लेख : मुद्दा :‘तक्षशिला’ दुर्घटनेतून निर्माण झालेले प्रश्न

126

>> वैभव मोहन पाटील

गुजरातमधील सुरत येथील तक्षशिला इमारत दुर्घटनेने अवघ्या देशाला हादरून सोडले. या घटनेतून शिकवणीला जाणाऱ्या आपल्या विद्यार्थ्यांचा जीव किती धोक्यात आहे, याची प्रचीती सर्वांना आली असणार. अनेक क्लासवाले सुरक्षेचे सर्व नियम धाब्यावर बसवून मुलांच्या जिवाशी अक्षरशः खेळत असतात. आज बहुतांशी कोचिंग क्लासेसमध्ये विद्युत उपकरणांचा भरमसाट भरणा असतो. त्याची देखभाल दुरुस्तीदेखील वेळेवर होत नाही ज्यामुळे शॉर्टसर्किटसारख्या घटना घडतात. यामुळे बऱ्याच ठिकाणी विद्यार्थी आपला जीव धोक्यात घालून कोचिंग क्लासेसमध्ये शिक्षण घेत असतात. सुरतमध्ये मागील शुक्रवारी घडलेली घटना याच निष्काळजीपणाचे फलित आहे.

कोचिंग क्लासेसमध्ये आगीपासून सुरक्षेसाठी काहीच उपाययोजना नसल्याने विद्यार्थ्यांना इमारतीच्या थेट चौथ्या मजल्यावरून उडय़ा माराव्या लागल्या. आज बहुतांशी कोचिंग क्लासेसचे ‘फायर ऑडिट’ झाले नसल्याची बाब तपासात पुढे येईल. वस्तुतः शिक्षण क्षेत्रापेक्षा जास्त फायद्याचा दुसरा कोणताच व्यापार आज दिसून येत नाही. त्यामुळे सध्या कुणालाही व्यापार सुरू करावयाचा असल्यास सर्वत्र अगदी गल्लोगल्ली एकतर शाळा नाहीतर कोचिंग क्लासेस उघडले जात आहेत. यामुळे प्रत्येक शहरात बघावे तेथे शाळा व कोचिंग क्लासेस मोठ्या संख्येने वाढल्याचे दिसून येत आहे. लाखो रुपयांची उलाढाल असलेले हे कोचिंग क्लासवाले विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत मात्र कानाडोळा करतात व एके दिवशी सुरतसारखी घटना घडते. या घटनेतून कोचिंग क्लासेसचे नियमित फायर ऑडिट करण्याची बाब पुढे आली आहे. अग्निशमन कार्यालयांनीदेखील अशाप्रकारे मुलांचे भवितव्य घडवणाऱ्या कोचिंग क्लासच्या जागांवर लक्ष ठेवले पाहिजे. तेथील व्यवस्थापनाचा आढावा घेऊन वेळीच त्यांना जाग आणली पाहिजे. कोचिंग क्लासेसनेही स्वेच्छेने त्यांच्या इमारतींचे ‘फायर ऑडिट’ करवून घेणे गरजेचे आहे. या घटनेतील दुसरी बाजूही आपण समजून घेतली पाहजे. जीव वाचवण्यासाठी म्हणून मुलांनी चौथ्या माळ्यावरून उडय़ा मारल्या व मुलांचा यात जीव गेला. ही घटना आपण थोडय़ा वेगळ्या दृष्टीने पाहिली तर मुलांनी उडय़ा का मारल्या, याचा जरा विचार करायला हवा. कारण आगीसारख्या विपरीत परिस्थितीचा सामना करण्याची मुलांना कल्पनाच नव्हती व तशी त्यांची तयारीही नव्हती.

आपत्कालीन परिस्थितीत सुरक्षेसाठी काय करायला हवे ही बाब आपल्या शिक्षण व्यवस्थेत दुय्यम समजली जाते. अभ्यासक्रमात एकापेक्षा एक किचकट विषय शिकवणाऱ्या आपल्या शिक्षण व्यवस्थेला सुरक्षेचे व स्वसंरक्षणाचे मात्र खूप वावडे आहे. शिक्षक वर्षभर केवळ अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी धडपडत असतात ज्याचा मुलांच्या वास्तववादी जीवनाशी फारसा काही संबंध नसतो. त्याऐवजी आपत्कालीन परिस्थितीत कसे वागावे, काय करावे, कोणती उपकरणे वापरावीत याचे धडे मुलांना देणे आवश्यक झाले आहे. आग, भूकंप, अपघात, पूर, बलात्कार, महिलांवरील अत्याचार, गोळीबार यांसारख्या आपत्कालीन परिस्थितींना कसं हाताळायचं, त्याचबरोबर अचानक ओढवलेली परिस्थिती जसे अपघात, हार्ट अटॅक यासाठी प्रथमोपचाराचे प्रशिक्षण मुलांना द्यायला हवे. यासाठी केवळ पुस्तकी धडे न गिरवता प्रात्यक्षिके शाळांमध्ये आयोजित करायला हवीत. आग लागली म्हणून इमारतीवरून उडी मारणं हा पर्याय नाही, पण या परिस्थितीत काय निर्णय घ्यायचा हे न कळल्यामुळे सुरतसारख्या भयंकर दुर्घटना घडतात. यासाठी मुलांना आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी सक्षम बनवण्याची गरज असून त्यासाठी सरकारी पुढाकार व दृष्टिकोन फार महत्त्वाचा आहे. त्यामुळे शिक्षण पद्धतीत केलेला बदल मोठी क्रांती घडवू शकतो. आज आगीच्या घटना रोखण्याबरोबरच शिक्षण क्षेत्रात सुरक्षेच्या अनुषंगाने आमूलाग्र बदल घडवण्याची खरी गरज आहे.

आपली प्रतिक्रिया द्या