पत्रांमधून उलगडणारे सयाजी महाराज गायकवाड

>> डॉ. विशाल तायडे

बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांचे वाङ्मयप्रेम आणि ग्रंथप्रसाराबद्दल असलेला जिव्हाळा सर्वश्रुत आहे. त्यांच्याच प्रेरणेतून बडोद्यात मराठी वाङ्मय परिषदेची स्थापना झाली. शिवाय सयाजीरावांच्या पत्रव्यवहारातूनही त्यांचे साहित्यप्रेम आणि भाषाप्रभुत्व दिसून येते. बडोद्यात होणाऱया ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने तेथील साहित्यविश्वाचा हा परिचय…

स्वातंत्र्यपूर्व काळात हिंदुस्थानात शेकडो राज्ये अस्तित्वात होती. त्यातल्या मोजक्याच राज्यांची इतिहासात ठळकपणे नोंद झालेली आहे. स्वतंत्र बाण्याने, स्वतःचा स्वाभिमान न गमावता राज्य करणाऱया फार थोडय़ा राजांना आजही आपण लक्षात ठेवतो. त्यात अग्रक्रमाने नाव घ्यावे लागते ते बडोद्याच्या सयाजी महाराज गायकवाड यांचे.

आपल्यातील बहुतांशी वाचकांसारखी मलाही सयाजी महाराजांविषयी जुजबी माहिती होती. कारण त्यांच्याविषयी विस्ताराने लेखन झालेले नव्हते. पाठय़पुस्तकात वाचलेले आणि त्यांच्या सुधारणावादी धोरणांसंदर्भात वाचलेले काही लेख यापलीकडे सयाजी महाराज गायकवाड आपल्याला माहीत नसतात.

एक दिवस ज्येष्ठ साहित्यिक श्री. बाबा भांड यांनी महाराष्ट्र शासनाच्या वतीने सयाजी महाराजांवर सुरू असलेल्या महाप्रकल्पात सहभागी होता का, अशी विचारणा केली. नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता. लगेच भांड सरांनी महाराजांच्या पत्रांचा संग्रह माझ्यासमोर ठेवला. ते म्हणाले, ‘‘ही ४२५ पत्रं आहेत. महाराजांनी स्वतः लिहिलेली किंवा त्यांच्या वतीने इतरांनी लिहिलेली.’’
त्या वेळी बापरे! महाराजांनी इतकी पत्रं लिहिली होती? अशी प्रतिक्रिया मी व्यक्त केली. त्यावर त्यांनी सांगितले की, हा झाला एक खंड, असे पाच खंड होतील, इतकी पत्रं सयाजी महाराजांनी लिहिलेली आहेत. हे मला आश्चर्याचा धक्का देणारं होतं. काय लिहिलं असेल महाराजांनी इतक्या पत्रांमधून? हा माझ्यासाठी कुतूहलाचा विषय होता. ही इंग्रजी पत्रं मी झपाटल्यागत वाचून काढली. त्यातून सयाजी महाराज गायकवाड नावाचं एक भन्नाट व्यक्तिमत्त्व उलगडत गेलं. प्रत्येक पत्रागणिक मी त्यांना समजून घेत गेलो. त्यांचा चाहता झालो. आपल्या आयुष्यातील चौसष्ठ वर्षे इतका दीर्घकाळ महाराज गादीवर होते. सर्व कालखंड हिंदुस्थानवर ब्रिटिश राज्यसत्ता होती तेव्हाचा. अशा काळात एखाद्या हिंदुस्थानी राजाने इतक्या प्रदीर्घ काळापर्यंत राज्य करणे सोपे नव्हते. तथापि सयाजी महाराजांनी ते करून दाखवले.

महाराजांना अनेकदा वेगवेगळय़ा कारणांनी परदेशात जावं लागलं होतं. त्यांच्या परदेशगमनाच्या अशा सव्वीस सफरींची नोंद आहे. या सफरींचा अभ्यासपूर्ण दस्तऐवज आजही अतिशय विस्तृत स्वरूपात उपलब्ध आहे. महाराज परदेशात जरी असले तरी आपल्या राज्यातील, बडोद्यातील प्रत्येक घडामोडीवर त्यांचे लक्ष असायचे. त्या काळात आजच्यासारखी वेगवान संपर्कमाध्यमे अस्तित्वात नव्हती. पत्र हाच संपर्क ठेवण्याचा मार्ग होता. महाराजांनी या माध्यमाचा पूर्ण उपयोग करून घेतला. सयाजी महाराजांनी लिहिलेल्या पत्रांची काही वैशिष्टय़े आहेत. त्यांच्या पत्रलेखनाला एक शिस्त होती. प्रत्येक पत्र हे दिनांकित असायचे. तसेच ते त्यांनी कुठून लिहिलेले होते याचीही सविस्तर नोंद ते करून ठेवत. एखादं पत्र आकाराने मोठे असेल, तर त्याचे मुद्दे करीत. त्या मुद्दय़ांना क्रमांक देत. या मुद्देसूदपणामुळे वाचणाऱयाला पत्रातील आशय समजून घ्यायला सोपे जात असे. महाराजांच्या पत्रांमध्ये मला सर्वांत भावलेली बाब म्हणजे त्यांची भाषा. ओघवती, शैलीदार आणि आदबशीर. मानवता हा त्यांच्या एकूणच व्यक्तिमत्त्वाचा महत्त्वाचा पैलू होता. त्यांच्या पत्रांमधूनही याची प्रचीती येते. एखाद्याविषयी नाराजी जरी व्यक्त करायची असेल तरी तो दुखावणार नाही याची काळजी महाराज घेतात. प्रसंगी आपल्यापेक्षा लहान व्यक्तीचीही ते सहजपणे माफी मागतात.

युरोपात इलाजासाठी गेलेले असताना त्यांनी पत्रांच्या माध्यमातून बडोद्यातील राज्य कारभारावर लक्ष ठेवलेले होते. सयाजी महाराज गायकवाड हे राजा असले तरी लोकशाही मार्गाने राज्य करणारे राजे होते. त्यांच्या पत्रांमधून हे स्पष्ट दिसून येते. मी अनुवादित केलेल्या पत्रांमधून मला त्यांचा आणखी एक पैलू भावला, तो म्हणजे महाराजांची स्मरणशक्ती. परदेशात असला तरी कायम आपल्या राज्याविषयी विचार करणारा हा राजा होता. राज्य कारभारात कनिष्ठ पदांवर काम करणाऱया व्यक्तींविषयीही ते खडान्खडा माहिती ठेवून असत. त्याचा संदर्भ अनेक पत्रांमध्ये आढळतो. अनेक जुने संदर्भ त्यांच्या कायम लक्षात राहात. बडोद्यातील अधिकाऱयांना राज्य कारभाराविषयी मार्गदर्शन करताना महाराज आपले म्हणणे दुसऱयावर लादताना दिसत नाहीत, तर आपला मुद्दा अनेक संदर्भ देत ते पटवून देतात. माझ्याकडून काही चूक होत असेल तर लक्षात आणून द्या, असे सुचविणारा राजा विरळाच.

राज्याबाहेर असताना सयाजी महाराज राज्य कारभाराविषयी अनेक आदेश पत्रांमधूनच देत असत. तसेच दिलेल्या आदेशांची नीट अंमलबजावणी होते की नाही, याचाही आढावा घेत असत. त्यात त्रुटय़ा आढळल्या तर संबंधितांना समजही देत असत. पत्र कोणतेही असो, त्या पत्राचा समारोप ते शुभेच्छांनीच करतात.

त्यांच्या अनेक पत्रांमधून मला त्यांच्यातील एक प्रेमळ पिता दिसून आला. आपल्या राजपुत्रांना पत्र लिहिताना ते हळवे होताना दिसतात. मुलामधली व्यसनाधीनता, त्यांचे आजारपण याविषयी ते काळजी व्यक्त करतात. महाराजांचा मुलगा खूप आजारी होता आणि जर्मनीत त्याच्यावर इलाज सुरू होता. मात्र दुर्दैवाने या आजारपणातच त्याचा मृत्यू झाला. त्याच्याविषयी लिहिलेल्या पत्रांमधून सयाजी महाराजांमधील एक हळवा पिता आपल्यासमोर येतो. अशीच बाब त्यांच्या मुलीविषयी लिहिलेल्या पत्रासंदर्भातही दिसून येते. आपल्या राजपुत्रांनी राज्यकारभारात लक्ष घालावे. आपल्या आजारपणात त्यांची आपल्याला कारभारात मदत व्हावी, अशी त्यांची इच्छा होती. त्या दृष्टीने एखाद्या राजपुत्राला, राज्य कारभाराविषयी जे प्रशिक्षण आवश्यक असते, ते त्यांनी घ्यावे. याविषयी महाराज आग्रही असलेले पत्रांमधून दिसून येते. अधिकाऱयांना लिहिलेल्या पत्रांमधूनही त्यांचा हा दृष्टिकोन स्पष्ट होतो.

आपल्या कुटुंबीयांना राज्याने मान्य केले त्यापेक्षा कसलेही विशेषाधिकार असू नयेत, यावर त्यांचा कटाक्ष होता. त्याची ते सर्व कुटुंबीयांना वारंवार जाणीव करून देत, तसेच अधिकाऱयांनाही तशा सूचना देत. महाराजांची सूक्ष्म निरीक्षणशक्ती आणि त्यांची सौंदर्यदृष्टी वाखाणण्याजोगी होती. जगभरात ज्या-ज्या ठिकाणांना त्यांनी भेटी दिल्या, तेथील विशेष भावणाऱया गोष्टी ते टिपून घेत. त्याचे वर्णन अनेक पत्रांमधून आलेले आहे. जगातील उत्तमोत्तम बाबी आपल्या राज्यात, बडोद्यात याव्यात असाही त्यांचा आग्रह होता. त्याचा संदर्भ यांच्या बऱयाच पत्रांमधून येतो. आजही बडोद्यामध्ये फिरताना त्यांच्या सौंदर्यदृष्टीची तिथल्या इमारतींमधून, बागांमधून आणि एकूणच शहराच्या रचनेमधून प्रचीती येते.

हिंदुस्थानात ब्रिटिशांचे राज्य असले तरी सयाजी महाराज ब्रिटिशांच्या प्रभावाखाली दबून राहणारे राजे नव्हते, याचा आधीच उल्लेख केलेला आहे. व्हाईसरॉय लॉर्ड वेलिंग्टन यांना लिहिलेल्या पत्रांमध्ये त्यांच्या भूमिकेतील आणि विचारांतील ठामपणा प्रकर्षाने दिसून येतो. प्रसंगी आपल्या राज्याच्या हितासाठी विरोधी भूमिका घेण्यासही तो कचरत नाहीत. मात्र त्याच वेळी त्यांच्या पत्रातील भाषेचा तोल सुटत नाही, हेही दखल घेण्यासारखे आहे.

पत्रांच्या स्वरूपात लेखन हा तर अगदी प्राचीन काळापासून जगभर अस्तित्वात असलेला लेखनप्रकार आहे. अभिव्यक्तीचे ते एक प्रभावी माध्यम राहात आलेले आहे. पत्रांमध्ये व्यक्तिसापेक्षता जरी येत असली तरी एक ऐतिहासिक दस्तऐवज म्हणून त्यांचे महत्त्व कमी होत नाही. कागद-पेन असे लेखनाचे माध्यम अस्तित्वात नसतानाही पत्रलेखन झालेले आहे.

इंग्रजी साहित्यामध्ये तर एक स्वतंत्र साहित्यप्रकार त्यातून जन्माला आला. सतराव्या शतकातच epistolary novel हा प्रभावी कादंबरी लेखनाचा प्रकार वाचकांच्या पसंतीस पडलेला दिसून येतो. पत्रांच्या माध्यमातून कथानकाचा विस्तार अशा कादंबऱयांमधून केला जात असे.

सयाजी महाराजांचे वाचन फार दांडगे होते. त्यांचे जगभर मित्र होते. या व्यासंगी मित्रांकडून त्यांना नवनवीन महत्त्वपूर्ण पुस्तकांची माहिती मिळत असे. अशी पुस्तके ते आवर्जून वाचत. त्यांनी वाचलेल्या अनेक पुस्तकांचा उल्लेख त्यांनी आपल्या पत्रांमधून केलेला आहे. ते केवळ पुस्तकांचा उल्लेख करून थांबत नाहीत, तर अतिशय रसग्रहणपूर्वक समीक्षणही करतात. हा एक वेगळा पैलू त्यांच्या व्यक्तिमत्त्वातला दिसून येतो.

एकंदरीत सयाजी महाराजांची ही पत्रे त्यांना सर्व अंगांनी जाणून घेण्यासाठी एक महत्त्वाचा दस्तऐवज ठरतो. या पत्रांचा मराठी अनुवाद करताना सयाजी महाराज अनेक अंगांनी माझ्यासमोर उभे राहिले. सयाजी महाराज हे प्रचंड आवाका असलेले व्यक्तिमत्त्व होते. याची प्रचीती पत्र वाचताना निश्चित येते. वाचकांनीही एक राजा व एक माणूस म्हणून सयाजीराव गायकवाड महाराज यांना समजून घेण्यासाठी ही पत्रे वाचायला हवीत.

आपली प्रतिक्रिया द्या