लेख : महान शिवभक्त संत नरहरी

>>नामदेव सदावर्ते<<

संत नरहरींची शिवभक्ती पाहून साक्षात श्रीपांडुरंगांनी त्यांना परब्रह्माच्या निर्गुण निराकार अशा विश्वव्यापक सत्य स्वरूपाची ओळख करून दिली. त्यामुळे श्रीनरहरींना पांडुरंगातच शिवशंकराचे दर्शन घडू लागले. संत नरहरींचे अंतरंग विठ्ठलमय झाले. ज्ञानेश्वरनामदेवांच्या वैष्णव मेळय़ात ते सामील झाले. वारकरी संप्रदायाची पताका खांद्यावर घेतली तरी त्यांना सर्वत्र शिवपार्वतीचे दर्शन घडत होते.

महान शिवभक्त संत नरहरी हे तेराव्या शतकात शके 1235 मध्ये श्रावण शु. 9 या तिथीस श्रीक्षेत्र पंढरपूर येथे जन्मास आले. त्यांचे माता-पिता शिव-पार्वतीचे अनन्यभक्त होते. शिवपूजा आराधना करीत असताना त्यांच्या मुखातून सतत शिवमहिम्न स्तोत्र, शिवलीलामृत यांचे पठण चालू असे. त्या शिव-पार्वती स्तुती श्लोक श्रवणाचा संस्कार नरहरींच्या कानावर व मनावर होत होता. त्यामुळे बालपणीच नरहरी शिवस्तोत्रे म्हणू लागले. मातापित्यांकडून झालेल्या श्रवणसंस्कारामुळे छोटय़ा नरहरीला शिवस्तोत्रे तोंडपाठ झाली होती.

रोज शंकराच्या मंदिरात जाऊन शिवपूजन, शिवस्तोत्र पठण करण्यात बालनरहरीला असीम आनंद होत असे. एकचित्त होऊन मनोभावे ते शिवपूजन करीत असत. सुवर्णकार कामाचा व्यवसाय करून ते प्रपंच चालवीत असत. शिवाची एकविध भक्ती करणाऱया नरहरी यांना पंढरीतील एका सावकाराने विठ्ठलमूर्तीस सोन्याचा कमरपट्टा करण्याचे काम दिले. नरहरी फक्त शिवाचेच भक्त होते. अन्य देवतेकडे ते पाहत नसत. डोळ्यांना पट्टी बांधून विठ्ठलाच्या कमरेचे माप घेण्यास प्रारंभ केला. विठ्ठलमूर्तीस स्पर्श केल्यावर तिथे विठ्ठलमूर्ती नसून शिवलिंग आहे असा त्यांना अनुभव आला. त्या क्षणापासून त्यांच्या मनातला हरिःहर हा भेद नाहीसा झाला. शिव-विष्णू हे एकच असल्याचा त्यांना साक्षात्कार झाला. ते म्हणतात-

देवा, मी तुझ्यासाठी सुवर्णाचे दागिने बनवून देणारा असून मी तुझ्या नामाचाच सतत व्यवहार करतो. देह हा दागिना व आत्मा हे सोने आहे. त्रिगुणाच्या मुशीत हा ब्रह्मरस ओतला आहे. शिव-शिव असे मुखाने नामस्मरण करून मी रात्रंदिवस अग्नी फुंकतो. विवेकरूपी हातोडा हाती घेऊन मी कामक्रोधांना सतत मारत असतो.

संत नरहरींची शिवभक्ती पाहून प्रसन्न झाल्यामुळे साक्षात् श्रीपांडुरंगांनी त्यांना परब्रह्माच्या निर्गुण निराकार अशा विश्वव्यापक सत्य स्वरूपाची ओळख करून दिली. त्यामुळे श्रीनरहरींना पांडुरंगातच शिवशंकराचे दर्शन घडू लागले. संत नरहरींचे अंतरंग विठ्ठलमय झाले.

ज्ञानेश्वर-नामदेवांच्या वैष्णव मेळ्यात ते सामील झाले. वारकरी संप्रदायाची पताका खांद्यावर घेतली तरी त्यांना सर्वत्र शिव-पार्वतीचे दर्शन घडत होते. हा अनुभव ते एका अभंगात व्यक्त करतात.

भोळा हा शंकर पुढे नंदीश्वर । तिथे मी पामर काय वर्णू ।।

भूषण जयाचे भूवना वेगळे । रुंड माळा खेळे गळ्यामध्ये ।।

कर्पुर गौर भोळा सांब सदाशिव । भूषण धवल विभूतीचे ।।

माथा जटाभार हाती तो त्रिशूळ । श्वेत शंख बळे फुंकितसे ।।

नाम घेता ज्याचे पाप ताप जाती । पापी उद्धरती क्षणमात्रे ।।

शिव आणि विष्णू या दोघात तत्त्वतः काहीच भेद नाही हे साक्षात्काराने जाणले असल्याने ते सतत शिव-विष्णूचे अभेदपण आपल्या अभंगांतून प्रकट करीत असत. संत नरहरींचे भावविश्व विठ्ठलमय झाले होते. त्यांच्या अंतःकरणरूपी शिवालयात शिवशंकर व श्रीहरीपांडुरंग यांचे एकरूप स्वरूप विराजमान झाले होते.

भक्तीशिवाय केलेला प्रपंच हा तापदायक व कष्टमय होतो. संसार असार व क्षणभंगुर असून केवळ नामस्मरण भक्ती उपासनेने कष्ट, दुःख नष्ट होऊन प्रपंचातही जीव सुखी, संतोषी होतो. आत्मसुख, मनःशांतीच्या प्राप्तीसाठी चारित्रसंपन्न जीवन जगण्याचा प्रयत्न करावा. द्वेषरहित मन करून ईश्वरउपासना व नामस्मरण करावे.

कितीही मोठा ईश्वरभक्त असला तरी जोपर्यंत त्याच्यावर सद्गुरूंची कृपा लाभत नाही तोपर्यंत त्याला ईश्वराच्या सत्य व विश्वव्यापक स्वरूपाचे ज्ञान व दर्शन घडत नाही. साक्षात्कारी, सदाचारसंपन्न, ब्रह्मनिष्ठ व विरागी अशा गुरू गैबीनाथ यांना नरहरी शरण गेले. त्यानंतर त्यांना सद्गुरू गैबीनाथांचा अनुग्रह लाभला. त्यानंतर त्यांना सर्वत्र पांडुरंगरूप दिसू लागले. ते म्हणतात-

जग हे अवघे सारे ब्रह्मरूप । सर्वांभूती एक पांडुरंग ।।

अणूरेणूपर्यंत ब्रह्म भरीयेले । सर्वांघटी राहिले अखंडित ।।

ईश्वरनामस्मरण हेच सर्वधर्माचे सार आहे. नामस्मरणाच्या साधनेत मानसिक, नैतिक, आध्यात्मिक उन्नतीचे सामर्थ्य आहे. विषयचिंतनाने देहअहंकार, भोगप्रेम दृढ होते. तर नामस्मरणाने अहंकार नष्ट होतो. सर्वत्र ईश्वरभाव प्रतित होतो. विश्वात्मक देवाचे दर्शन घडते. ते म्हणतात-

सकळ धर्माचे कारण । नामस्मरण हरिकीर्तन ।।

दया क्षमा समाधान । घ्यावे संतांचे दर्शन ।।

संत संग वेगी । वृत्ती जडो पांडुरंगी ।।

विठ्ठलभक्तीप्रमाणेच संतसंगतीचेही त्यांना आकर्षण होते. सद्गुरू श्रीनिवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्वर, सोपानदेव, मुक्ताई या भावंडांवर त्यांची श्रद्धा व भक्ती होती. वारकरी संप्रदायाचे सर्वसमावेशक धोरण व भक्तीची सोपी नामस्मरण उपासना यावर त्यांचा विश्वास होता. संत नामदेवांचे एकविध, विश्वव्यापक भक्तीचे तत्त्वज्ञान संत नरहरींना प्रिय होते. संत नरहरी विठ्ठलाचे एकनिष्ठ भक्त झाले.

पंढरी नगरी दैवत श्रीहरी । जाती वारकरी क्रत नेमे ।।

आषाढी कार्तिकी महापर्वे थोर । भजनाचा गजर करिती तेथे ।।

साधुसंत थोर पताकांचा भार । मुखी तो उच्चार नामअमृत ।।

आनंदाचा काला गोपाळकाला केला । हृदयी बिंबला नरहरी ।।

संत नरहरी शिवभक्तीही करत होते. ते अभंगातून प्रकट होत असे. संत नरहरी म्हणतात-

भस्म उटी रुंड माळा । हाती त्रिशूल नेत्री ज्वाळा ।।

गज चर्म व्याघ्रांबर । कंठी शोभे वासुकी हार ।।

भूते वेताळ ती नाचती । हर्षयुक्त उमापती ।।

सर्व सुखाचे आगर । म्हणे नरहरी सोनार ।।

भक्तीच्या सर्वोच्च शिखरावर विराजमान होऊन, शिवस्वरूपात विलीन झालेले संत नरहरी शके 1314 माघ कृ.3 या तिथीस पुण्यक्षेत्र पंढरपूर येथे समाधिस्त झाले.