मुद्दा : सिंधुजल संधीतील पाणी

65

>> ज्ञानेश्वर भि. गावडे

पाणी वळवा नि पाकिस्तानची जिरवा’ अशी भूमिका नव्याने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मध्यंतरी मांडली. त्यामुळे हिंदुस्थान व पाकिस्तानमधील ‘सिंधुजल संधी’, जो करार सध्याच्या विश्व बँकेच्या उपस्थितीत झाला त्याची आठवण आलेली आहे. या करारावर तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू व पाकिस्तानचे लष्करशहा आयुब खान यांनी 19 सप्टेंबर 1960 रोजी सह्या केल्या. या कराराच्या रूपाने पाकिस्तानच्या विरुद्ध ‘ब्रह्मास्त्र’ हे अतिप्रहारी अस्त्र आहे, परंतु लाचारी आणि मुस्लिम मते यामुळे आतापर्यंतच्या काँग्रेसी राज्यकर्त्यांनी त्याचा वापर केला नाही. मात्र पाकिस्तानमुळे उरी व पुलवामा येथे आपल्या जवानांचे भीषण हत्याकांड झाले आणि त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना ‘सिंधुजल संधी’ हे आपल्या हातातील ब्रह्मास्त्र वापरावे अशी जाणीव झाली. सिंधू, झेलम व चिनाब या हिंदुस्थानात वाहणाऱ्या नद्यांचे सर्वच पाणी पाकला दिले जाते. म्हणजे वरचा देश खाली असणाऱ्या देशाचा (पाकचा) जीवनाधार झालेला आहे. मात्र उपकाराची जाण न ठेवणारी कृतघ्न पाकिस्तान हिंदुस्थानला दुष्टाव्याने व कपटाने वागवीत आहे. पंजाबसारखा शेतीप्रधान भूभाग ‘सुजलाम् व सुफलाम्’ झालेला आहे. जर सिंधुजल संधी करारातून हिंदुस्थानला मिळणारे पाणी अन्यत्र वळवले तर पाकिस्तानातील हा भाग दुसऱ्या वर्षी वाळवंट होईल. याच पंजाबातील लष्करी अधिकारी हिंदुस्थानविरोधी भूमिका घेण्यात आघाडीवर आहेत. म्हणजे आपण सापाला पोसतोय याची जाणीव हिंदुस्थानी जनतेला नक्की होईल. भाक्रा-नान्गल हे देशातील सर्वात मोठे धरण मरहूम पंडित नेहरूजींच्या काळात बांधले गेले. धरणाचा अफाट खर्च हिंदुस्थानने केला खरा, परंतु या धरणामुळे जमलेला भूजलसाठा पाकिस्तानात पाझरला आणि पाकिस्तानातील जमीन सुजलाम् झाली, तिथली पिके बहरली. म्हणजे आपणच पाकिस्तानला पोसत आहोत व आपला जन्मजात शत्रू प्रबळ करीत आहोत.

आपली प्रतिक्रिया द्या