लिटल थिएटर : श्वास आणि ध्यास

सुधा करमरकर

>> रत्नाकर मतकरी

सुधा तशी मला सीनियर. तिच्यासोबत मी सुरुवातीला बालरंगभूमीवर काम केले. मी नुकताच ग्रॅज्युएट होऊन लिहायला लागलो होतो. माझ्या श्रुतिका रेडियोवर येत होत्या. त्यातील एका श्रुतिकेत सुधाने कामही केले होते. त्या वेळी ती नुकतीच अमेरिकेतून आली होती. बालनाट्य़ाच्या नव्या कल्पना तिच्या डोक्यात होत्या. परिपूर्ण चिल्ड्रेन थिएटर तिच्या नजरेसमोर होते. असे थिएटर जिथे पोरकटपणा नसेल, अगदी मोठ्य़ांच्या नाटकासारखी छोट्य़ांची पूर्णवेळ रंगभूमी उभारावी, असे तिला वाटायचे. यासाठी लेखक म्हणून तिने मला संपर्क साधला. आम्ही एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये भेटलो. त्यानंतर बालरंगभूमीवर दोन ते तीन वर्षे एकत्र काम केले. माझी दोन नाटके तिने रंगभूमीवर आणली. पहिले नाटक ‘मधुमंजिरी’ आणि दुसरे नाटक म्हणजे ‘कळलाव्या कांद्याची कहाणी.’

‘मधुमंजिरी’ नाटकात सुधा चेटकिणीची भूमिका करायची. खरं तर तिला मधुमंजिरीची भूमिका साकारायची इच्छा होती. पण आपले वय या भूमिकेसाठी मोठे वाटेल असे लक्षात आल्यावर तिने दुसरी मधुमंजिरी शोधायला सुरुवात केली. ‘मधुमंजिरी’ हे साहित्य संघाचे प्रोडक्शन होते. आमच्या तालमी विल्सन कॉलेजमध्ये चालायच्या. आम्ही तिथे भेटायचो. ऑडिशन्स घ्यायचो. मधुमंजिरीचे काम करायला तुला पाहिजे तशी मुलगी माझ्या बघण्यात आहे. ती आताही तशीच दिसत असेल तर तिला बोलावूया, असे मी सुधाला सुचवले. अशारीतीने अभिनेत्री भावना हिची निवड झाली. १९५९ साली रंगभूमीवर आलेल्या या पहिल्या बालनाट्य़ाने रंगभूमीवरील एका नव्या प्रवाहाची मुहूर्तमेढ रोवली. त्यात चेटकिणीची भूमिका ती अफलातून करायची. ‘कळलाव्या कांद्याची कहाणी’ हे आमचे दुसरे नाटक विनोदी होते. फार्सिकल. त्यात साहित्य संघाचे जयंत सावरकर, महेश गोंधळेकर हे काम करायचे. आमच्या नाटकात मोठय़ांच्या भूमिका मोठेच करायचे. मुलांना मिशाबिशा लावायला लागायच्या नाहीत. ‘कळलाव्या कांद्याची कहाणी’मध्ये दोन लहान मुले होती. त्यातील एक भक्ती बर्वे.

नाटक जिथे कुठे करता येईल तिथे करण्याचा आमचा प्रयत्न असायचा. एकदा तर मी आणि सुधा रॉक्सी थिएटरच्या व्यवस्थापनाला भेटलो होतो. सिनेमाच्या ठिकाणी नाटक करता येईल का, हा भेटीमागचा उद्देश होता. सुधा झपाटल्यासारखी काम करायची. पूर्णपणे समर्पण भावनेने. ती थांबायची नाही. तिचे काही अडायचे नाही. स्वत: काम करायची. लिटल थिएटरची प्रमुख या नात्याने सर्व जबाबदारी उचलायची.

माझ्या बालनाट्य़ संस्थेची पंचविशी झाली, तेव्हा म्हणजे १९८७ साली मी सुधाला कार्यक्रमाला बोलावले. त्या वेळी सुधाने कोणतीही पूर्वतयारी नसताना स्टेजवर येऊन चेटकिणीची भूमिका करून दाखवली. उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात तिला दाद दिली. लिटल थिएटर म्हणजे प्रायोगिक रंगभूमी वाटू नये म्हणून तिने ‘लिटल थिएटर- बालरंगभूमी’ असे लिहायला सुरुवात केली. आम्ही लेखक मंडळी एकत्र येऊन नव्या कल्पना मांडायचो. पुढे मुलांच्या कल्पनाशक्तीला वाव द्यायला वेगळे थिएटर हवे यासाठी मी माझी बालनाट्य़ संस्था सुरू केली. सुधा तिच्या संस्थेमार्फत काम करीत होती आणि मी माझ्या संस्थेमार्फत. ‘अल्लाउद्दीन आणि जादूचा दिवा’, ‘हं हं आणि हं हं हं’ आणि ‘चिनी बदाम’ ही तिची बालनाटय़े गाजली. तिची घोडदौड सुरूच होती. तिच्याशिवाय बालनाटय़ चळवळीचा विचारही होऊ शकत नाही, एवढे भरीव काम तिने करून ठेवले आहे. आयुष्याच्या उतारवयात ती फारशी घराबाहेर पडायची नाही. माणसांत मिसळायची नाही. कौटुंबिक आघात तिने झेललेले. आज ती आपल्याला सोडून निघून गेली. बालनाटय़ चळवळीचा एक आधार हरपला.
(लेखक ज्येष्ठ साहित्यिक व नाटककार आहेत.)
– शब्दांकन : शिल्पा सुर्वे