अष्टप्रधान ते दर्यासारंग : शिवशाहीतील प्रशासन व्यवस्था

>> घनश्याम ढाणे

छत्रपती शिवाजी महाराजांच्या यशस्वी राज्यकारभाराचे अनेक दाखले आहेत. रयतेचा राजा ही उपाधी शिवरायांनी जेवढी सार्थ ठरविली तेवढी क्वचितच कुणी ठरविली असेल. त्यासाठी अर्थातच त्यांचा प्रजेप्रती असलेला दृष्टिकोन, उत्कृष्ट, लोकाभिमुख आणि कार्यक्षम प्रशासन व्यवस्था, प्रशासनावर असलेली त्यांची जरब अशी अनेक कारणे होती. अर्थात अष्टप्रधानांपासून दर्यासारंगापर्यंत असलेल्या या व्यवस्थेतील सर्वांना जोडणारा एकच समान दुवा होता तो म्हणजे छत्रपती शिवराय. हेदेखील महत्त्वाचेच.

शिवछत्रपतींनी राज्य कारभाराच्या सुलभतेसाठी अष्टप्रधान मंडळाची निर्मिती केली. त्यातील पहिले पद म्हणजे मुख्य प्रधान अर्थात पेशवे. मुख्य प्रधानाकडे सर्व राज्यकारभारावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी होती. त्यासाठी मुख्य प्रधानाची एक स्वतंत्र मुद्रा होती. अनेक पत्रे, ताबने, मह, फर्मान यावर मुख्य प्रधानाची मुदा असे. अर्थात अंतिम अधिकार हा छत्रपतींचा असे. अष्टप्रधानातील दुसरे तितकेच महत्त्वपूर्ण पद म्हणजे सेनापतीपद. सर्व लष्कर व्यवस्थेची जबाबदारी सेनापतीवर असायची. शिवछत्रपतींच्या लष्करामध्ये घोडदळ व पायदळ अशी दले होते. पायदळालाही एक सेनापती असे, मात्र त्यास प्रधान मंडळात स्थान नसे.

अमात्य हे प्रधान मंडळातील तिसरे महत्त्वपूर्ण पद असून त्याकडे सर्व लष्करी खात्याचे व किल्ल्याचे हिशेब तपासणे, सर्व प्रांतातील महसूल जमाखर्चाचे लिखाणाचे काम असे. या कामासाठी मोठ्य़ा प्रमाणावर सरकारकून नेमले जात. एखाद्या कार्यास खर्चास मंजुरी देणे अथवा खर्चात कपात करणे आदी हुकूम अमात्यांकडे असत. चौथे प्रधान म्हणजे पंत सचिव. यांचे कार्य म्हणजे सरकारी दप्तरावर यांची देखरेख असे. राज्यातील निरनिराळ्या प्रांतातील अधिकारी, लष्करी अंमलदार, किल्लेदार यांच्याकडून येणारी पत्रे, सरकारातून त्यास जाणारे खलिते यांची तपासणी, हवालापत्रे, इनामपत्रे, सनदा इत्यादींची नोंद ठेवणे, हिशेबाचे ताळेबंद पाहून चुका आढळल्यास कारकुनांना जाब विचारून शिक्षा करणे हे अधिकार त्यांच्याकडे असत. मंत्री हे अष्टप्रधानातील पाचवे पद होय. मंत्रीपदाकडे खासगी दप्तर व पत्रव्यवहार यांची देखदेख करणे, पायदळाचा बंदोबस्त इत्यादी कार्य असत. त्यामुळे छत्रपतींची दररोजची कार्ये तसेच राज्यात होणाऱ्या लहान-मोठय़ा घटनांची नोंद होणे, भेटीस येणारे लोक, आमंत्रित पाहुणे, तैनातीचे लोक तसेच मानकरी यांच्यावर कसोशीने नजर ठेवणे, छत्रपतींची सुरक्षितता आदी जबाबदारी मंत्र्यांवर असे. सुमंत हे सहावे प्रधान पद. सुमंतांकडे परमुलखाशी होणाऱ्या व्यवहाराची जबाबदारी असे. अन्य राजांशी युद्ध किंवा तह करण्याचा सल्ला देणे, परराष्ट्रातील घडामोडी, घटनांचा अभ्यास करून त्यासंबंधी आपली धोरणे निश्चित करणे, परराज्याचे वकील, खलिते, जासूद यांच्या संबंधाचे निर्णय, जबाबदारी ही सुमंतावर असे.

शिवशाहीत पंडीत हे प्रधान मंडळातील सातवे पद होते. पंडीताकडे प्रामुख्याने राजास प्रसंगानुरूप शास्त्रार्थ सांगणे, साधूसंत, सत्पुरुष यांना दिलेल्या नेमणुकांची व्यवस्था पाहणे, सरकारातून होणारे धर्मविधी आणि धर्माश्रय यांची व्यवस्था पाहणे, प्रजेस धर्माशास्त्रानुसार न्याय मिळतो का ते पाहणे इत्यादी कामे पंडीत पदावरील व्यक्तीस पाहावी लागत. न्यायाधीश हे प्रधान मंडळातील शेवटचे व महत्त्वपूर्ण पद असून तत्कालीन न्यायव्यवस्थेनुसार न्यायिक कामकाज पाहण्याची जबाबदारी न्यायाधीशावर असे. प्रत्येक मुलकी व दिवाणी खात्याच्या संबंधाने पंचाच्या किंवा अधिकाऱयांच्या हातून मिळालेला न्यायाची पडताळणी करणे, जमिनीचे हक्क, ग्राम अध्यक्षांचा हक्क तसेच त्यासंबंधीचे निकाल हे न्यायाधीशांच्या सहीने जाहीर होत.

अष्टप्रधान मंडळातील न्यायाधीश हे पद सोडले तर इतर सात प्रधानांना युद्धप्रसंगी लष्करी जबाबदारी निभवावी लागे. प्रत्येक सरकारी पत्रावर छत्रपती व मुख्य प्रधान यांचे शिक्कामोर्तब होऊन आणखी दोनी-तीन प्रधानांचे शिक्कामोर्तब होणे गरजेचे असे. त्यामध्ये सेनापती, पंडीतराव, न्यायाधीश यांचा त्या त्या प्रसंगानुरूप अथवा पत्रानुरूप सामावेश असे.प्रत्येक प्रधानास एक सहकारी (मुतालिक) असे. युद्धावर प्रधान अथवा इतर कारणास्तव गैरहजर असेल तर मुतालीकावर त्या कामाची संपूर्ण जबाबदारी असे. या मुतालिकांच्या हाताखाली इतर सात कामगार असत त्यामध्ये १) मुजुमदार, २) फडणीस, ३) सबनीस, ४) चिटणीस, ५) कारखानीस, ६) जामदार, ७) पोतनीस.
अष्टप्रधान मंडळातील प्रधानपदाचा आढावा घेतल्यानंतर शिवछत्रपतींच्या लष्करी व्यवस्थेतील काही पद पाहणे महत्त्वपूर्ण ठरणार आहे. मराठेशाहीतील किल्ले आणि त्यांच्या प्रशासन व्यवस्थेतील विभिन्न पैलू व त्यामधील महत्त्वपूर्ण पद म्हणजे किल्लेदार. यास हवालदार नावानेसुद्धा संबोधले जाई. किल्ल्याचे लष्करी प्रशासन व नागरी प्रशासन असे विभाग पडतात. यामध्ये लष्करी प्रशासनात किल्लेदाराच्या हाताखाली सरनोबत असतो. सरनोबत-तटसरनोबत-सरनाईक-तट सरनोबत-तटसरनाईक या पद्धतीने किल्लेदार ते तटसरनाईक अशी किल्ल्याच्या लष्करी प्रशासन व्यवस्थेतील मंडळी असून यांच्यावर किल्ल्याच्या संरक्षणाची जबाबदारी असे.

किल्ल्याच्या नागरी प्रशासन व्यवस्थेमध्ये प्रामुख्याने दोन विभाग पडतात. त्यामध्ये सबनीस व कारखानीस ही दोन पदे मुख्य असून त्यांच्या हाताखाली अनेक विभाग असत. त्यामध्ये सबनीस यांच्याकडे हिशेब, हजेरी, पगार इत्यादी खाते असून संबंधित खात्याच्या अनेक बाबी पूर्ततेसाठी फडणीस-दप्तरदार-कारकून-कोठीवाले इत्यादी पदे असत, तर दुसरे नागरी प्रशासक कारखानीस यांच्याकडे किल्ल्याच्या संरक्षणाची, देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी असे. त्याप्रमाणे कारखानीस-गोलंदाज, तासकरी, पाथरवट, बर्कंदाज, जंजलदार, गवंडी, सुतार, लोहार असे लोक कारखानीस यांच्या हाताखाली काम पाहत. किल्याच्या लष्करी व्यवस्थेप्रमाणे विविध पदे व विभिन्न कार्य असणारी पदे शिवशाहीरच्या लष्करी विभागात आरमारी विभाग आढळतात. उदा. २५ घोडेस्वार (बारगीरावर)एक हवालदार अशा पाच हवालदारांवर एक जुमलेदार अशा दहा जुमलेदारावर एक हजारी, अशा पाच एक हजारींवर पंचहजारी या पंचहजारींवर सरनोबत या प्रकारे घोडदलाची रचना असे.

शिवकालीन आरमाराचे पाच गुराव व पंधरा गलबते यांचा मिळून एक सुभा असे अनेक सुभे आरमारात असत. प्रत्येक सुभ्यावर एक अधिकारी असे. या सर्व सुभ्यांची मिळून दोन-दोन भाग असून दोन आरमार दले तयार असत. या दोन्ही दलांकरिता दर्या सारंग व मायनाईक ही दोन पदे कार्यरत होती. याप्रकारे शिवशाहीत अष्टप्रधानांपासून ते दर्यासारंगापर्यंत या सर्वांना जोडणारा एक समान दुवा होता तो म्हणजे छत्रपती!
(लेखक इतिहास संशोधक आहेत).