चला सिक्कीमला…

38


>> आशुतोष बापट

पर्यटकांच्या स्वागताला सदैव तयार असलेलं ठिकाण म्हणजे सिक्कीम. चारही बाजूंनी हिमालयाने वेढलेल्या सिक्कीममधील सूर्योदय आणि सूर्यास्त अवर्णनीय असतो. सूर्याच्या किरणांनी लाल-केशरी होणारी हिमालयाची शिखरे अगदी न चुकता पाहावीत असं हे ठिकाण. त्या सोनकेशरी रंगाने भारावून गेलेल्या आसमंताचं देखणं रूप एकदा तरी पाहायलाच हवं.

हिमालयाच्या कुशीत विसावलेलं अत्यंत देखणं आणि शांत राज्य म्हणजे सिक्कीम. दार्जिलिंग या सुप्रसिद्ध पर्यटनस्थळामुळे काहीसं झाकलं गेलेलं, पण खूप शांत-निवांत आणि तितकेच निसर्गरम्य सिक्कीम अवश्य पाहायला पाहिजे. रेल्वेने कोलकाता, तिथून जलपाईगुडी आणि तिथून गंगटोक हा प्रवास काहीसा रटाळ होतो. त्यापेक्षा विमानाने सिक्कीमला जावं हे उत्तम. गंगटोक जवळ पेकयॉंग इथे विमानतळ आहे. गंगटोक हे सिक्कीमच्या राजधानीचे शहर 5410 फूट उंचीवर वसलेले आहे. नामग्याल राजवटीने इथे 17 व्या शतकात राज्य केले. लेपचा, नेपाळी आणि भुतिया जमातीचे लोक इथे मोठय़ा संख्येने आहेत. गंगटोकला मुक्काम करून आजूबाजूचा प्रदेश मनसोक्त भटकता येतो. इथे फिरण्यासाठी जीप, सुमो अशा गाडय़ा मोठय़ा प्रमाणावर उपलब्ध आहेत. सिक्कीमचे रस्ते लहान आणि डोंगरातून जाणारे असल्यामुळे इथे मोठय़ा बसेस चालत नाहीत. इथले स्थानिक चालकच या रस्त्यांवरून गाडय़ा चालवू जाणे. चीनच्या सीमेला लागून हे राज्य असल्यामुळे इथे सैन्याच्या वाहनांची वर्दळसुद्धा मोठय़ा प्रमाणावर असते.

गंगटोकवरून कुठेही नजर टाकली तरी हिमालयाच्या रांगा दृष्टीस पडतात. गंगटोकपासून 50 कि.मी. वर असलेली चीनच्या सीमेवरील नथू-ला ही खिंड बघणे अगदी अनिवार्य आहे. नथू-लासाठी परमिट घ्यावे लागते ते गंगटोकलाच मिळते. इथे जाताना वाटेत असलेले छांगु लेक आपल्या डोळ्याचे पारणे फेडते. प्रदूषणविरहित वातावरण आणि त्यामुळे आकाशाच्या दाट निळ्या रंगाचे प्रतिबिंब या सरोवरात पडलेले असते. बाजूलाच सैन्याचा मोठा तळ आहे. इथून पुढे येते हिंदुस्थान-चीन सीमेवरील 14140 फूट उंचावरील खिंड, नथू-ला. प्राचीन काळातील प्रसिद्ध सिल्क रूट इथूनच जात असे. याच खिंडीतून कॅप्टन यंग हजबंडच्या नेतृत्वातील ब्रिटीश सैन्याने तिबेटमध्ये प्रवेश केला होता. हिंदुस्थानींच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट म्हणजे सन 1962 सालच्या मानहानीकारक पराभवानंतर 1967 साली हिंदुस्थानी सैन्याने याच खिंडीत चिनी सैन्याचा दारुण पराभव केलेला होता. हिंदुस्थानी तोफखान्याने त्या वेळी मोलाची कामगिरी करून चिनी बंकर उद्ध्वस्त केले आणि जवळजवळ 400 हून अधिक चिन्यांना यमसदनी धाडले होते. त्या विजयाचे स्मारक इथे उभारलेले आहे. नथू-ला आणि परिसरातून चीनच्या सैन्याच्या चौक्या अगदी समोर दिसतात. इथूनच पुढे रस्ता बाबा मंदिरला जातो. हे ठिकाण आणि आजूबाजूचा परिसर निव्वळ पाहण्याजोगा आहे. हे अंतर गंगटोकवरून जरी फक्त 50 कि.मी. असले तरी अत्यंत अरुंद आणि वळणावळणाच्या रस्त्यांमुळे अख्खा एक दिवस इथे जाऊन यायला लागतो.

सिक्कीममधले दुसरे सुंदर ठिकाण म्हणजे पेलिंग. हे जणू पर्यटकांच्या स्वागताला सदैव तयार असलेले ठिकाण वाटते. पेलिंगमधील कुठल्याही हॉटेलमधून कांचनगंगा रांग दिसते. अगदी पहाटे तीन-साडेतीनला उठावे आणि गच्चीत जाऊन सूर्योदयाच्या आधी लाल-केशरी होणारी हिमालयाची शिखरे अगदी न चुकता पाहवीत असे हे ठिकाण. पेलिंग इथे एक सुंदर बौद्ध मठ आहे. याच्या बरोबर समोर कांचनगंगा रांगेतील अतिशय देखणे असे ‘काबरु’ नावाचे शिखर पाहायला विसरू नये. सिक्कीमच्या उत्तर भागात असलेले ला-चेन हे ठिकाणसुद्धा अत्यंत सुंदर आहे. इथे मात्र एक दिवस मुक्काम करावा लागतो. पण ला-चेन ला जाणे चुकवू नये. तिथे मुक्काम करून तिबेटच्या सीमेवर असलेले 17000 फूट उंचीवरील गुरुडोग्मार सरोवर बघता येते. रम्य निसर्ग, नीरव शांतता आणि समोर अथांग पसरलेले सरोवर बघून इथून हलू नयेसे वाटते.

गंगटोकमधेच असलेल्या गांधी मार्केटला मुद्दाम भेट द्यावी. इथे वाहनांना प्रवेश नाही. फक्त चालण्यासाठी रस्ते आहेत. या मार्केटमध्ये फुलांचे ताटवे आणि कारंजी जागोजागी केलेली आढळतात. गंगटोकवरून कुठेही निघाले तरी निसर्ग आपले विविध रंग उधळताना दिसतो. वाटेत लागणारी तिस्ता नदी आणि तिच्यावर उभारलेला जलविद्युत प्रकल्प, जागोजागी हिंदुस्थानी सैन्याने बांधलेले लोखंडी पूल आणि उंचच उंच गेलेली हिमाच्छादित शिखरे आपला प्रवास कधीच कंटाळवाणा होऊ देत नाहीत. सगळा सिक्कीम मनमुराद फिरायचा असेल तर 8 दिवस तरी हवेतच. सिक्कीममध्ये एक पथ्य आवर्जून पाळावे, ते म्हणजे सूर्योदय आणि सूर्यास्त बघायला आणि अनुभवायला विसरू नये. चारही बाजूंनी वेढलेल्या हिमालयाच्या शिखरांवर सूर्याचे किरण पडून त्यांचा सोनेरी होणारा रंग आणि सगळाच भारावून गेलेला आसमंत कधीही विसरता येत नाही.

z [email protected]

आपली प्रतिक्रिया द्या