लेख : दहशतवादविरोधी लढाई आणि नागरी कर्तव्य

>>ब्रिगेडियर हेमंत महाजन<<

[email protected]

पुलवामा हल्ला झाल्यापासून मीडिया अनेक विषयांवर चर्चा करत आहे. सरकारने काय करावे? सैन्याने काय करावे? सीआरपीएफने काय चुका केल्या? ही चर्चा ठीक आहे, पण त्याहीपेक्षा दहशतवादविरोधी लढय़ात सामान्य नागरिक म्हणून आपण काय केले पाहिजे हे देशाच्या दृष्टीने जास्त हिताचे आहे. त्यासाठी देशवासीयांनी जागे होण्याची वेळ आली आहे. सैन्याने नेमकी कोणती कारवाई करावी हा टीव्ही /मीडियामध्ये चर्चेचा विषय नाही. नेमकी कारवाई करण्याकरिता सैन्य सक्षम आहे. सर्वसामान्य नागरिकांचीही दहशतवादाच्या विरोधातील सरकार व लष्कराच्या लढाईबाबत काही कर्तव्ये आहेत आणि ती त्यांनी पार पाडली पाहिजेत.

देशभरात सध्या पाकिस्तान आणि दहशतवाद्यांचे प्रतीकात्मक पुतळे जाळणे, बंद पाळणे, मेणबत्ती लावून निषेध व्यक्त करणे आदी पाहायला मिळत आहे. याआधी उरी, पठाणकोट, मुंबई आणि त्याआधी संसदेवरील आक्रमण यावेळी हेच चित्र पाहायला मिळाले. त्यामुळे दहशतवाद थांबला नाही व आता व्यक्त केलेल्या देशभक्तीमुळेदेखील तो थांबणार नाही. त्यासाठी आपल्याला अनेक वर्षे प्रयत्न करावे लागतील. पारंपरिक युद्धाचीदेखील तयारी करावी लागेल.

राष्ट्रीय एकात्मता खऱया अर्थाने कशी निर्माण करता येईल याचा विचार करणे आवश्यक आहे. मुळात श्रद्धांजली वाहण्याची वेळ येऊ नये यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. यासाठी देशातील सर्वांनी गट-तट विसरून एकत्र आले पाहिजे. घोषणा देऊन, नुसत्या देशभक्तीच्या भावना व्यक्त करून दहशतवाद थांबणार नाही. त्याकरिता कृतिशील कारवाईची गरज आहे. एकमेकाशी भांडत न बसता, समाजात तेढ न पसरवता एकत्र व्हा आणि सगळे मिळून सैन्याच्या मागे उभे रहा.

प्रत्येक नागरिकाने आपापल्या भागामध्ये एक सैनिक, एक गुप्तहेर म्हणून कान आणि डोळे उघडे ठेवावेत. आज 70 टक्के हिंदुस्थानी हे सोशल मीडियावर आहेत. कान आणि डोळे सोशल मीडियावरदेखील उघडे ठेवा. सोशल मीडियावर देशविरोधी पोस्ट बघितली तर लगेच त्याची लिंक सायबर पोलिसांकडे पाठवा, जेणेकरून त्यावर कारवाई करणे त्यांना सोपे जाईल.

हुतात्मा झालेल्या कुटुंबांना मानसिक आधार द्या, जनता हुतात्मा झालेल्या कुटुंबांच्या पाठीशी आहे हा विश्वास द्या. आर्थिक मदतीसाठी सैन्याचे अनेक अकाऊंटस् उपलब्ध आहेत. या माध्यमातूनही आपण सैनिकांना मदत करू शकतो.

अजूनसुद्धा काही राजकीय नेते, वाट चुकलेले विचारवंत, तज्ञ देशविरोधी वक्तव्ये करून सैन्याचे मनोबल खच्ची करण्याचा प्रयत्न करतात. पाकधार्जिणे फारूक अब्दुल्ला, मेहबुबा मुफ्ती आणि अनेक याचे राजकारणही करतात. अहिंसेचे पुजारी, कोणी मानवाधिकारी आपापले मुद्दे मांडायला आसुसलेले आहेत. सगळे पक्ष एकदिलानं सरकारच्या बाजूने उभे ठाकल्याचे दाखवतील, पण प्रत्यक्षात अनेक नतद्रष्टे नेते त्यात खोडय़ा काढतील.

कायदा-सुव्यवस्था राखण्याच्या कामात समाजातील सर्व स्तरांतील नागरिकांचे सहकार्य घेतले जावे. संबंधित पोलीस ठाण्यांच्या हद्दीत राहणाऱया नागरिकांमधून कायद्याचे जाणकार, सामाजिक समस्यांचे जाणकार, राजकीय जाणकार, वकील, डॉक्टर, शिक्षक अशा सर्व क्षेत्रांतील नागरिकांना निमंत्रित करून त्यांची एक समिती नेमली जावी.

स्थानिक नागरिकांना गुप्त माहिती देण्यासाठी एक टोल फ्री  क्रमांक दिला पाहिजे, जेणेकरून सामान्य नागरिक त्यांच्याकडील माहिती जलद पोलिसांपर्यंत पोहोचवू शकतात. त्यांच्या नावाची गुप्तता बाळगली पाहिजे. मोबाईल फोनवरून हिंसक घटनेचे चित्रण करून पोलिसांकडे पाठवले पाहिजे, जेणेकरून हिंसक आंदोलकांना पकडणे सोपे जाईल.

सीमेपलीकडच्या शत्रूपेक्षा जास्त शत्रू सीमेच्या आत आहेत. जर देश एकत्र पाठीशी उभा नसेल तर सैन्याचे बलिदान व्यर्थच ठरेल.

जात आणि प्रांतीयवादाचा पुरस्कार न करणं ही देशभक्ती आहे. सार्वजनिक मालमत्तेची काळजी घेणं ही देशभक्ती आहे, मतदान करणं ही देशभक्ती आहे, योग्य उमेदवार निवडणं ही देशभक्ती आहे, स्वतःच्या क्षेत्रामध्ये वैध मार्गानं यशस्वी होणं ही देशभक्ती आहे, वाद न घालता काम करणं ही देशभक्ती आहे, इतिहासापासून शिकणं ही देशभक्ती आहे, गतकालातील गोष्टींवर वाद न घालणं ही देशभक्ती आहे, स्वतःच्या कर्तव्यांप्रती जागरूक असणं ही देशभक्ती आहे, महाराज-बाबा-नेते-अभिनेते-कार्यकर्ते-पक्ष-धर्म-विचारसरणी अशा कोणाचेही स्तोम न माजवणं ही देशभक्ती आहे, चांगल्या कामात कोलदांडा न घालणं ही देशभक्ती आहे, स्वतःपलीकडे पाहणं ही देशभक्ती आहे आणि ‘सुजाण नागरिक’ बनण्याचा प्रयत्न करणं ही देशभक्तीच आहे.

आपण हिंदुस्थानी केवळ एक दिवस प्रतीकात्मक देशभक्तीचे प्रदर्शन करून उरलेले दिवस मात्र त्याच पाकिस्तानबरोबरचे क्रिकेट सामने, पाकिस्तानी कलाकारांचे सिनेमे पाहण्यात घालवतो. देशाची अखंडता आणि सुरक्षिततेला बाधक असणारे देशांतर्गत शत्रू तसेच आपापल्या सैनिकांवर दगडफेक करणाऱयांविरुद्ध निर्णायक कृती करण्यासाठी आपले पद, पक्ष बाजूला करून सैन्याला पाठिंबा द्यायला हवा. एक दिवसाची मर्यादित राष्ट्रभक्ती नव्हे, आता राष्ट्रहिताच्या प्रत्येक गोष्टीसाठी प्रतिदिन राष्ट्रभक्ती जोपासायला हवी!

सर्वप्रथम ‘मी या देशाचा आहे’ हा विचार, ही भावना रुजवायलाच हवी. ते काम आपण आज, आता स्वतःपासून सुरू करूया!

> जम्मू-कश्मीरमधील पुलवामा चकमकीदरम्यान सैन्याला जैश-ए-महंमदचा कमांडर गाझी रशीद कामरान आणि एक स्थानिक दहशतवादी यांना ठार करण्यात यश आले आहे. गाझी रशीद यानेच पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा कट रचला होता व हा मसूद अजहरचा निकटवर्तीय आहे. ही चकमक 18 तासांनंतर संपली. मात्र तिन्ही दहशतवाद्यांचा खात्मा करतात. आपले मेजर डीएस ढोंढियाल, शिपाई सावे राम, शिपाई अजय कुमार आणि शिपाई हरी सिंह यांनाही वीरमरण आले. ब्रिगेडियर हरबीर सिंग, लेफ्टनंट कर्नल राहुल गुप्ता, कॅप्टन सौरभ पटणी, मेजर विनायक आणि अनेक सैनिक गंभीररीत्या जखमी झाले. हिंदुस्थानी सैन्याची परंपरा आहे की, सैन्याचे अधिकारी आपल्या सैनिकांचे नेतृत्व दहशतवादविरोधी अभियानांमध्ये सर्वात पुढे राहून करतात. त्यामुळेच आपल्याला यश नक्कीच मिळते, परंतु यामध्ये आपल्या अधिकाऱयांना जखमी व्हावे लागते व प्राणाचे बलिदान पण करावे लागते. राजौरी जिह्यात नियंत्रण रेषेजवळ आयडी बॉम्ब निकामी करत असताना स्फोट होऊन मेजर चित्रेशसिंह बिश्तना वीरमरण आले. त्यांचा येत्या 7 मार्च रोजी विवाह होणार होता. इकडे वडील त्यांच्या लग्नाच्या पत्रिका वाटत होते आणि तिकडे सीमेवर त्यांना वीरमरण आले. विवाहाच्या पूर्वतयारीसाठी सुट्टी घेण्याचा वडिलांचा आग्रह असतानाही त्यांनी देशसेवेला प्राधान्य दिले होते.