लेख : मराठी जनांना न्याय मिळवून देणारी चळवळ!

111

>>योगेंद्र ठाकूर, वामन भोसले

मराठी तरुणतरुणींना नोकरीत त्यांचे न्याय्य हक्क मिळवून देणाऱया शिवसेनाप्रणीत स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाच्या चळवळीला उद्या 45 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त महासंघाच्या आजवरच्या कार्याचा आढावा

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 19 जून 1966 रोजी ‘शिवसेना’ स्थापन करून मराठी मनात स्वाभिमानाची जी ठिणगी टाकली तिने ज्वालामुखीचे रूप धारण केले आणि त्यातून उसळलेल्या ठिणग्या लोकाधिकारच्या चळवळीतून उसळत गेल्या. लोकाधिकार ही एक चळवळ आहे. सकल मराठी जनांना न्याय मिळवून देणारी. त्या चळवळीच्या स्थापनेपासून आजपर्यंत अनेक कार्यकर्त्यांनी या चळवळीची धग कायम ठेवली आहे. सुरुवातीच्या काळात न्यू इंडिया इन्शुरन्स, रिझर्व्ह बँक, देना बँक इ. ठिकाणी स्थानीय लोकाधिकार समित्या स्थापन झाल्या. या समित्यांच्या यशाने व कार्याने प्रेरित होऊन ही चळवळ बँक व इन्शुरन्ससारख्या व्यवसायापुरती सीमित न राहता विमान कंपन्या, परदेशी तसेच सहकारी बँका इ.मध्येसुद्धा फोफावू लागली. अशा प्रकारे समित्यांच्या वाढत्या संख्येबरोबरच त्यांच्या कार्याचे नियमन, एकसंघता, एकरूपता साधण्यासाठी फेडरेशनची आवश्यकता प्रकर्षाने जाणवू लागली. याच गरजेतून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेचे नेते सुधीर जोशी यांच्या अध्यक्षतेखाली 45 वर्षांपूर्वी स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाची स्थापना केली. स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचे वाढते कार्य व क्षेत्र याचा विचार करता त्याची पुनर्बांधणी करणे आवश्यक झाले. महासंघाचे सरचिटणीस म्हणून गजानन कीर्तिकर आणि कार्याध्यक्ष म्हणून अरुण जोशी काम पाहू लागले. स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाची स्थापना झाली आणि वेगवेगळय़ा आस्थापनांत काम करणाऱया कार्यकर्त्यांना त्यामुळे बळ मिळाले. मराठी माणसांना नोकऱया मिळाव्यात म्हणून सनदशीर मार्गाने अनेक आस्थापनांत समितीचे कार्य सुरू होतेच. मात्र अधिकाऱयांच्या बेमुर्वतखोर वागण्यामुळे समितीच्या कामाला म्हणावे तसे यश येत नव्हते. ‘साम-दाम-दंड-भेद’ हा तर जगाचा नियम आहे. त्यानुसार समितीला ‘शिवसेना स्टाईल’ निदर्शने करावी लागली, आंदोलनाचा रस्ता धरावा लागला. मार्ग सरळ नाही ही गोष्ट प्रत्येक कार्यकर्त्याला माहीत होती. तरीही त्यांनी मुसंडी मारली. आंदोलने केली. वेळप्रसंगी खटलेही अंगावर घेतले. काहीही झाले तरी मराठी माणसांना हक्क मिळवून देणारी चळवळ जागती ठेवायला हवी, हीच भावना प्रत्येक कार्यकर्त्यांच्या मनात होती.

अर्ज-विनंत्यांच्या मवाळ मार्गाने जाण्यात लोकाधिकार समितीला स्वारस्य नव्हते. प्रसंगी ‘हक्का’साठी दोन हात करण्याची, रणांगण गाजविण्याचीही तयारी होती. त्या मार्गाने समितीच्या कार्यकर्त्यांनी अनेक आंदोलने केली, लोकाधिकार चळवळीचे हे असिधारा क्रत यापुढेही अखंड चालूच राहणार आहे.

1990 नंतर राष्ट्रीयीकृत बँका, केंद्र सरकारच्या अधिपत्याखालील उपक्रम, इन्शुरन्स कंपन्या आदी आस्थापनांतून नोकर भरती थंडावली होती, परंतु 1998 नंतर परदेशी बँका, इन्शुरन्स कंपन्या यांनी आपले जाळे पसरवायला सुरुवात केली. सिटी बँक, स्टॅण्डर्ड चार्टर्ड बँक, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी आदी मोठय़ा बँका व कंपन्यांमध्ये मराठी तरुणांना प्राधान्य मिळावे म्हणून स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाने संघर्ष केला. रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड, केंद्रीय सरकारच्या नोकऱया आदींच्या नोकरीसंबंधीच्या जाहिराती मुंबई-महाराष्ट्राच्या प्रमुख मराठी वृत्तपत्रांमधून द्याव्यात यासाठी यशस्वीपणे लढा दिला. त्यामुळे महाराष्ट्रातील कानाकोपऱयातील हजारो तरुणांना नोकरीसाठी अर्ज करण्याची संधी प्राप्त झाली. अशा या नवीन नोकर भरतीमुळे मराठी तरुणांचा ओढा शिवसेनेकडे वळू लागला. महासंघाने नोकर भरतीचा प्रश्न सोडविताना इतरांवर अन्याय होऊ दिला नाही. त्या आस्थापनांतील मराठी माणसाच्या नोकरीचा, बढतीचा व इतर अन्यायांचा प्रश्न धसास लावला. सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून विविध आस्थापनांत महिलांचे संघटन व सक्षमीकरण करण्याचा प्रयत्न महासंघातर्फे सुरू आहे. प्रतिवर्षी 27 फेब्रुवारी रोजी ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्म हा ‘मराठी भाषा दिन’ म्हणून पाळला जातो. मराठी भाषेविषयी चर्चासत्रे, परिसंवाद आणि सांस्कृतिक कार्यक्रम राबविले जातात.

स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाने सरकारी बँका, खासगी बँका, विमा आणि विमान कंपन्या, पोस्ट आणि तार खाते, मुंबई पोर्ट ट्रस्ट, माझगाव डॉक, पश्चिम व मध्य रेल्वे, राज्य व केंद्र सरकारच्या अखत्यारीतील कार्यालये, खासगी कार्यालये आणि आस्थापनांत आंदोलने केल्यामुळे नोकर भरतीत मराठी टक्का 80 ते 100 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. आज 350 हून अधिक लोकाधिकार समित्या विविध आस्थापनांत कार्यरत आहेत.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आशीर्वाद आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली लोकाधिकार चळवळ भविष्यातही यशस्वी वाटचाल करणार हे निश्चित आहे.

आपली प्रतिक्रिया द्या