प्रासंगिक : शालेय मुलांमधील तणाव आणि दबाव!

3

>>डॉ. स्वाती पोपट वत्स<<

या लेखात लहान मुलांना दोन शब्दांशी ओळख करून देण्याचा माझा प्रयत्न आहे. हे शब्द म्हणजे तणाव आणि दबाव. तणावामुळे तुम्हाला थकल्यासारखे, निराश आणि असहाय्य वाटते. तुमची उद्या परीक्षा आहे, पण तुम्ही त्याचा काहीच अभ्यास केलेला नाही हे तुम्हाला माहीत आहे आणि आता तुम्हाला अपयशी होण्याची चिंता वाटत आहे. या स्थितीला तणाव म्हणतात. तणावामुळे तुमच्या तळव्यांना घाम फुटतो आणि हृदयाचे ठोके जलदगतीने पडू लागतात. तणाव तुमच्या शरीरासाठी चांगला नाही. तणावाशी सामना करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे खालील गोष्टी निश्चितपणे पाळणे-

  1. गृहपाठ किंवा अन्य महत्त्वाची कामे कधीही शेवटच्या क्षणी करण्यासाठी ठेवू नका.
  2. तुमचा अभ्यास दररोज करा.
  3. तुम्हाला कधी तणाव वाटला, घाबरल्यासारखे वाटले तर सर्वांत महत्त्वाचे म्हणजे खोल श्वास घ्या आणि स्वतःला सांगा, मी हे करू शकते किंवा शकतो, मी एकदम मस्त आहे.
  4. तरीही तुम्हाला तणाव जाणवत असेल तर तुमच्या विश्वासातील मोठय़ा व्यक्तीशी बोला. मग ती व्यक्ती तुमच्या आईबाबांपैकी असेल, शिक्षक असतील, मोठे भावंड असेल किंवा आजी-आजोबांपैकी कोणी असेल.

तणाव सर्वांना जाणवतो. तुम्ही तणावाला तुमच्या रोजच्या आयुष्याचा भाग होऊ देता कामा नये, हे महत्त्वाचे आहे.

मग आणखी एक शब्द येतो, तो म्हणजे दबाव. काही वेळा हा दबाव पालकांकडून आणला जातो आणि काही वेळा मित्रमंडळींकडून आणला जातो. तुमचे पालक तुमची तुलना एखाद्या भावंडासोबत किंवा मित्रासोबत करून तुमच्यावर दबाव टाकतात आणि अशा परिस्थितीत तुम्हाला खूप दुःख होते, राग येतो, वैफल्य येते. आता या सगळ्या नकारात्मक भावना आहेत आणि यांच्यामुळे तुमच्यावर तणाव येऊ शकतो. तेव्हा तुमचे पालक तुमच्यावर दबाव आणत असतील, तेव्हा त्यांना सांगा, ‘मी मी आहे. मी वेगळा/वेगळी आहे. माझी तुलना कोणाशीही करू नका. माझी तुलना माझ्याच पूर्वीच्या कामगिरीशी करा. मी ती सुधारण्यावर काम करेन.’

काही वेळा मित्रमंडळी आपल्यावर दबाव आणतात. त्यांच्याकडे मोबाईल फोन असतो आणि मग तुम्हालाही वाटते की, आपल्याकडे मोबाईल फोन असावा. ते त्यांच्या पालकांशी खोटे बोलतात आणि तुम्हालाही तुमच्या पालकांशी खोटे बोलण्यास सांगतात. याला समवयस्कांचा दबाव किंवा पीअर प्रेशर म्हणतात. तुम्हाला त्यांचे ऐकण्याची गरज नाही. तुम्ही म्हणू शकता, ‘तू मित्र म्हणून मला आवडतोस, पण तू करतोस ते सगळे मी करू शकत नाही.’ असे म्हटल्याने काही वेळा तुम्ही तुमच्या मित्राला गमावून बसाल, पण तेही ठीक आहे. कारण तुम्ही करू शकत नाही त्या गोष्टी करणारी किंवा तुम्हाला अयोग्य गोष्टी करण्यास सांगणारी व्यक्ती तुमचा मित्र नसतेच मुळी. तुमचा खरा मित्र तुम्हाला असे काही करायला लावणारच नाही. खरा मित्र तुम्हाला अशा गोष्टी करायला कधीच भाग पाडणार नाही. तो तुम्हाला समजून घेईल आणि आहात तसे स्वीकारेल. तुमच्यावर दबाव आणणार नाही.

निकलोडियन अर्ली चाइल्डहूड असोसिएशनच्या साथीने टूगेदर फॉर गुड या मोहिमेमार्फत तणाव व दबावाविरोधात लढा देणार आहे. या मोहिमेचे नाव आहे-प्रेशर को बोलो बाय. ही वाहिनी आपल्या व्यापक ऑन-एअर मोहिमेला अर्ली चाइल्डहूड असोसिएशनच्या विस्तृत शाळांच्या नेटवर्कची जोड देऊन तणाव व दबावमुक्तीच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकत आहे.

तुम्ही तणाव व दबावापासून दूर राहिलात तर आयुष्यभर आनंदी राहाल. अर्थात जर तुम्ही तणाव व दबाव म्हणजे काय हे ओळखू शकलात तरच या बाबी तुमच्या दैनंदिन आयुष्याचा भाग होण्यापूर्वीच त्यांना दूर पळवू शकाल. तेव्हा तणाव व दबाव म्हणजे काय ते ओळखण्यास शिका आणि तत्काळ पालक किंवा शिक्षकांची मदत घेऊन या बाबींना दूर ठेवा.

(अध्यक्ष, अर्ली चाइल्डहूड असोसिएशन)