सौरऊर्जा काळाची गरज


>> अभय यावलकर, [email protected]

20 ऑगस्ट हा दिवस ‘अक्षय ऊर्जा दिन’ म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. अक्षय म्हणजे कधीही कमी न होणारी अशी अक्षय ऊर्जा. आजमितीला देशासमोर नव्हे, तर संपूर्ण विश्वासमोर एकमेव अक्षय पर्याय उभा आहे तो सौरऊर्जेचा. या ऊर्जेचे पर्याय, संधी आणि आव्हाने याबाबत जाणून घेऊया.

‘तमसो मा ज्योतिर्गमयं’ या संस्कृत श्लोकानुसार प्रत्येक सजीव अंधाराकडून प्रकाशाकडे वाटचाल करण्याचा प्रयत्न करत असतो. हा निसर्गनियम सर्वांनाच लागू असल्याने प्रकाश, उष्णता, पवन ऊर्जा याची सोय निसर्गानेच करून ठेवलेली आहे. जोपर्यंत सूर्य अस्तित्वात आहे तोपर्यंत ही विपुल आणि अखंड मिळणारी ऊर्जा सजिवांना आणि प्राणीमात्रांना जीवनदायी ठरणार आहे. पारंपरिक इंधने एक दिवस संपुष्टात येणार ही काळय़ा दगडावरची न पुसली जाणारी रेघ आहे. म्हणूनच शाश्वत आणि अक्षय अशा सौरऊर्जेचा वापर वाढवणे ही सर्व समाजाची गरज होणे आवश्यक आहे.

20 ऑगस्ट हा दिवस ‘अक्षय ऊर्जा दिन’ म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. अक्षय म्हणजे कधीही कमी न होणारी अशी अक्षय ऊर्जा. ऊर्जा ही अशी एक शक्ती आहे जी निर्माण करता येत नाही आणि नष्टही करता येत नाही. फक्त तिचे रूपांतर करता येते म्हणूनच आजमितीला देशासमोर नव्हे, तर संपूर्ण विश्वासमोर एकमेव अक्षय पर्याय उभा आहे तो सौरऊर्जेचा.

ज्या देशात ऊर्जेचा वापर दरडोई जास्त तो देश श्रीमंत म्हणून ओळखला जातो. जे देश थंड कटिबंधामध्ये गणले जातात अशा देशांत 6 ते 10 हजार किलोवॅट प्रतिवर्ष ऊर्जेचा वापर केला जातो. हिंदुस्थानात मात्र हा वापर या देशांच्या तुलनेत नगण्य म्हणजे फक्त 1200 किलोवॅट प्रतिवर्ष इतका आहे. अर्थात आपला देश उष्ण कटिबंधात येत असल्याने सामान्य तापमानाला घरे गरम करण्याचा अथवा थंड करण्याचा प्रश्न तेवढा येत नाही आणि म्हणूनच जरी दरडोई वापर कमी असला तरी फारसा फरक पडत नाही. मात्र उद्योगांना अपुरी पडणारी वीज आणि तिचा असलेला तुटवडा यामुळे औद्योगिकीकरणाच्या विकास प्रगतीत अडथळे निर्माण होतात म्हणूनच मोठय़ा प्रमाणावर अविरत ऊर्जा देणाऱया स्रोतांचा वापर वाढवणे गरजेचे आहे.

आजमितीला 66 टक्के समाज सरासरीपेक्षा कमी म्हणजे सुमारे 870 किलोवॅट प्रतिवर्ष इतक्या विजेचा वापर करतो तर उर्वरित समाजाला 100 किलोवॅट प्रतिवर्ष इतकीही वीज मिळत नाही ही आहे आजची वास्तवता. एकीकडे राजधानीत विजेचा लखलखाट तर अतिदुर्गम भागातील आदिवासी पिढय़ान्पिढय़ा अंधारात वावरत असल्याचे आपण उघडय़ा डोळ्यांनी पाहत आहोत. अजूनही सुमारे 58 टक्के जनता ग्रामीण भागात राहत असून त्यातील सुमारे 35 टक्के कुटुंबांपर्यंत अजून वीज पोहचली नाही हे वास्तव न लपवता येण्याजोगे आहे. आर्थिक दुर्बलता असताना ही 35 टक्के जनता केरोसीनचा वापर करून आपले घर प्रकाशमय करण्याचा प्रयत्न करते. शिवाय स्वयंपाकाच्या इंधनाची परिस्थिती तर त्याहून अधिक गंभीर स्वरूपाची असून 80 टक्के ग्रामीण गृहिणी लाकूड, शेणाचा वापर करतात. या जनतेसमोर तसेच शहरी जनतेसमोर सौरऊर्जा वापराचा पर्याय सोपा आणि सुलभ असून स्वस्त दरात उपलब्ध होणारा आहे.

सूर्याकडून आपल्याला प्रकाश आणि उष्णता मिळत असते. या ऊर्जेचा उपयोग मानवाने फक्त कपडे वाळवणे, पापड वाळवणे आणि अन्नधान्य वाळवणे यापलीकडे केला नाही. नैसर्गिकरीत्या झाडांनी प्रकाशाचा उपयोग अन्न तयार करण्यासाठी केला यालाच आपण प्रकाश संश्लेषण म्हणतो. किंबहुना प्रकाशाचा वापर दिवसा घरात उजेडासाठी केला गेला, मात्र याच प्रकाशापासून वीजनिर्मिती होऊ शकते हा विचार आज सर्वापर्यंत पोहचणे गरजेचे आहे. एक चौरस मीटर क्षेत्रफळावर 1 किलोवॅट ऊर्जा प्रतिदिन मिळत असते. या सौरऊर्जेचा उपयोग अन्न शिजवणे, पाणी गरम करणे, वीजनिर्मिती करणे, अन्नधान्य वाळवणे याकरिता करता येणे शक्य आहे. आज हिंदुस्थानचे क्षेत्रफळ 32,87,263 चौरस कि.मी. असून क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगात हिंदुस्थानचा सातवा क्रमांक लागतो. यापैकी जरी 25 टक्के क्षेत्रफळाचा उपयोग सौर वीजनिर्मितीकरिता केला गेला तर देशाला पुरून उरेल आणि दुसऱया देशाला विकता येईल इतकी वीजनिर्मिती आपल्या देशात होऊ शकते. याचाच अर्थ इतकी क्षमता हिंदुस्थान देशातील सौरऊर्जेत आहे. प्रत्येक कुटुंबामागे 100 लिटर पाणी गरम करण्याचे संयत्र जर 1000 कुटुंबांनी बसवले तर दरदिवशी 1 मेगावॅट विजेची बचत होईल. परिणामी वर्षाकाठी 1500 टन कार्बन-डाय-ऑक्साईडचे प्रदूषण थांबेल.

आज घरांच्या किमती 20 ते 50 लाखांच्या घरात आहेत. काही ठिकाणी विकासक स्वतः पुढे येतात तर काही ठिकाणी फक्त बांधकाम पूर्णत्व प्रमाणपत्रासाठी वेगळे मार्ग अवलंबले जातात. परंतु या प्रकारांना खतपाणी न घालता आपण स्वतःहून योग्य मार्ग अवलंबणे गरजेचे आहे. सर्वसामान्य कुटुंबाने घराच्या किमतीपैकी केवळ दोन लाख रक्कम सौरऊर्जेच्या प्रकल्पासाठी गुंतवल्यास येणाऱया वीज बिलात मोठी बचत झालेली दिसून येईल. या किमतीत अन्न शिजवणे, पाणी गरम करणे आणि दरदिवशी 5ते 6 युनिट वीजनिर्मिती करणे अपेक्षित धरले आहे. म्हणजेच महिन्याकाठी किमान रु. 1800 मात्रची बचत हमखास होते आणि गुंतवलेली रक्कम पुढील 6 ते 7 वर्षांत वसूल होऊन यंत्रणेची किमान 15 वर्षे मोफत सेवा मिळत राहील याची आज अनुभवाने खात्री देता येते. आज आम्ही घर – बंगला झाले की चारचाकी वाहनाची वाट पाहतो हा जरी राहणीमानातील बदल असला तरीही ही गुंतवणूक पुढच्या पिढीसाठीची उत्तम गुंतवणूक म्हणता येणार नाही.

आपली भावी पिढी निसर्गाशी मिळतेजुळते घेणारी नसेल तर आपल्यापेक्षा प्रचंड समस्यांना त्यांना सामोरे जावे लागेल. त्यावेळी आर्थिक समृद्धी भरपूर असेल पण इंधन मिळेलच याची शाश्वती मात्र नसेल यासाठी शाश्वत आणि अक्षय अशा न संपणाऱया सौरऊर्जेकडे प्रत्येक कुटुंबाने सकारात्मक दृष्टीने बघायला हवे. आपल्या देशात किमान 300 ते 325 दिवस आपल्याला उत्तम सूर्यप्रकाश मिळत असल्याने सौरउपकरणे यशस्वी आहेतच. शिवाय त्यासोबत मिळणारे जीवनसत्त्व आणि स्वच्छ इंधन यामुळे आरोग्याला लाभदायक वातावरणही मिळते याची खात्री देता येते.

गावपातळीवर सौरऊर्जेवर चालणारे एक तरी उपकरण प्रत्येक कुटुंबाने वापरावे यासाठी गेली 20 वर्षे सौरऊर्जेचा प्रसार, प्रचार आणि प्रशिक्षण देण्याचा उपक्रम सौरऊर्जातज्ञ अभय यावलकर करत आहेत. या प्रयत्नाला यश मिळत आहे. यातूनच हजारो सर्वसामान्य नागरिक, विद्यार्थी, आदिवासी विद्यार्थिनींना प्रशिक्षण देण्यात यश मिळाले आहे. या प्रशिक्षणातून अनेकानी आपल्या घरी सोलर कूकर, सौरबंब आणि सौरदिवे स्वतः तयार केले असून त्याचा वापर उत्तमरीत्या सुरू आहे. महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण देशात सौरऊर्जेचा वापर वाढला पाहिजे यासाठी अनेक हात तयार होणे ही काळाची गरज आहे.

(लेखक सौरऊर्जातज्ञ आहेत)