सोशल मीडियावर ‘sextortions’ –

‘Extortion’ अर्थात ‘खंडणी’ हा शब्द आता तसा समाजात रुळलेला आहे. अपहरण करून खंडणी वसूल करणे अथवा एखाद्या व्यावसायिकाला व्यवसायात बाधा येऊ नये, सुरक्षा अशा कारणासाठी दर महिन्याला गुन्हेगारांना पैसे द्यावे लागणे यासारखे खंडणीचे प्रकार अनेकदा आपल्या वाचनात आलेले अथवा ऐकण्यातदेखील आलेले असतात. मात्र या खंडणीच्या गुन्ह्याने आता सोशल मीडियावरदेखील हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. ‘डिजिटल शॅडो’ या तंत्रज्ञान सुरक्षा विषयात काम करणाऱया कंपनीने नुकताच जो अहवाल प्रसिद्ध केला आहे, त्याने जगभरच्याच सायबर तज्ञांमध्ये चिंता निर्माण केली आहे. ‘LinkedIn’ सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करून या ‘sextortions’च्या गुन्ह्यात लोकांना कसे लुबाडले जात आहे, हे या रिपोर्टमध्ये उघड झाले आहे. यामध्ये सायबर गुन्हेगार आधी LinkedInवर नवे खाते उघडतो. त्यानंतर उच्चभ्रू वर्तुळातील लोकांना विशेषतः डॉक्टर, वकील अशा लोकांना टार्गेट करून त्यांच्याशी खास मैत्री वाढवली जाते. यानंतर त्या व्यक्तीला त्याचा वापरातला एखादा पासवर्ड सांगून त्याची इतरही सगळी गुप्त माहिती, त्याचे एखाद्या परस्त्रीबरोबर असलेले संबंध यासंदर्भातदेखील माहिती असल्याचे धमकावले जाते. ही माहिती उघड न करण्याच्या बदल्यात त्या व्यक्तीला एखादे ऍडल्ट कंटेंट ऑनलाइन बघत असतानाचा व्हिडीओ पाठवायला सांगितला जातो. यानंतरही त्याला धमकावत पुन्हा पैसेदेखील वसूल केले जातात. यामुळेच या प्रकारच्या गुह्याला ‘sextortion’ असे नाव देण्यात आले आहे. चिंतेची गोष्ट म्हणजे या प्रकारचे गुन्हेगार हे नुसते गुन्हे करूनच थांबत नाहीयेत, तर त्यांनी हे ‘sextortions’चे गुन्हे कसे करावेत यासंदर्भात मार्गदर्शन करणारी पुस्तके तयार करून तीदेखील किरकोळ रकमेत ऑनलाइन विकायला सुरुवात केली आहे. या गुह्यांसाठी मदत पुरवणाऱया लोकांना विशिष्ट रक्कमदेखील गुन्हेगारांकडून प्राप्त होत आहे. प्रतिष्ठीत व्यक्तीला टार्गेट करण्यासाठी, इतर काही खासगी माहिती, त्यांची प्रोफाईल्स या सगळ्याची माहिती मिळवून देण्यासाठीदेखील लोक नेमले जात आहेत.