…झेपावे सूर्यमंडळा!

>> सुजाता बाबर

विश्वाचे गूढ आपल्याला नेहमीच आकर्षित करते. पुरातन काळापासून मानवाचा हा शोध सुरूच आहे. आता तर प्रगत विज्ञान आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे असंख्य अवकाश मोहिमा जगभरात राबविल्या जात आहेत. मात्र आता ‘नासा’ने ‘पार्कर सोलार प्रोब’ या यानाद्वारे माध्यमातून झेपावे सूर्यमंडळा’ केले आहे. ही मोहीम थेट पृथ्वीवरील चराचर सृष्टीचा ‘जीवनदाता’ असलेल्या सूर्यदेवाचीच ‘कुंडली’ तपासणार आहे. म्हणूनच ‘पार्कर सोलार प्रोब’चे यशस्वी प्रक्षेपण हे अवकाश विज्ञान आणि खगोलशास्त्रासाठी ‘न भूतो’ असा टप्पा ठरला आहे.

सूर्याकडे झेपावणाऱया आणि त्याने तोंड पोळून घेणाऱया हनुमानाच्या अनेक कथा लहानपणी सर्वांनीच ऐकल्या असतील. त्यामुळे सूर्य ही आपल्या हातात न येणारी आणि प्रचंड अग्निकल्लोळ असलेली एक अवकाशस्थ वस्तू आहे हे लहानपणीच मनावर बिंबले जाते. त्यामुळे त्याच्याकडे उड्डाण करणे हे अशक्यप्राय आहे हे आजपर्यंत वाटत होते. पण आता मात्र ‘पार्कर सोलार प्रोब’ नावाच्या यानाने ही ‘अशक्य’ गोष्ट जवळजवळ शक्य केली आहे. ‘नासा’ने नुकतेच हे यान सूर्याच्या दिशेने यशस्वीरीत्या पाठविले आहे. सूर्य हा आपल्यापासून सरासरी 15 कोटी किलोमीटर अंतरावर असलेला सर्वात जवळचा तारा! आपला तारा! ज्या ताऱयामुळे आपले अस्तित्व आहे तो तारा म्हणजे सूर्य! सूर्याचे प्रचंड तापमान, त्याच्या पृष्ठभागावर सातत्याने होणाऱया क्रिया, सौरज्वाला, सौर वादळे यामुळे सूर्याच्या जवळ यान पाठविणे ही कल्पना एकेकाळी अशक्य वाटणारी गोष्ट होती, पण मानवी इच्छाशक्ती, संशोधन वृत्ती, महत्त्वाकांक्षा व सोबत असलेले तंत्रज्ञान आणि विज्ञान याला सीमा नाहीत आणि त्याचमुळे ‘नासा’ने ही अकल्पित वाटणारी गोष्ट प्रत्यक्षात आणून सिद्ध करून दाखविली आहे. ही एक ऐतिहासिक घटना आहे.

यापूर्वीदेखील सूर्याच्या दिशेने यान पाठविले गेले होते. जर्मनी व नासाने मिळून ‘हेलियस-2’ हे यान पाठविले होते. ते सूर्यापासून साधारण 4.30 कोटी किलोमीटर अंतरापर्यंत गेले होते, परंतु ‘पार्कर सोलर प्रोब’ मात्र इतर यानांच्या सातपट जवळ अंतरावर जाणार आहे. या यानासाठी सुमारे 103 अब्ज डॉलर इतका खर्च आलेला आहे.

सूर्याच्या पृष्ठभागावर तापमान साधारण पाच ते सहा हजार डिग्री सेल्सियस इतके असते. इतक्या तापमानामध्ये हे यान जळून जाणार नाही का, हा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. एकतर हे यान सूर्याच्या पृष्ठभागावर जाणार नाही, तर ते सूर्याच्या जवळ जाणार आहे. शिवाय या यानाचे बाह्य आवरण हे सुमारे 2400 डिग्री तापमान सहन करू शकेल असे बनविले आहे. याला थर्मल प्रोटेक्शन सिस्टीम म्हणतात. याचा व्यास आठ फूट आणि 4.5 इंच जाड आहे. या थर्मल प्रोटेक्शन सिस्टिममध्ये कार्बन-कार्बन ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीचा वापर केला आहे. म्हणजे दोन कार्बन प्लेट्समध्ये सँडविच केलेल्या कार्बन कंपोझिट फोमचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे आतील बाजूने तापमान हे 30 डिग्री सेल्सियस इतके सहजपणे ठेवता येईल. शिवाय हे यान सूर्याच्या जवळ जाऊनदेखील जळणार नाही. ‘पार्कर सोलार प्रोब’ व सूर्य यांच्यामधले अंतर साधारण चाळीस लक्ष मैल इतके असणार आहे.

या यानाला ‘पार्कर सोलार प्रोब’ हे नाव प्रसिद्ध शास्त्र्ाज्ञ युजिन न्यूमॅन पार्कर यांच्या गौरवार्थ दिले आहे. हयात असलेल्या शास्त्रज्ञाचे नाव देणे हे कदाचित प्रथमच घडत असावे. मुख्य म्हणजे 91 वर्षांच्या या श्रेष्ठ शास्त्रज्ञाने या यानाचे उड्डाण प्रत्यक्ष पाहिले आहे. युजिन पार्कर हे एक अमेरिकन सौर खगोलशास्त्रज्ञ आहेत. 1950च्या मध्यावर त्यांनी सुपरसॉनिक सौर वाऱयांचा सिद्धांत मांडला होता. बाह्य सौरमंडलात सर्पिल आकाराच्या सौर चुंबकीय क्षेत्राचा अंदाज लावला होता. पार्कर यांनी 1987 मध्ये असे मत मांडले होते की, सौर कोरोनाचे प्रचंड तापमान हे त्यातील असंख्य छोटय़ा ‘नॅनो फ्लेअर्स’मुळे असते. नॅनो फ्लेअर्स म्हणजे सूर्यप्रकाशाच्या पृष्ठभागावर दिसणाऱया सूर्यकिरणांसारखे लहान, सूक्ष्म प्रकाशकण होय. सौरमंडलाविषयी केलेल्या या अमूल्य संशोधनामुळे या यानाचे नाव ‘पार्कर’ असे ठेवले गेले आहे.

सौर वारे फार वेगवान आहेत. ते पृथ्वीच्या कक्षेत पोहोचण्याच्या वेळी त्यांचा वेग ताशी 1.45 दशलक्ष आणि 2.9 दशलक्ष किलोमीटर यादरम्यान असतो. सूर्याच्या पृष्ठभागावर मात्र हालचाल फार वेगवान नसते, परंतु सोलर कोरोनामध्ये असे ‘काहीतरी’ घडते की, ज्यामुळे याच कणांचा वेग प्रचंड सुपरसॉनिक वेगाने वाढतो. हे काहीतरी म्हणजे नेमके काय हे आजही खात्रीने माहीत नाही. तापमानदेखील अचानक वाढून कोरोनामध्ये ते 1 ते 3 दशलक्ष डिग्री सेल्सियस इतके होते. हा परिणाम नेमका काय आहे हेदेखील आज खात्रीने माहीत नाही. याचा शोध घेणे हे या प्रोबचे महत्त्वाचे कार्य असणार आहे. त्याचबरोबर सूर्याच्या इलेक्ट्रिक आणि चुंबकीय क्षेत्रांचे परीक्षण तसेच कोरोनाद्वारे प्लाझ्मा आणि सौर-वारा कणांचे प्रवाहदेखील अभ्यासेल. याशिवाय सूर्याच्या अंतरंगाचा वेध घेईल आणि सौर वारे व सौरज्वाला यांच्या पृथ्वीवरील परिणामांचा अभ्यास करेल. ही संशोधनाच्या दृष्टीनेदेखील एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. या प्रोबच्या सोबत असलेल्या उपकरणांमध्ये व्हाइट लाइट कॅमेऱयाचा समावेश आहे. या कॅमेऱयाद्वारे केवळ सूर्यग्रहणाच्या वेळी पृथ्वीवरून दिसणाऱया किरणोत्सर्गी कोरोनाची छायाचित्रे घेता येतील.

हे यान साधारण कारच्या आकाराचे आहे. याचा वेग साधारण ताशी 7 लक्ष किलोमीटर इतका आहे. मानवनिर्मित यानांमध्ये हे सर्वात वेगवान प्रोब आहे. तरीसुद्धा हे यान डिसेंबर 2024 साली सूर्याच्या जवळ पोहोचेल. या प्रवासात या प्रोबचे सूर्याभोवती एकूण 24 वेळा भ्रमण पूर्ण होईल.

आपल्याला विश्वाचे गूढ नेहमीच आकर्षित करते. त्याकरिता अनेक ताऱयांचा अभ्यास केला जातो. सूर्य हा तर आपल्याला सर्वात जवळचा तारा. त्यामुळे या ताऱयाला जर आपण नीटपणे समजून घेतले नाही तर इतर ताऱयांना कसे समजावून घेणार? ही मोहीम यशस्वी झाली तर एकूणच खगोलशास्त्रात आणि अवकाश विज्ञानात जग मोठे विस्मयकारक पदार्पण करेल. या शोधाने ताऱयाभोवती ग्रहमंडळ कसे निर्माण होते याविषयी अजून नवीन गोष्टी समजण्याची शक्यता आहे. ही मोहीम आजपर्यंतच्या मोहिमांमधील सर्वात आव्हानात्मक मोहीम होती. जगातील खगोलशास्त्रज्ञांना या मोहिमेच्या यशाने आपण मागे कधीच वळून पाहणार नाही हा ठाम विश्वास वाटतो आहे.

(लेखिका खगोलशास्त्राच्या अभ्यासक आहेत)