सदानंद चांदेकर – एक हसरं वादळ


>> प्रा. कृष्णकुमार गावंड

सदानंद- झपाटा हे समीकरण तब्बल सहा वर्षांहून अधिक टिकले. हादेखील सदानंदकरिता एक वैयक्तिक विक्रम म्हणावा लागेल. या काळातील आठवणींचा खजिना प्रचंड आहे. केवळ अभिनेता म्हणून नव्हे तर एक उत्कृष्ट चित्रकार, अभ्यासू व कल्पक visualiser म्हणूनही त्याची ओळख झाली. ‘झपाटा’नंतर सदानंदने ‘हसरी उठाठेव’ या एकपात्री कार्यक्रमाचा शुभारंभ करून स्वतःचे स्वतंत्र स्थान निर्माण केले.

१३ मार्च (२०१८) सकाळी आठच्या सुमारास सौरभचा फोन आला. ‘गावंडकाका, बाबा गेले.’ सदानंद चांदेकरांचा मुलगा सौरभ माझ्याशी बोलत होता. ‘काल रात्री गोरेगावला गेले. पण आता तुम्ही पुण्याला पोहोचल्यावर तुम्हाला कळवतोय. अंत्यसंस्कार दुपारी पुण्यातच होतील.’

सगळंच अनपेक्षित होतं. काही दिवसांपूर्वीच मी सदानंदशी मोबाईलवर बोललो होतो. ‘काय चांदेकर, माझ्या पुण्यातील ‘शंकर-जयकिशन’विषयच्या कार्यक्रमाला तुम्ही आला नव्हता. त्यामुळे मला परफेक्ट फिडबॅक (Perfect feedback) देणारा कोणीच नव्हता.’याचं कारण म्हणजे सदानंद केवळ नकलाकार (Mimicry Artist) किंवा एकपात्री करणारा गुणी कलाकार नव्हता तर रंगभूमीवर सादर होणाऱया कलेचा खरा अभ्यासक होता. अशा सदानंदचे व आमच्या ‘सिंफनी’संस्थेचे सूर असे काही जुळले की त्यातूनच ‘झपाटा’सारख्या कलाकृतींची निर्मिती झाली. ऑर्केस्ट्रा देशात काहीतरी वेगळं सादरीकरण असावं अशा हेतूने आम्ही चारजण (वसंत खेर, मी, श्रीकांत कुलकर्णी व किरण शेंबेकर) सतत प्रयत्नशील होतो आणि शिवाजी मंदिरमधील व्यवस्थापक व निर्माते हरी पाटणकर यांच्यामुळे पुरुषोत्तम बेर्डेसारख्या हुशार, कल्पक व अभ्यासू दिग्दर्शकाशी आमची ओळख झाली आणि ‘झपाझप पावले टाकत’ ‘झपाटा’ने इतिहास घडवला. यामागे मिमिक्री क्षेत्रातील कमलाकर वैशंपायन आणि सदानंद चांदेकर या जोडगोळीचा अनुभव आणि तपश्चर्या या गोष्टी कारणीभूत आहेत.

आज साठीचा उंबरठा ओलांडणाऱया अनेकांनी आपल्या लहानपणी ‘ऑर्केस्ट्रा’ची ‘क्रेझ’ नक्कीच अनुभवली असेल. परंतु जवळजवळ १९५० पासून १९८० पर्यंत ऑर्केस्ट्राचा फॉरमॅट एकच होता. चित्रपटगीते, नृत्य आणि मध्ये रिलीफ म्हणून नकलाकार मिमिक्री सादर करायचे. या प्रकाराला आम्ही अक्षरशः कंटाळलो होतो आणि सदानंददेखील विटला होता. कारण त्याची मिमिक्री इतर नकलाकारांपेक्षा वेगळी असायची. केवळ फिल्मी नटांच्या (ठरावीक लोकप्रिय आवाज- अशोककुमार, ओमप्रकाश, राजकुमार, शत्रुघ्न सिन्हापासून आजच्या शाहरुख, नाना पाटेकरपर्यंत) आवाजाचे अनुकरण करून प्रेक्षकांची दाद मिळवणारे जॉनी व्हिस्की, क्रूक ऍण्ड क्रॅकपासून आजच्या सुदेश भोसलेंपर्यंत सातासमुद्रापलीकडेही लोकप्रिय झाले. जॉनी लिव्हरने आपला Brand निर्माण केला व चित्रपटसृष्टीतही आपले वेगळे स्थान निर्माण केले.

परंतु सदानंदची खासियत म्हणजे त्याच्या मिमिक्रीला अभिनयाची जोड होती व त्यामुळेच आम्ही त्याच्या प्रेमात पडलो. कमलाकर वैशंपायन यानेदेखील आपलं वेगळेपण जपलं होतं व त्याच्या स्क्रिप्टमध्ये वेगळाच जर्म असायचा. या दोघांबरोबर झालेल्या चर्चांमधून आम्ही Fool Timepass नावाचं तीनपात्री नाटक रंगभूमीवर आणलं. (यामध्ये सुरेश निमकर या गुणी कलाकाराचा सहभाग होता.) या नाटकाचं कौतुक माधव मनोहर, राजा कारळे, कमलाकर नाडकर्णी, प्रदीप भिडेंसारख्या बुजुर्ग व्यक्तींनी केलं. त्यामुळे आमचाही आत्मविश्वास वाढला आणि ऑर्केस्ट्रामध्ये नाटय़मय कॉमेडी (Comedy skits) चा उगम झाला. ‘झपाटा’च्या सादरीकरणातून अनाऊन्सर किंवा आजच्या शब्दात ‘अँकर’ या कॅरेक्टरची चक्क उचलबांगडी झाली. दोन गाण्यांमधील गॅप्स आता कमलाकर, चांदेकर यांच्या विविध वेषातील असंख्य विषयांवरील विनोदी स्क्रिप्टने रंगू लागल्या.

सदानंद- झपाटा हे समीकरण तब्बल सहा वर्षांहून अधिक टिकले. हादेखील सदानंदकरिता एक वैयक्तिक विक्रम म्हणावा लागेल. या काळातील आठवणींचा खजिना प्रचंड आहे. केवळ अभिनेता म्हणून नव्हे तर एक उत्कृष्ट चित्रकार, अभ्यासू व कल्पक Visualiser म्हणूनही त्याची ओळख झाली. ‘झपाटा’नंतर सदानंदने ‘हसरी उठाठेव’ या एकपात्री कार्यक्रमाचा शुभारंभ करून स्वतःचे स्वतंत्र स्थान निर्माण केले. याचे श्रेय तो बुजुर्ग व आपले लाडके व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांना देत असे. पु.लं.च्या साहित्याचे सादरीकरण करण्याच्या हेतूने तो पु.लं.च्या घरी गेला होता. तेव्हा ‘सदानंद, तुझ्या आयुष्यातल्या अनुभवांवर आधारित छान स्क्रिप्ट तू लिहू शकशील.’ हा सल्ला ऐकून सदानंदचा आत्मविश्वास वाढला आणि ‘हसरी उठाठेव’चा शुभारंभ झाला.

अशा अनेक आठवणींचा संग्रह सदानंदने २०११ साली ‘आम्ही दिवटे’नावाने प्रकाशित केला. हे आत्मकथन वाचताना त्यांच्या बालपणापासून ते आजपर्यंतचा प्रवास अनेक प्रकारच्या भावनांनी ओथंबून गेल्याचे जाणवते. आजी-आजोबांपासून पत्नी स्व. हेमाबरोबर व्यतीत केलेले अनमोल क्षण अनुभवताना डोळे पाणावतात. वेगवेगळय़ा स्तरांवरील मित्रमैत्रिणींच्या, हितचिंतकांच्या गराडय़ात सदानंदचे आयुष्य पूर्णपणे घुसळून निघाल्याचे जाणवते.

मी स्वतःला निश्चितच भाग्यवान समजतो. कारण काही महिन्यांपूर्वीच मी सदानंदकडे माझ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने दोन दिवस राहिलो होतो. या दोन दिवसांत अनेक वर्षांतील डायऱयांची उजळणी झाली. कित्येक कडुगोड प्रसंग rewind केले गेले, पण त्यावेळी सदानंद नावाचं हसरं वादळ अचानकपणे शांत होईल अशी कल्पनाही नव्हती.