लेख : अंधश्रद्धा : देशव्यापी कायद्याची गरज

55
प्रातिनिधीक फोटो

>> दादासाहेब येंधे

महाराष्ट्र हे अंधश्रद्धाविरोधी कायदा लागू करणारे पहिले राज्य ठरले होते. त्यानंतर शेजारी कर्नाटक राज्यातही हा कायदा लागू झाला आहे. आता गरज आहे ती अंधश्रद्धाविरोधी कायद्याच्या देशपातळीवर अंमलबजावणीची. आजही हिंदुस्थानमध्ये अंधश्रद्धा प्रचंड प्रमाणात दिसून येते त्याला पारंपरिक बुरसटलेल्या मनोधारणा तसेच भोंदू बाबा-बुवांचा स्वार्थीपणादेखील तितकाच कारणीभूत ठरतो. अंधश्रद्धेमुळे सर्वसामान्य जनतेची आर्थिक, बौद्धिक, शारीरिक तसेच मानसिक पिळवणूक मोठ्या प्रमाणात होत असते.

धार्मिक बाबींच्या नावावर अनेक अंधश्रद्धा आपल्याकडे प्रतिष्ठा मिळवून आहेत. त्यालादेखील कडाडून विरोध व्हायला हवा. हिंदुस्थानचे संविधान देशातल्या नागरिकांना विज्ञान आणि विवेकवादाचा पुरस्कार करण्यास शिकविते. तसेच राज्यकर्त्यांकडून त्याच दृष्टिकोनातून जनतेवर शिक्षण आणि संस्काराची अपेक्षा करते. म्हणूनच आता थेट केंद्र सरकारनेच अंधश्रद्धाविरोधी कायदा अमलात आणण्याची वेळ आली आहे. पारंपरिक लोकधारणा एखाद्या कायद्याच्या अंमलबजावणीने संपुष्टात येत नसतात. मात्र ज्या परंपरांच्या पालनामुळे इतर कुठल्याही व्यक्तीवर अन्याय होत नसेल किंवा त्यांची फसवणूक केली जात नसेल, त्याचबरोबर व्यक्तींची कुठल्याही तऱहेने पिळवणूक घडत नसेल तर त्या परंपरेला कोणाचाही विरोध असण्याचे कारण नाही. मात्र परंपरेच्या नावाखाली स्वतःच्या तुंबडय़ा भरणाऱ्या प्रवृत्तीला अंधश्रद्धाविरोधी कायद्याने अद्दल घडवता येऊ शकते.

आजच्या विज्ञान युगातही पैशांचा पाऊस पडतो अशा भूलथापा मारणारे आणि त्यांच्या खोटेपणाला बळी पडणारे लोक आपल्याला दिसून येतात. त्याचबरोबर मांत्रिकाने सांगितले म्हणून लहान मुले बळी देण्याचे अघोरी प्रकार गुप्तधनाच्या लालसेपोटी आजही घडत आहेत. अशा विकृत मनोवृत्तीच्या मागे डोळे बंद करून तसेच बुद्धी गहाण ठेवून जाणाऱ्या लोकांच्या डोक्यांमधील अंधश्रद्धेची जळमटे वेळीच काढणे अतिशय गरजेचे आहे. सामाजिक उत्थानासाठी ते महत्त्वाचे ठरते. अंधश्रद्धेमुळे एक व्यक्तीच नव्हे तर त्या व्यक्तीच्या कुटुंबातील अनेक सदस्य आणि पर्यायाने अवघा समाजच मानसिकदृष्टय़ा गुलाम होत असतो. मुळात आजचे शिक्षण हे नव्या पिढीला विवेकवादी बनवण्यास सक्षम आहे असे वाटत नाही. कारण पुढची पिढी घडवणारे शिक्षकच आज प्रचंड अंधश्रद्धाळू असल्याचे दिसते. हे चित्र बदलून हिंदुस्थान विज्ञानवादाचा पुरस्कर्ता होण्यासाठी अंधश्रद्धाविरोधी कायद्याची देशव्यापी अंमलबजावणी होणे गरजेचे आहे.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या