणतो. पुढे शम्स तबरेजीचा खून होतो किंवा काही जण म्हणतात की, तो अचानक गायब होतो आणि त्याच्या प्रेमामध्ये, मैत्रीमध्ये डुबलेला रुमी जे काही लिहितो ते अजरामर होतं. त्याच्या कित्येक कविता त्याने आपल्या गुरूवरील प्रेमाला समर्पित केल्या आहेत. याच काळात रुमीने गोल गोल चकरा घेत या कविता गुणगुणायला सुरुवात केली. देवाचं नाव घेता घेता तो गिरक्या घेतो आणि त्या तालाशी, लयीशी आणि देवाशी एकरूप होतो. हे गोल गोल फिरणं नंतर त्याच्या कित्येक भक्तांनी, शिष्यांनी अंगीकारलं.

रुमीच्या कविता इंग्रजीमध्ये आणल्या त्या कोलमन बार्क्स यांनी. गहिरा अर्थ असणाऱया या कवितांचा आत्मा कायम राखून बार्क्स यांनी केलेले भाषांतर म्हणजे तमाम रुमी प्रेमिकांसाठी पर्वणीच आहे. रुमीची कविता आणि कोट अगदी सहजसोपे असूनही त्याला खूप पदर आहेत. आपण त्यातून काय आणि कसा अर्थ काढतो हे आपल्या संवेदनशीलतेवर अवलंबून आहे आणि त्यामुळेच मला तो खूप भावतो. प्रेमावर, आयुष्यावर जे तो सांगतो त्याने आपल्या दृष्टिकोनात खूप फरक पडतो हे नक्की. अस्थिर पाण्यात भोवतालचे लोक सतत दगड मारत असले तरीही ते पाणी स्थिर राहावं आणि त्या दगडांचा त्याच्यावर काहीही परिणाम न व्हावा…इतकी ताकद रुमीच्या लिखाणात आहे. असं स्थिर,शांत राहणं जमवायलाच पाहिजे. काही क्षणांसाठीच का होईना, पण आतला तळ दिसेल इतकं शांत होणं जमायला पाहिजे आणि हीच रुमीची खरी शिकवण आहे. त्याचे काही कोट आपण उलगडून पाहूया.

“You were born with wings, why prefer to crawl through life?”
रुमी म्हणतो, ‘‘तुझा जन्म पंखांसमवेत झाला आहे, मग तरीही आयुष्यभर तू सरपटत का जगतोस ?’’ किती साधंसरळ वाक्य आहे, पण अर्थ केवढा दडलाय त्याच्यात! आपल्या सर्वांच्या मध्ये गुणांचा खजिना असतो, आपल्यामध्ये प्रचंड क्षमता असतात, पण आपण त्यांना ओळखत नाही. आपल्याला ते जमणारच नाही असं समजून प्रयत्न करत नाही आणि स्वतःला कोसत राहतो. आपल्याला जे काही ईश्वराने दिले आहे त्यासाठी त्याचे आभार मानायचे दूरच…आपण जे नाही त्यासाठी अश्रू ढाळतो आणि ज्या जागेवर फुलं बहरू शकतात त्या जागेला म्हणजे आपल्या मनाला जीव नसलेलं ओसाड माळरान बनवून टाकतो. बघा, एका छोट्याशा वाक्यात किती वेगवेगळे अर्थ दडले आहेत!

प्रेमावर रुमी म्हणतो, ‘‘If you find me not within you, you will never find me. For I have been with you, from the beginning of me.” …’’ अहाहा… कहर म्हणतात तो हाच. जर तू मला स्वतःच्या आत शोधलंस आणि मी तुला सापडलो नाही तर मग मी तुला कधीच सापडणार नाही. कारण मी तुझ्या बरोबर माझ्या सुरुवातीपासून आहे. आपण प्रेमात पडतो, त्या व्यक्तीशिवाय राहू शकत नाही, त्याच्या बरोबर आयुष्य एकत्र घालवण्याची स्वप्नं बघतो वगैरे . हे सगळं ठीक, पण फक्त आणि फक्त काही खास लोकांना अशा प्रेमाची अनुभूती घेता येते जी त्यांना ईश्वराशी एकरूप झाल्याची अनुभूती देऊन जाते. कित्येकदा आजूबाजूच्या लोकांना, समाजाला हे प्रेम समजत नाही. कारण त्यामध्ये कोणतीच अपेक्षा ठेवली जात नाही. अगदी एकत्र राहण्याचीसुद्धा.

वेगवेगळं राहून, आपापलं आयुष्य जागूनही जेव्हा दोन लोक एमकेकांवर अफाट प्रेम करतात, समाजाच्या, तर्काच्या आणि सो कॉल्ड नीतिमत्तेच्या खुळचट कल्पनांना छेद देऊन एकमेकांसाठी उभे राहतात आणि ज्यांना प्रेम करण्यासाठी दुसऱयाने आपल्यावर प्रेम करावं अशीदेखील अपेक्षा नसते अशा खऱयाखुऱया आशिकांसाठी रुमीने हे लिहिलेलं खरं आहे. अनेक महान कवी, लेखकांनी लिहिलेलं आहे की, जर तू स्वतःमध्ये डोकावशील तर तिथेही तुला मीच दिसेन! मला कधीच हे वाक्य पटलं नाही. का ते रुमीच्या या वाक्यामुळे समजलं. कारण रुमी एवढय़ावरच थांबला नाही. तो कारण सांगतो की, ‘‘जेव्हापासून मी आहे, तेव्हापासूनच मी तुझ्यात आहे. मी कायम तुझ्या बरोबर आहे.’’ ती प्रियकराशी इतकी एकरूप झाली आहे की, ती त्याला म्हणते, ‘‘तू माझ्या बरोबर नसलास तरीही मी कळती झाल्यापासून तू माझ्याबरोबर सतत आहेस. म्हणजे माझ्या अस्तित्वाची मुळं तुझ्यामध्ये एकरूप झाली आहेत. माझं प्रेम हे केवळ प्रेम नसून ती भक्ती आहे. किती आणि काय काय लिहावं रुमीबद्दल! आणि म्हणून हा शेवटचा कोट
“Absorbed in this world, you’ve made it your burden. Rise above this world.There is another vision”
रुमी सांगतो की, आयुष्याच्या ओझ्यापलीकडे जाऊन जीवनाला बघ. तुला त्याच्याकडे बघण्याची वेगळी दृष्टी गवसेल. आशा आहे की, आपल्या सर्वांना जर आयुष्यात दुःखं आली तर आयुष्याकडे वेगळ्या पद्धतीने बघण्याची दृष्टी गवसेल आणि प्रेमाला साद घालायची ऊर्मी मिळेल.
[email protected]