प्रासंगिक : सद्गुरू सखाराम महाराज

>>अरुणकुमार कुळकर्णी<<

मराठवाडय़ात जन्मलेले, परंतु वैदर्भीय संत म्हणून प्रख्यात असलले श्री क्षेत्र लोणी (ता. रिसोड, जि. वाशीम) येथील सद्गुरू सखाराम महाराजांचा 140 वा पुण्यतिथी महोत्सव आणि रथयात्रा लोणी येथे 6 डिसेंबर 2018 रोजी संपन्न होत आहे. त्यानिमित्त हा लेख.

वाशीम जिह्यातील रिसोड तालुक्यातील लोणी हे गाव प्रसिद्ध आहे श्री संतश्रेष्ठ सद्गुरू श्री सखाराम महाराजांमुळे. शिर्डीचे साईबाबा, शेगावचे श्री गजानन महाराज, खामगावचे राष्ट्रसंत पाचलेगावकर महाराज, अकोटचे श्री नरसिंग महाराज, लोणी टाकळीचे संत गुलाबराव महाराज, यावलचे राष्ट्रसंत ‘ग्रामगीता’कार तुकडोजी महाराज, शेंडगावचे कर्मयोगी गाडगेबाबा, वरूडचे संत अच्युत महाराज, मंगरूळ पीरचे संत बिरबलनाथ महाराज, पोहरादेवीचे संत सेवालाल महाराज इ.सह अनेक संतांच्या जन्माने, वास्तव्याने वा कार्याने विदर्भाची भूमी पवित्र झाली आहे.  याच रत्नमालेतील एक रत्न म्हणजे संत श्री सखाराम महाराज.

श्री संत सखाराम महाराजांचा जन्म मराठवाडय़ातील तळणी जिल्हा जालना येथे रामनवमीला 9 एप्रिल 1786 रोजी झाला. पूर्वीची दोन अपत्ये असलेल्या अहल्या यांना तिसऱ्यांदा सखारामाच्या जन्मापूर्वी लागलेले डोहाळे थोडय़ा वेगळय़ा स्वरूपाचे होते. भागवत श्रवण, अरण्यवास, योगियांचा सत्संग, काशीविश्वेश्वराचे दर्शन, गंगास्नान करावे असे त्यांना वाटू लागले. सखारामाचा जन्म झाल्यानंतर त्यांचे वेद अध्ययन वाशीम येथे झाले. वेदशास्त्रसंपन्न बाळशास्त्री हे त्यांचे गुरू.

नाममात्र विवाह संस्कार व हळदीचा डाग सोडल्यास महाराज आजीवन ब्रह्मचारी जीवन जगले. वाशीम येथील पद्मतीर्थ, रिसोड येथील श्री पिंगलाक्षी देवी, लोणार सरोवरातील कमळजादेवी या पवित्र ठिकाणांनंतर काशीला गंगेमध्ये जलस्तंभ योगाद्वारे महाराजांनी खडतर तपश्चर्या करून त्यांनी आपल्या आईला भागीरथीचे दर्शन घडवून दिले. तिथून मजल दरमजल करीत ते रिसोडजवळील लोणी या ठिकाणी आले. भोलानाथला मायावी वन निर्मिती करून पांडुरंगाचे दर्शन घडविले, तर एक शेर करडीचे सात मण तेल काढून वाल्हू तेली वाण्याचे दारिद्रय़ दूर केले. महाराज स्वतः मितभाषी तर होतेच, पण वैशिष्टय़ म्हणजे ते कोणत्याही भक्ताला पाया पडू देत नसत. अयाचित वृत्तीने आलेले डाळ, तांदूळ इ. एकत्र शिजवून अर्धा हिस्सा गोमाता, श्वान यांना दिल्यानंतर उर्वरित अन्न ते स्वतः भक्षण करीत.

जितुके मिळे मानवासी, त्यातील जाण चतुर्थाशासी

धर्मव्यय करावा रीत ऐसी, बरकत येण्याकारणे

वयाच्या 92 व्या वर्षी 23 नोव्हेंबर 1878 रोजी श्री संत सखाराम महाराज लोणी येथे समाधिस्थ झाले. हजारोंच्या संख्येने रथोत्सवात सहभागी भक्तगण महापंगतीतील प्रसादाची पुरवी घेऊन नेऊन धान्यात ठेवतात. त्यामुळे वर्षभर बरकत येते ही भाविकांची दृढ श्रद्धा आहे.