सोशल मीडियाची शर्यत आणि घोडे

>> सुजित पाटकर

सोशल मीडियाचा वापर जगातच प्रचंड वाढला आहे. हिंदुस्थान त्याला अपवाद कसा असणार? आपल्या देशातही मागील दोन वर्षांत सोशल मीडियाचा वापर जवळजवळ दुपटीने वाढला आहे. साहजिकच इंटरनेट आणि सोशल मीडियाचा हा प्रभाव राजकीय पक्षांनी ‘कॅश’ करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे सोशल मीडिया ही राजकारणातील शर्यत झाली आहे. त्या शर्यतीत सर्वच राजकीय पक्षांचे ‘घोडे’ धावत आहेत. हे ‘सब घोडे बारा टक्के’ नसले तरी ही शर्यत जिंकण्यासाठी प्रत्येक घोडा जिवाच्या आकांताने धावत आहे.

सध्याच्या युगात सोशल मीडिया मानवी जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. त्यामुळे सर्वच क्षेत्रांकडून या माध्यमाचा प्रभावी वापर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. वृत्तवाहिन्यांपेक्षाही अत्यंत वेगात एखादे वृत्त, फोटो किंवा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो. अनेकदा मीडियावर कळण्याआधीच एखादी बातमी आपल्याला फेसबुक, व्हॉटस्ऍप किंवा ट्विटरवरून समजलेली असते. हिंदुस्थानात २०१६ पर्यंत फक्त २७ टक्के लोक इंटरनेटचा वापर करीत होते. मात्र त्याच सुमारास चीनमध्ये इंटरनेटचा वापर ५१ टक्के होता. म्हणजे साधारण श्रीलंका (२८ टक्के) व सुदान (२६ टक्के) या देशांचा मिळून होईल इतका. २०१४ मध्ये जेव्हा हिंदुस्थानात नरेंद्र मोदी पंतप्रधानपदासाठी निवडणूक लढले तेव्हा हा आकडा केवळ १५ टक्के इतकाच होता. त्यानंतर इंटरनेटचा वापर हिंदुस्थानात झपाटय़ाने वाढत गेला. आश्चर्य म्हणजे ही वाढ अमेरिकेपेक्षाही दुप्पट आहे. एका अंदाजानुसार हिंदुस्थानात चालू वर्षात स्मार्टफोनधारकांची संख्या ५३ कोटींवर जाऊन पोहोचेल. म्हणजेच जवळ जवळ ४०टक्के हिंदुस्थानी जनता सोशल मीडियाच्या प्रभावाखाली येईल. जगात व्हॉट्सऍपचा वापर हिंदुस्थानात सर्वाधिक होतो. सध्या २०० दशलक्ष हिंदुस्थानी व्हॉट्सऍप वापरतात. २०१४ ची निवडणूक विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जिंकली. त्यात फेसबुक आणि व्हॉट्सऍपचा वाटा मोठा होता असे म्हणणे अतिशयोक्तीचे ठरणार नाही.

२००९ मध्ये जेव्हा लोकसभा निवडणूक झाली. त्या वेळी सोशल मीडियाचा वापर अत्यल्प होता. मात्र नंतर परिस्थिती बदलत गेली. आजच्या घडीला फेसबुकचे ९३ दशलक्ष आणि ट्विटरचे ३३ दशलक्ष यूजर्स आहेत. २०१३ च्या एका अहवालानुसार राजकीय पक्षांनी सोशल मीडियावर अवलंबून राहण्याचे प्रमाण वाढले, कारण २०१४ मध्ये जवळजवळ प्रत्येक राजकीय पक्षाने निवडणूक प्रचाराच्या एकूण बजेटच्या २ ते ५ टक्के रक्कम केवळ सोशल मीडियासाठी राखून ठेवली होती. या अहवालानुसार भाजपने सुमारे ५०० कोटी तर काँग्रेसने ४०० कोटी खर्च केले. भाजपचे सोशल मीडिया प्रेम खूप जुने आहे. २००९ च्या निवडणुकीपूर्वीच या पक्षाने सोशल मीडियाचा वापर सुरू केला होता. जनसामान्यांपर्यंत पोहोचण्याचा उत्तम मार्ग म्हणजे सोशल मीडिया हे त्यांनी वेळीच ओळखले. म्हणूनच तुलनेत नेते म्हणून मोदी आणि पक्ष म्हणून भाजप इतरांपेक्षा सोशल मीडियावर अग्रेसर आहेत. ट्विटरवर तर सर्वाधिक फॉलोअर्स मोदी यांचे आहेत. ‘आप’सारखा नवा पक्षदेखील सोशल मीडियावर चांगलाच ऍक्टिव्ह आहे. काँग्रेसला याबाबतीत उशिराच जाग आली आहे. तरीही अलीकडील काळात तो पक्षही सोशल मीडियावर बऱयापैकी ऍक्टिव्ह दिसतो. गुजरातच्या निवडणुकीत काँग्रेसने जो आक्रमक प्रचार केला त्यात सोशल मीडियाचाही भाग होताच. सोशल मीडियावर उपस्थित केलेले प्रश्न, चटपटीत बातम्या, आगामी घोषणा अशा अनेक गोष्टी केल्याने व त्यासाठी जवळजवळ २ हजारांहून अधिक लोकांची नेमणूक केल्याने गुजरात निवडणुकीत काँग्रेसला फायदाच झाला. अर्थात कर्नाटक विधानसभा निवडणुकीत मात्र काँग्रेस पक्षात या आघाडीवर तशी सामसूमच दिसत आहे.

थोडक्यात देशाचे राजकीय आकाश सध्या सोशल मीडियाने व्यापले आहे. कारण सतत कुठे ना कुठे निवडणुका सुरू आहेत. त्यामुळे सोशल मीडियाचा वापर जोरात सुरू आहे. पुन्हा सोशल मीडियाचा कैफ एवढा जबरदस्त आहे की, एखादी व्यक्ती त्यामुळे रातोरात पप्पू बनवली जाते तर एखादी प्रियासारखी केरळमधील नवतारका देशातच नव्हे परदेशातही स्टार बनते. हिंदुस्थानसारख्या देशात राजकारणीच नव्हे तर सामान्य जनतेसाठीही सोशल मीडिया हे संवादाचे आणि प्रचाराचे महत्त्वाचे साधन बनले आहे. आगामी काळात हे प्रेम अधिकाधिक घट्ट होणार हे निश्चित आहे.

सोशल मीडिया – राजकीय पक्षांना वरदान

राजकीय पक्ष आणि सोशल मीडिया हे सध्या हातात हात घालून चालत आहेत. एखाद्या शर्यतीप्रमाणे सोशल मीडियावर राजकीय पक्ष आणि नेत्यांची जबरदस्त रस्सीखेच सुरू आहे. हिंदुस्थानचा विचार केला तर जवळजवळ ५० टक्के लोकसंख्या पुढील २-३ वर्षांत सोशल मीडियाच्या कक्षेत आणि प्रभावाखाली येईल. त्यामुळे राजकारणात सोशल मीडियाचा वापर आता पेक्षाही जास्त वाढणार आहे. सोशल मीडिया हे दुधारी शस्त्र्ा असले तरी राजकीय पक्षांना ते एक प्रकारे ‘वरदान’ ठरले आहे.

– सोशल मीडियामुळे निवडून आलेले लोकप्रतिनिधी आणि जनता, लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांच्यात सहज संवाद माध्यम उपलब्ध झाले आहे. शिवाय कमी खर्चात नेत्यांची कामे, कार्यपद्धती आणि कार्यक्षमता लोकांपर्यंत पोहोचू लागली आहे. त्याचा फायदा राजकारण्यांना आणि सेलिब्रिटींना स्वतःची प्रतिमा निर्माण करणे आणि जनमानसात रुजविणे यासाठी होत आहे.

– पूर्वी उमेदवार गावोगाव आणि घराघरात फिरून प्रचार करीत असत. आता सोशल मीडियामुळे नेते मंडळींना थेट घरोघर फिरण्याची गरज उरलेली नाही. फेसबुक, यू टय़ूब आणि ट्वीटरच्या माध्यमातून थेट घराघरात पोहोचता येते. शिवाय त्यासाठी येणारा खर्चही तुलनेत खूप कमी आहे. सोशल मीडिया नव्हता तेव्हा मीडिया आणि इतर माध्यमातील जाहिरातबाजींसाठी उमेदवारांना आणि राजकीय पक्षांना प्रचंड खर्च करावा लागत असे. सोशल मीडियामुळे या बजेटला बऱयापैकी कात्री लागली आहे.

– शिवाय यू टय़ूबसारख्या माध्यमामुळे वेळ व पैसा खर्च न करता प्रचार शक्य झाला आहे. आता एखादी जाहिरात किंवा छोटा लघुपट अपलोड करूनही प्रचार केला जातो आणि त्यातून समाजाचा मोठा हिस्सा कव्हर होतो.

– फेसबुकवरचा शेअर ऑप्शन व ट्विटरवरील रिट्वीट ऑप्शन यामुळे समविचारी लोक सहज एकत्र येऊ लागले आहेत. त्यांच्यात विचारांची व माहितीची देवाणघेवाण होऊ लागली आहे. अमेरिकेतील २०१६ मधील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विटरचा खूप मोठय़ा प्रमाणावर वापर केला. तेव्हा डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते की, माझी मते व मुद्दे मी लोकांपर्यंत सहज पोहोचवू शकतो व ती पोहोचवणे माझ्यासाठी आणि माझ्याकडे जे भविष्यातील अमेरिकन राष्ट्राध्यक्ष म्हणून बघत आहेत त्यांच्यासाठी महत्त्वाची आहे. यावरून ट्विटरच्या प्रभावाचा अंदाज येऊ शकतो.

– सोशल मीडिया जे फॉलो करतात त्यांच्या संपूर्ण माहितीचा (डेटा) खजिना राजकीय पक्षांना सहज उपलब्ध होतो. या माहितीच्या आधारे गरजेनुसार प्रचाराचे संदेश तयार करून लोकांना पाठवता येतात. वय, लिंग, शिक्षण, वास्तव्याचे ठिकाण अशी वर्गवारी करून लोकांना भावतील असे संदेश राजकीय पक्ष आणि नेत्यांना तयार करता येतात व त्या आधारे मतदारांवर प्रभाव टाकता येतो.

– सोशल मीडिया हे एकाच वेळी आणि असंख्य लोकांपर्यंत झटपट पोहोचण्याचे साधन आहे. कुठलेही धोरण राबवण्याआधी त्याचा हल्ली प्रसार सोशल मीडियावर केला जातो. त्यामुळे राजकारण्यांना लोकांचा त्याबद्दलचा कल आधी कळू शकतो. कधी कधी लोक ती कल्पना उचलून धरतात तर कधी कधी त्याबद्दल खूप वादंग उठवतात. अशा प्रकारे मोठे सल्लागार न नेमता आणि त्यावर खर्च न करता जनमानसाचा अंदाज समजू शकतो. त्यानुसार धोरणात आवश्यक फेरबदल करता येतो.

– नरेंद्र मोदी हे असे पहिलेच नेते म्हणता येतील ज्यांनी तरुणाईची नस उत्तम पकडली आहे. मोदी यांच्या फेसबुक व ट्विटरवरील सक्रिय अस्तित्वामुळे तरुण पिढी त्यांच्याकडे आकर्षित झाली. यापूर्वी तरुण पिढीला निवडणुका व त्यावरील चर्चेत फारसा रस नसायचा, पण आता सोशल मीडियावरील ट्रोल्स व मेम्स यामुळे का होईना, तरुण पिढी राजकारणावरील चर्चेत रस घेऊ लागली आहे. पारंपरिक पद्धतीने म्हणजे पोस्टर, कटआउटस्, रॅली, सभा, मेळावे, प्रचारफेऱया याद्वारे आजही राजकीय प्रचार होतच आहेत. पुढेही तो होईलच, पण सोशल मीडियाच्या अपरिहार्यतेमुळे राजकीय पक्ष आता ‘टेकसॅव्ही’ झाले आहेत, असे म्हणायला हरकत नाही.

– अर्थात कधीकधी उमेदवारांचा किंवा नेते मंडळींचा त्यांच्या मतदारांशी किंवा मतदार संघातल्या लोकांशी असलेला थेट संपर्क घातक ठरू शकतो. बऱयाचदा माहिती जनसंपर्क अधिकारी किंवा सोशल मीडिया सांभाळणारी टीम, नेत्यांची वक्तव्ये जशीच्या तशी पोस्ट करतात. असे केल्याने संबंधित नेते वादाच्या भोवऱयात सापडण्याची भीती असते. अनेकदा तसे घडतानाही आपण पाहतो.

२०१४ निवडणूक
२०१४ च्या निवडणुकीत भाजपने एकूण जे ट्विट केले होते त्यापैकी २८ टक्के ट्विट पक्षाच्या योजनांची माहिती देणारे होते तर २४ टक्के ट्विट विरोधी पक्षांवर टीका करणारे होते. ‘आप’ने प्रचारासाठी ३५ टक्के ट्विटचा वापर केला तर भाजपने १९ टक्के. या सगळय़ात भाजपची ट्विटरवर जास्त चलती असल्यामुळे त्या पक्षाला निवडणूक जिंकणे सोपे झाले. महाराष्ट्रातदेखील त्या पक्षाला हाच फायदा झाला. ‘न्यूजलान्ड’ने केलेल्या अभ्यासात उत्तर प्रदेशविषयी असाच निष्कर्ष काढण्यात आला. भाजपच्या माहिती तंत्रज्ञान विभागाने प्रत्येक तालुक्यात एक अधिकारी खास व्हॉटसऍप आणि फेसबुकवर मेसेजेस टाकण्यासाठी नेमला होता. हे मेसेज असे बनवले गेले होते की, ज्यामुळे भाजपची प्रतिमा हिंदुत्ववादी आणि इतरांची प्रतिमा हिंदुविरोधी बनेल. २०१४ मध्ये भाजपने सोशल मीडियाला प्रचारात महत्त्वाचे स्थान दिले. भाजप व भाजप प्रणीत नेते यांनी प्रचाराचे २.५ दशलक्ष ट्विट केले तर काँग्रेस व त्यांच्या अनुयायांनी जेमतेम १ दशलक्ष ट्विट केले. १ जानेवारी २०१४ ते १६ में २०१४ च्या रात्रीपर्यंत ट्वीटरवर ५८ दशलक्ष ट्विट होते. मतमोजणी सुरू झाली तेव्हा जवळजवळ २ दशलक्ष ट्विट लोकांनी केले होते. नरेंद्र मोदी असा उल्लेख असलेले ७२२.९१ हजार ट्विट होते. आपविषयी ११८.७१७ तर भाजपचे ३ लाख २२ हजार ५९६ ट्विट होते, ‘राहुल’ असा उल्लेख असलेले ४७ हजार ०५४ तर वाराणसीबद्दल २१ हजार ०१८ इतके ट्विट होते. त्यामुळे २०१४ ची लोकसभा निवडणूक ही एक प्रकारे ट्विटर निवडणूक होती असेच म्हणायला हवे. कारण सर्वच पक्ष, नेते आणि मतदार यांचा या ट्विटर गदारोळात सहभाग दिसला. या सर्वांचे ट्विटस् मोबाईल, वर्तमानपत्र व टीव्हीवर झळकत होते. २०१४ मध्ये १५० दशलक्ष पेक्षा जास्ती नवीन मतदार होते. बरेचसे तरुण मतदार होते. ही संपूर्ण पिढी सोशल मीडियावर, त्यातही ट्विटरवर कमालीची ऍक्टिव्ह होती आणि आजही आहे. त्यामुळे मत कोणाला द्यायचे याचा निर्णय मतदारांना या सर्व माहितीच्या आधारे घेणे सोपे गेले.

[email protected]
(लेखक कॉर्पोरेट क्षेत्रातील तज्ञ आहेत.)