आठवणीतील गुरुदक्षिणा

>>भाऊ सावंत<<

केंद्र सरकारने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 325 व्या राज्याभिषेक दिनानिमित्त 6 जून 1999 रोजी शिवरायांची मुद्रा असलेले दोन रुपयांचे नाणे चलनात आणले. यापूर्वी 6 जून 1674 शिवराज्याभिषेक वेळी शिवमुद्रा हे चलन होते. 325 वर्षांनंतर 6 जून 1999 रोजी शिवमुद्रा असलेले दोन रुपयांचे नाणे चलनात आले. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांची मुद्रा असलेले नाणे चलनात आले. शिवाजी महाराज आपले दैवत. शिवमुद्रा असलेले नाणे देव्हाऱ्यात पुजावे असे ठरवून मी 325 शिवमुद्रेची नाणी जमा केली. 2 जुलै 1999 गुरुपौर्णिमेचा दिवस. त्यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना कडक सुरक्षा असल्यामुळे भेटणे कठीण होते. मात्र दिवंगत शिवसेना उपनेते विजय लोके यांच्यासोबत मी 325 शिवमुद्रा असलेली दोन रुपयांची नाणी शिवसेनाप्रमुख यांना गुरुदक्षिणा म्हणून भेट दिली. ही माझी संकल्पना त्यांना आवडली. मला शिवमुद्रेचे नाणे दिले ते आजही माझ्या देव्हाऱ्यात पुजले जाते. त्या वर्षी शिवसेनाप्रमुखांनी माझ्याकडून शिवमुद्रा असलेली नाणी गुरुदक्षिणा म्हणून स्वीकारून आशीर्वाद दिला. त्या अविस्मरणीय क्षणांचे मोल मी कधीच विसरू शकत नाही.