लेख : गोष्ट सांगण्याची कला

468

>> दिलीप जोशी 

माणूस तसा गोष्टी वेल्हाळ प्राणी. ‘गजाली’ ऐकणं आणि सांगणं हे जगातल्या प्रत्येक देशात, प्रत्येक भाषेत आणि प्रत्येक झाडाच्या पारावर वर्षानुवर्षे चाललेलं गप्पासत्र. खऱ्या-खोटय़ा, सत्य, ऐकीव, तिखटमीठ लावून सांगितलेल्या ‘गोष्टी’ काही काळ गंमत आणतात. ‘ऍप’ चर्चा होत नव्हत्या तेव्हा माणसं परस्परांना प्रत्यक्ष भेटून गप्पा छाटत असत असं कालांतराने लिहिलं जाईल.

मोठय़ांच्या गप्पागोष्टींचे विषय निराळे, विद्वत चर्चेपासून वादविवादापर्यंतचे, पण लहान मुलांच्या गोष्टींचं तसं नाही. लहानग्यांच्या मनात उत्सुकता जागवणाऱ्या गोष्टी कधी बोधप्रद तर कधी अद्भुत. आजीने नातवंडांना ‘गोष्ट’ सांगायची हा आपल्याकडच्या पूर्वीच्या कौटुंबिक रचनेतलाच एक भाग. या गोष्टी विशेषतः संध्याकाळच्या वेळेला रंगायच्या.

मला आठवतं, आमची आजी – आम्ही तिला मोठी आई म्हणायचो- ती रसाळ गोष्टी सांगायची. अंगणातल्या तुळशीपुढे सांजवात लागली की खेळून आलेली मुलं तिच्याभोवती गोळा व्हायची. आम्ही भावंडं आणि आणखी शेजारपाजारची चार मुलं-मुली. मोठी आईचा गोष्टींचा आवाका पुराणकथांपलीकडे जात नसे. दुपारी कीर्तन-प्रवचनात ऐकलेली एखादी गोष्ट ती रंगवून-रंगवून सांगायची. घराच्या चार पायऱ्यांचं ‘स्टेडियम’ व्हायचं. दारातल्या उंबऱ्यावर पाकोळय़ा भिरभिरायच्या. रातकिडय़ांची किरकिर सुरू होण्याच्या त्या कातरवेळी एखादी भुताबिताची गोष्ट आली तर सारी मुलं बावरून जायची. मग त्यावर उतारा म्हणून देवाची गोष्ट.

अशा गोष्टीतला अवास्तव फोलपणा मोठेपणी लक्षात आला, पण त्या काळात त्या अगदी खऱ्या वाटायच्या. मोठी आईचं सांगणंच असं की, ती घटना प्रत्यक्ष नजरेसमोर घडतेय असं वाटायचं. त्यातल्या खरेखोटेपणाची शहानिशा करायचं ते वयच नसायचं. आता लक्षात राहिली ती गोष्ट सांगण्याची कला. विविध पात्रं सादर करतानाचे आवाजाचे चढउतार, श्रावण बाळाची गोष्ट सांगताना तिच्या नि आमच्याही डोळय़ांत पाणी यायचं. त्या गोष्टींमधली चित्र नजरेपुढे आणत जो तो आपल्या बालबुद्धीने विचारात गढून जायचा. या गोष्टींनीच पुढे एखाद्या ‘गोष्टी’तलं तारतम्य जाणून घ्यायला नकळत शिकवलं. राशी, नक्षत्रांची माहिती करून दिली. ऐतिहासिक गोष्टीतून इतिहास कळला. कधी कधी ती आम्हाला ‘कोडं’ घालायची.

‘‘सांगा बघू… ‘बत्तीस चिरे त्यात नागीण फिरे’ म्हणजे काय?’’ आम्ही आधी परस्परांकडे आणि मग उत्सुकतेने तिच्याकडे बघायचो. ‘अरे, सोपं आहे. बत्तीस दातांच्या चिऱ्यांमध्ये फिरणारी जीभ.’

‘चिरे म्हणजे? दातांना काय चिरे म्हणतात?’

बालसुलभ उत्सुकता आता प्रश्नोत्तरात रूपांतरित व्हायची.

‘चिरे म्हणजे दगड, आपले गड-किल्ले केवढाल्या मोठय़ा दगड-पाषाणातून बांधलेत ना! कोकणात जांभ्या दगडाचं चिऱ्यांचं घर नाही का आणलं? आम्हाला विचारलं जायचं, या छोटय़ाशा कोडय़ातून दगडाला म्हणजे पाषाण म्हणजे चिरा वगैरे शब्दसंग्रह आपोआप वाढायची . त्यासाठी ‘समानार्थी शब्द सांगा’असा कोरडा ‘व्यवसाय’ नसायचा.

एकदा रघुराजाची गोष्ट सांगताना आजी म्हणाली,

‘‘…आणि राजाने कौत्साला चौदा कोटी सुवर्णमुद्रा दिल्या!’

‘सुवर्णमुद्रा म्हणजे?’ एक बालप्रश्न

‘‘खूप पैसे सोन्याचे…’’

‘‘खोटे!’ एका बालस्वरातला अविश्वास! सगळय़ांचं जोरात हसणं

‘खोटे कसे असतील. खऱ्या सोन्याच्या मुद्रा.’’

‘‘…पण आमच्या ‘व्यापारा’तले पैसे खोटे आहेत असं बाबा म्हणतात.’’

‘‘ते वेगळं. तो खेळ आहे. ही गोष्ट खरी होती.’’

‘‘हं!’’

असल्या विचित्र संवादात ‘गोष्ट’ सांगणाऱ्याने चिडायचं नसतं, उलट मुलांच्या प्रामाणिक उत्सुकतेला त्यांच्या आकलनाच्या पातळीवर समजून घ्यायचं असतं हे तिला उपजत ठाऊक होतं. त्या चित्रविचित्र गोष्टींनी आमचं भावविश्व तर भारून टाकलंच, पण भाषासमृद्धी नकळत वाढली.

काळ बदलला. तो बदलतोच. आजीच्या गोष्टी ‘पेन ड्राइव्ह’पर्यंत आल्या, पण आजीभोवती कोंडाळं करून ऐकलेल्या गोष्टीची अनुभूती त्यातून कशी येणार! शिवाय ‘गोष्ट’ सांगणं ही एक कला आहे. मुलांच्या मनातली उत्सुकता वाढवत, पण रसाळपणा किंचितही कमी न होता गोष्ट ‘सांगता’ यावी लागते. मला स्वतःला ते साधत नाही. पुढच्या काळात माझ्या भावाने आमच्या पुढच्या पिढीला गोष्ट सांगण्याचा ‘वसा’ सांभाळला. मला त्या गोष्टी ऐकल्या की, बालपण आठवायचं.

हे सारं स्मरणरंजन करण्याचं कारण म्हणजे अमेरिकेत आता एक ‘शोध’ लागलाय. कसला, तर जे पालक आपल्या मुलांना रोज रात्री पाच-सात गोष्टी वाचून दाखवतात, त्यांचा शब्दसंग्रह सुमारे 10-15 हजार शब्दांनी वाढतो. कारण चार-पाच वर्षांत त्यांच्या कानावरून नवेनवे लाखो शब्द जातात. तेव्हा ‘रीड युवर किडस् ऍट बेडटाइम’ असा संदेश तिथल्या नवदांपत्याना दिला जातो. त्यांच्या संस्कृतीत गोष्ट सांगायला ‘आजी’ बहुदा जवळ नसतेच. चौकोनी कुटुंबातल्या तरुण पालकांना गोष्टी रचून सांगण्याइतकी फुरसत कुठली! त्यासाठी सुंदर पुस्तकं असतात. ‘ती तरी मुलांना वाचून दाखवा’ असं आवाहन करावं लागत. बालपणी ‘व्हॉकॅब्युलरी’ किंवा शब्दसंग्रह सहज वाढतो. शब्द मुद्दाम ‘पाठ’ करावे लागत नाहीत. ‘जे सहज घडतं ते गमावू नका’ असा यातला संदेश आहे.

अगदी पाल्हाळ लावून नको, पण छोटय़ा छोटय़ा ‘वेल्हाळ’ गोष्टी छोटय़ा मुलांना ‘वाचून’ दाखवण्यापेक्षा त्यांना सांगणं जास्त प्रभावी, परंतु त्यांच्या हाती सेलफोन किंवा टॅब देऊन त्यांना ‘गप्प’ बसवण्यापेक्षा त्यांना गोष्ट ‘वाचून’ सांगणं हेसुद्धा उत्तम. त्यातून दोन पिढय़ांतली जवळीक वाढतेच, पण मुलांच्या मनात पालकांविषयी आदराची भावनाही वाढीला लागते. बालपणीच्या ‘गोष्टी’मधून नकळत मनात रुजलेला शब्दसाठा पुढच्या आयुष्यात शब्दसामर्थ्य म्हणून उपयोगाला येतो. ‘बालगोष्टी’ची ही गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी, प्रत्यक्षात आणावी अशीच. योगायोगाने ‘गोष्टी’ची गोडी लावणाऱ्या साने गुरुजींचा आज स्मृतिदिन.

आपली प्रतिक्रिया द्या