लेख: छत्रपती शिवरायांची व्यापार व संरक्षणनीती

>> विनायक श्रीधर अभ्यंकर  

छत्रपती शिवरायांचा राज्यकारभार हा सर्व बाजूंनी आदर्श कसा होता याचे अनेक दाखले देता येतील. त्यापैकी एक म्हणजे त्यांचा व्यापार आणि संरक्षण या विषयीचा दृष्टिकोन. व्यापार आणि संरक्षण याबाबत त्यांचे विचार काळाच्याही पुढे होते. श्रमाचा, कामगारांचा जास्तीत जास्त बहुविध उपयोग कसा करून घेता येईल याबाबत ते प्रयोगशील होते. सध्याच्या आयएसओच्या काळात यालाच मल्टिस्किल्ड लेबर योजना म्हणतात. संरक्षण आणि संरक्षणसिद्धता याबाबतही शिवराय अत्यंत काटेकोर आणि एक पाऊल पुढेच होते. अर्वाचीन काळात औद्योगिक सुरक्षिततेवर जो भर दिला जातो, त्याची जाणीव व दखल सुमारे साडेतीनशे वर्षांपूर्वी छत्रपती शिवरायांना होती.  

हिंदुस्थानचा इतिहास नजरेखालून घातल्यास स्पष्टपणे दिसून येते की, छत्रपती शिवाजी महाराजांनी आर्थिक सुबत्तेसाठी उद्योग-व्यापार-उदिम यावर जितका भर दिला तितका इतर शासनकर्त्यांनी दिला नाही. राज्याचे कोषागार नेहमी ‘श्रीमंत’ असावे म्हणून प्रजेचा छळ न करता योग्य, माफक परंतु व्यापक साराभरती व करवसुली झाली पाहिजे अशी सक्त ताकीद महाराजांनी चिटणीसांना दिली होती. शेती हा राष्ट्राचा मुख्य उद्योग म्हणून शेतकी तंत्रज्ञान विकसित व्हावे या उद्देशाने शिवरायांनी महसूल विभागाला पिकांचे रास्त मोजमाप करून न्यायोचित करवसुली करावी असा दंडक घालून दिला होता. मुलूखगिरीवर वचक बसवून उभ्या पिकाचा नाश करणार्‍या सैनिकांना जेरबंद करून शिवाजी महाराजांनी सजा फर्मावली. शिलंगणाचे सोने लुटून आल्यावर त्याच शेतकर्‍याला शिलेदार (मावळा) बनवून मुलूखगिरीवर जाण्यास प्रवृत्त करणारे छत्रपती शिवराय श्रमाचा, कामगारांचा जास्तीत जास्त बहुविध उपयोग कसा करून घेता येईल याबाबत प्रयोगशील होते. सध्याच्या आयएसओच्या काळात यालाच ‘Multiskilled Labour’ योजना म्हणतात. या योजनेमुळे मानवी श्रमाचा योग्य उपयोग होऊन राबणार्‍या हाताला ‘काम’ आणि त्यातून रोजगार हे धोरण राबवले जात होते. (Utilization of manpower and employment) या योजनेमुळे रयतेला दरसाल वाजवी उत्पन्न मिळे व पावसाळय़ात सैन्य माफक व अल्प बाळगल्याने कोषागारावरील आर्थिक भार हलका होत असे. यालाच सध्याच्या उद्योग जगतात कुशल मनुष्यबळाचा पुरेपूर वापर असे एचआरडीवाले संबोधतात.

1674 मध्ये राज्याभिषेकप्रसंगी ईस्ट इंडिया कंपनीचा दूत हेन्री ऑस्केडन याचा नजराणा स्वीकारताना शिवरायांनी इंग्रजांना सक्त ताकीद दिली होती, ‘‘इंग्रजी गलबते स्वराज्याच्या सागरहद्दीच्या चाळीस मैलाबाहेरूनच मुसाफिरी करतील, एतद्देशीय मच्छीमारास नुकसान करणार नाहीत, तसेच आमच्या सागरी संपत्तीला लुटणार नाहीत याची खबरदारी घ्या. हा प्रसंग 1674 मधला. बरोबर तीनशे वर्षांनी म्हणजे 1974 मध्ये तत्कालीन हिंदुस्थान सरकारने जो ‘सागरी सीमा संरक्षक कायदा (Exclusive Economic Zone Sea Law) केला त्याचे मूळ छत्रपतींच्या या आदेशात आहे. याचाच अर्थ स्वराज्याचा व्यापार उदिम, उद्योग, सागरी संपत्ती संरक्षण व अर्थनियोजन याबाबत शिवप्रभूंचे व्यापक विचार व दृढनिश्चयी योजना काळाच्याही फार पुढे, तरीही प्रगल्भ व सर्वसमावेशक व समृद्ध होत्या.

एका पोर्तुगीज अंमलदाराने आपल्या राजाला लिहिलेल्या पत्रकात गुप्त खलित्यात लिहिलेली माहिती प्रकाशात आली आहे. त्या पत्रात तो लिहितो, ‘1659 मध्ये शिवाजी राजांच्या मराठा आरमारात केवळ 28 जहाजे होती, पण जंगी बेड्यात (Naval Fleet) राज्याभिषेक प्रसंगी 1674 मध्ये ही संख्या 74 युद्धनौका खडी तालीम देत सागरात गस्त घालत होती’. हिंदुस्थानच्या इतिहासात जे प्रमुख शास्ते झाले, त्यात सागरी आरमाराचे सामर्थ्य छत्रपतींनी ओळखून नौदलाची जी उभारणी केली त्यात संरक्षणाबरोबर उद्योग, रोजगाराचाही विचार होता. जहाजबांधणी, कारागीरांनी रोजगार हे ते उद्दिष्ट. शिवरायांपूर्वी केरळात डच, पोर्तुगीज यांच्याविरुद्ध कुंजाली वंशाचे राजे 100 वर्षे लढले खरे, पण ते विस्कळीत प्रयत्न दिशाहीन होते. असंघटित होते. जहाज बांधणी उद्योगात वारली, कातकरी, सुतार, गवंडी या मागास जातींना गुंतवून शिवरायांनी आदेश दिला की, गोर्‍या टोपीकरांकडून जहाजबांधणी कला आत्मसात करून त्यात देशी बांधणीचा अपूर्व मिलाप करा. म्हणजे सेवायोजन आपोआप होऊन आरमाराला सामर्थ्य प्राप्त होईल. कुलाबा (रायगड) येथे शिवकालीन आंग्रे कुलोत्पन्न तुकोजी आंग्रे त्यांच्या देखरेखीखाली जहाजबांधणी कारखाना कार्यरत होता. ‘कुलाबा’ या शब्दाचा फार्सी भाषेप्रमाणे अर्थ गोदी होय. या गोदीत (Dockyard) शिरब, पाल, गलबत ही अर्वाचीन काळातील जहाजे बांधली जात. हिंदुस्थानातील जहाजबांधणी (Ship Building) उद्योगाची ही पहिली मुहूर्तमेढ होती. त्यामुळे स्वराज्यातील हजारो हातांना काम व दाम प्राप्त झाले.

रत्नदुर्गच्या (रत्नागिरी) दक्षिण अंगाला एक भुयार उत्खननात सापडले. निरीक्षण केले असता लक्षात आले की, पूर्वी तो एक तरता तराफा होता. त्याद्वारे जहाजांना युद्ध सुरू असतानासुद्धा किरकोळ डागडुजी करून जायबंदी जहाज पुन्हा मोहिमेवर रवाना केले जात असे. यालाच ‘फ्लोटिंग डॉक्स फॉर बेस रिपेअरिंग युनिट’ असे आधुनिक काळात म्हटले जाते. अशा या दुर्गम जलदुर्गांवर 2-3 टनांच्या प्रचंड तोफा सारंग, तांडेलांनी कशा चढविल्या हे एक कोडेच आहे. याचाच अर्थ शिवकालीन दळणवळण विभाग तंत्रशुद्ध व अद्ययावत होते हे दिसून येते.

स्वयंभू भौगोलिक महत्त्वामुळे दख्खनचे जिब्राल्टर म्हणून मान्यताप्राप्त रायगडाची शिवप्रभूंनी राजधानी म्हणून निवड केली. या गडावरून देश व कोकण या दोन्ही स्वराज्यातील सुभ्यांवर, महसूल प्रांतावर करडी नजर ठेवता यावी हा उद्देश होता. या राजधानीची मांडणी करताना शिवरायांनी प्रथम बाजाराची जागा मुक्रर करून गडावर ऐन वख्ताला दाणापाणी, रसद कमी पडू नये याची खात्री व सोय अशी ही सामरिक व व्यापारी तजवीज होती. या बाजारात सैन्याला माफक व रास्त दराने वस्तू मिळून शिबंदीत कमतरता न भासता व्यापारात वृद्धी होऊन स्पर्धात्मक तत्त्वावर उत्तमोत्तम चीजवस्तू प्रजाननांना मिळतील अशी व्यवस्था व योजना होती. बारा बलुतेदारांना स्वराज्याच्या सेवेत आणून भूमिपुत्रांना उद्योगधंद्यात अग्रक्रम दिला. लोहार, सुतार अशा कुशल बारगीरांना आपले कारखाने उभे करण्यास उत्तेजन दिले. शस्त्रनिर्मिती सुरू केली.

महाराजांनी किल्लेदार व गडकरी यांना काही सुरक्षा सूचना (Industrial safety Rules) आज्ञापत्रामधून दिल्या आहेत. ‘‘गडकरी हो, सावध चित्ताने वर्तणूक ठेवून दुर्गाची निगा राखणे, अंधार्‍या रात्री गडांचे आगळ, कडी-कोयंडे शिस्तीत लावणे, गाफील न राहणे. रसदीच्या कोठारात कापसाच्या वातीच्या दिव्याचा वापर बहोतगीरीने मुकम्मल करणे, अन्यथा तेलाच्या लोभाने मूषक वात पळवताना कोठारास आग लागून स्वराज्याच्या संपत्तीचे हकनाक नुकसान. याबाबत कसुरात, टाळाटाळ खपवून घेतली जाणार नाही, झाल्यास मुलाहिजा न ठेवता देहदंड. सावध व चोख राहणे.’’

अर्वाचीन काळात औद्योगिक सुरक्षिततेवर जो भर दिला जातो, त्याची जाणीव व दखल सुमारे साडेतीनशे वर्षांपूर्वी छत्रपती शिवरायांना होती व स्वराज्यात त्याबाबत जागृती व्हावी या विचाराने शिवराय ध्येय धोरणे आखून पावले टाकत असत. इतका राष्ट्रवादी विचारांचा आणि संरक्षणसिद्धतेबाबत काटेकोर असतानाच व्यापाराभिमुख व उद्यमशील असलेला जाणता राजा इतिहासात क्वचितच सापडेल.

लेखक निवृत्त नौदल अधिकारी आहेत