मोदी-ट्रम्प समानता


>> अभय मोकाशी

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात एक विचित्र साम्य दिसून येते. या दोघांचे वागणे, बोलणे, देश चालविण्याची ‘स्टाइल’, निवडणूक प्रचारात दिलेली आश्वासने आणि त्यांचा फोलपणा, आर्थिक तसेच परराष्ट्र धोरणांबाबतचा एककल्लीपणा, विरोधकांना कस्पटासमान लेखण्याची वृत्ती… या आणि अशा अनेक बाबतीत त्यांची ‘समानता’ आश्चर्यकारक आहे.

जगातील सर्वात मोठय़ा लोकशाहीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जगातील सर्वात जुन्या आधुनिक लोकशाही असलेल्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात अनेक विषयांवर समानता दिसून येते. निवडणुकीच्या प्रचारात केलेली भाषणे आणि जनतेला दिलेली वचने, देश चालविण्याच्या विविध पैलूंवर त्यांनी उचललेली पावले, त्या दोघांचे बोलणे, वागणे इत्यादी पाहता हे दोन नेते म्हणजे अनेक हिंदी चित्रपटांच्या कथानकांत उल्लेख असलेले जत्रेत हरवलेले भाऊ असावेत असा भास होऊ शकतो. हरवलेले भाऊ अनेक वर्षांनी एकमेकांना भेटल्यावर जसे उल्हसित होतात, तसे मोदी आणि ट्रम्प यांच्या पहिल्या भेटीत त्यांनी एकमेकांना मारलेल्या मिठीवरून जाणवले.
हे दोन्ही नेते उत्तम वक्ते आहेत आणि ते श्रोत्यांवर आपल्या आक्रमक शैलीतील भाषणाने एकप्रकारे मोहिनी टाकतात. आपापल्या निवडणूक प्रचारात या दोन्ही नेत्यांनी जनतेच्या मनात तीव्र राष्ट्रवाद निर्माण केला. देशाला पुढे नेण्याची कशी गरज आहे आणि आपण देशात मोठय़ा प्रमाणात कसा विकास घडवून आणू असे अनेकदा मोदी यांनी म्हटले होते. पाकिस्तानकडून वेळोवेळी होणारे हल्ले आणि पाकिस्तानकडून अतिरेक्यांना मिळणारे सहाय्य याचा आपण आपल्या ५६ इंची छातीने खात्मा करू असे आवर्जून सांगितले होते. मात्र पाकिस्तानकडून होणाऱया अशा कारवाया बंद न होता, त्या वाढतच आहेत. इतकेच नव्हे तर मोदी यांनी पाकिस्तानशी दोस्ती केली आणि पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या वाढदिवसाला त्यांची अचानक भेट घेतली.

तिकडे ट्रम्प यांनी निवडून आल्यावर उत्तर कोरिया आणि त्या देशाचे नेते किम जोंग ऊन यांच्यावर प्रखर टीका केली आणि ट्विटरवरून अणुयुद्धाच्या धमक्यादेखील दिल्या. मात्र आता ट्रम्प यांनी ऊन यांची भेट घेऊन त्यांच्याशी मैत्रीचा हात पुढे केला आहे.

ट्रम्प यांनी आपण म्हणजे देवाने निर्माण केलेला नोकऱयांचा सर्वात मोठा निर्माता ठरू असे निवडणूक प्रचारात म्हटले होते. त्यांनी दहा वर्षांत अडीच कोटी नोकऱया निर्माण करणार असल्याचे वचन दिले होते. हे वचन अमलात आणण्यासाठी ट्रम्प यांना दरमहा दोन लाख नोकऱया निर्माण करणे आवश्यक होते, पण तसे काही झाले नाही. अमेरिकेची आर्थिक स्थिती चांगली आहे आणि शेअर बाजार तेजीत आहे तरी अमेरिकेत रोजगार निर्मिती आवश्यकतेप्रमाणे झाली नाही.

काहीशी अशीच भूमिका मोदी यांनी निवडणूक प्रचारात घेतली होती. दरवर्षी एक कोटी नोकऱया निर्माण करण्याचे आश्वासन त्यांनी देशवासीयांना दिले होते. मात्र वस्तुतः असे काही झाले नाही. आपल्या देशाची पण आर्थिक परिस्थिती उत्तम आहे आणि एकूण देशांतर्गत उत्पादनाचा दर चांगला आहे. तरीदेखील देशातील बेरोजगारी कमी होत नाही.

जसा मोदी यांच्या आर्थिक धोरणाचा फायदा कॉर्पोरेट जगाला जास्त झाला, तसेच ट्रम्प यांनी कर पद्धतीत केलेल्या बदलाचा लाभ फक्त अति श्रीमंत एक टक्का नागरिकांना होत आहे.

ट्रम्प यांनी निवडणुकीच्या आपल्या भाषणात मुसलमानांबद्दल द्वेष व्यक्त केला होता आणि सत्तेत आल्यावर काही इस्लामिक देशांतून येणाऱया लोकांवर बंदी घातली. मेक्सिकन आणि आफ्रिकी अमेरिकन नागरिकांबद्दल अपशब्द वापरले होते, ज्याची निंदा ख्रिश्चन धर्मगुरू पोप यांनीदेखील केली होती.

मोदी पंतप्रधान झाल्यावर त्यांच्या सरकारने हिंदुस्थानी नागरिकत्व कायद्यात बदल करून हिंदू, शीख, जैन, बौद्ध, पारशी आणि ख्रिश्चन या धर्मांच्या निर्वासितांना देशात स्थान दिले जाईल अशी तरतूद केली आहे. म्यानमारमधून येणाऱया रोहिंग्यांना आपल्या देशात निर्वासितांचा दर्जा नाकारण्यात आला.

ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्यापासून अमेरिकेत द्वेषावर आधारित गुह्यांत वाढ झाली आहे आणि त्यात वर्णद्वेषाचा समावेश मोठय़ा प्रमाणात आहे. काळ्या लोकांवर अनेक ठिकाणी हल्ले झाले आहेत. अमेरिकेतील बहुसंख्य राजकीय आणि सामाजिक विश्लेषक असे मानतात की, अशा घटना राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी लोकांच्या मनात द्वेष पसरविल्यामुळे होत आहेत.

आपल्याकडे मोदी पंतप्रधान झाल्यापासून जातीय आणि धार्मिक द्वेषावर आधारित गुह्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे.

मोदी आपल्या मनातील गोष्टी ‘मन की बात’ या कार्यक्रमातून मांडतात. ते ट्विटरचा वेळोवेळी वापर करतात, पण देशाचे पंतप्रधान म्हणून विविध विषयांवरील त्यांची भूमिका अपेक्षित असते तेव्हा मोदी मौन धारण करतात. ट्विटरच्या बाबतीत ट्रम्प मोदींना फार मागे टाकतात. ट्रम्प दिवसातून अनेकदा ट्विटरवरून संदेश पाठवितात.

आपल्या चार वर्षांच्या कारकीर्दीत मोदी यांनी एकही पत्रकार परिषद घेतली नाही आणि पत्रकारांना सामोरे गेले नाहीत, जात नाहीत. गेल्या काही महिन्यांत त्यांनी काही दूरचित्रवाहिन्यांना मुलाखती दिल्या, पण त्या मुलाखती पाहून असे वाटते की, त्या उत्तम पत्रकारितेला धरून घेतल्या नव्हत्या. मुलाखत घेणारे पत्रकार प्रस्थापित आहेत. त्यामुळे त्यांच्या मुलाखत घेण्याच्या कलेवर शंका घेणे योग्य नाही. तरीदेखील देशातील ज्वलंत विषयांसंबंधी प्रश्न विचारले गेले नाहीत. या सर्व मुलाखतीतून मोदी सरकार किती छान काम करत आहे असे चित्र उभे करण्यात आले. त्यामुळे या मुलाखती ठरवून दिलेल्या प्रश्नांवर आधारित होत्या असे म्हणायला हरकत नाही. मोदींच्या मनात पत्रकारांबद्दल द्वेष आहे का हे सांगता येत नाही, पण ते पत्रकारांपासून दूर राहतात हे खरे आहे.

पत्रकारांच्या बाबतीत ट्रम्प अधिक स्पष्ट आहेत. त्यांच्यावर टीका करणाऱया बातम्यांना ते ‘फेक न्यूज’ (खोटय़ा बातम्या) म्हणतात. त्यांच्या वागण्यातून आणि बोलण्यातून पत्रकारांविषयी त्यांच्या मनात असेलेला द्वेष दिसून येतो. दरवर्षी व्हाईट हाऊसच्या बातम्या देणारे पत्रकार एक भोजन समारंभ आयोजित करतात आणि त्या कार्यक्रमात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आपले व्हाईट हाऊसमधील सहकारी आणि अधिकारी यांच्या समवेत उपस्थित राहतात. ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्यापासून हा कार्यक्रम दोनदा झाला. मात्र ट्रम्प यांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. यावरून ते पत्रकारांना किती कमी लेखतात हे दिसून येते.

आपणच सर्वात मोठे देशभक्त आणि विरोधकांना देशाचे काही पडले नाही अशी भूमिका घेण्यात ट्रम्प आणि मोदी एकाच पातळीवर आहेत असे म्हणायला हरकत नाही. आपल्या विरोधकांवर पातळी सोडून टीका करण्यात दोघांचाही हातखंडा आहे. आपण कोणत्या पदावर आहोत याचे भान दोघांनाही अनेकदा राहत नाही. मोदीं यांच्या बाबतीत म्हणायचे झाले तर ‘‘काँग्रेसने कुत्र्यांपासून राष्ट्रवाद शिकावा’’ असे वक्तव्य करताना आपण देशाचे पंतप्रधान आहोत हे मोदींनी लक्षात ठेवणे आवश्यक होते.

ट्रम्प यांच्यावर न्यायाधीशांच्या नेमणुकीवरून टीका होत आहे, तर इकडे नरेंद्र मोदी यांच्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या नेमणुकीवरून टीका होत आहे.

एकंदरीत, या दोन बलाढय़ नेत्यांच्या वागण्यातील इतके साम्य पाहून कोणालाही आश्चर्य वाटू शकते. हे दोघे जत्रेत हरविलेले भाऊ नाहीत हे निश्चित, पण मागच्या जन्मी ते सख्खे भाऊ असावेत असे पुनर्जन्मावर विश्वास असणाऱयांना वाटले तर त्यात नवल नाही.

(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत)