मुद्दा : ‘टॉयलेट इकॉनॉमी’


>>जयराम देवजी<<

शौचालयांचा अभाव आणि अस्वच्छता, अस्वच्छ पाणी, यामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या जगात मोठी आहे. आपल्याकडे ‘स्वच्छ भारत अभियान’ सुरू असून, रोगराई कमी करणे हीच त्यामागील भूमिका आहे, परंतु शौचालये हा एक मोठा व्यवसाय बनू शकतो. सर्वांना स्वच्छ आणि सुरक्षित टॉयलेट अर्थात संडास मिळावेत, यासाठी वर्ल्ड टॉयलेट ऑर्गनायझेशन ही संस्था सन 2001 पासून जगभर काम करते आहे. दर 19 नोव्हेंबरला जगभर साजरा होणारा ‘जागतिक शौचालय दिन’ या संस्थेचीच देणगी आहे. संस्थेमार्फत दरवर्षी जगातल्या वेगवेगळय़ा भागांत जागतिक शौचालय शिखर परिषदेचे आयोजन केले जाते. यंदा ते मुंबईतल्या वांद्रय़ामध्ये 19 ते 20 नोव्हेंबरला होते.

सरकारने संडास किंवा शौचालये बांधलीत म्हणजे प्रश्न संपले, असे नाही. हिंदुस्थानात 2014 ते 2018 या काळात साधारणतः 8.8 कोटी शौचालयांचे बांधकाम पूर्ण झाले असे सरकारी आकडे सांगत असले तरी देशात दुष्काळाची समस्या आवासून उभी आहे. त्यामुळे पाणीटंचाई, दुष्काळ, स्थलांतर या समस्यांमुळे या बांधलेल्या शौचालयांचा वापरच होणार नाही हा धोका आहे. त्यामळे पाणी नाही म्हणून शौचालयांचा वापर नाही. अशी वापराविना पडून असलेली किंवा बंद पडलेली शौचालये घाण, रोगराई यांचा अड्डा बनतील याचाही विचार करावा लागेल.

मागेल त्याला शौचालय उपलब्ध झाल्यामुळे उपलब्ध भूजलसाठा दूषित होऊ शकतो. कालांतराने ही एक गंभीर समस्या बनेल. सध्या बरेच शेतकरी म्हणावे तितक्या प्रमाणात उपलब्ध मैल्याचा सोनखत म्हणून शेतात वापर करीत नाहीत. त्यामुळे भविष्यात या मैल्याची एक कचरा म्हणून मोठी समस्या होऊ शकते.

उपलब्ध शौचालयांचे मॉडेल हे संरक्षित टाक्या आणि शौचालय अशा स्वरूपात आहे; पण प्रशासनाकडून त्यांच्या स्वच्छतेची, निगा राखण्याची, तसेच काळजी घेण्याबाबत म्हणावी तशी जनजागृती केलेली दिसत नाही. वापरानंतर काही काळाने संरक्षित टाक्या स्वच्छ कराव्या लागतात. त्या नाही केल्या तर शौचालय तुंबणे, त्यामुळे विषारी वायूनिर्मिती होणे, त्यामुळे अपघात, रोगराई अशा गंभीर समस्या उद्भवू शकतात. यासाठीही प्रयत्न व्हायला पाहिजेत. जगभरात स्वच्छतागृहांचा अभाव आणि स्वच्छ पाण्याचा अभाव, यामुळे पसरणाऱ्या आजारांवर नियंत्रण मिळविण्यासाठी तसेच अन्य अनावश्यक बाबींसाठी 223 अब्ज डॉलर एवढा खर्च दरवर्षी येतो. या पार्श्वभूमीवर 2 ऑक्टोबर 2019 पर्यंत ‘स्वच्छ भारत’ अभियानांतर्गत उघडय़ावरील शौचाची प्रथा आपल्याला पूर्णपणे बंद करायला हवी. तेव्हाच खऱ्या अर्थाने इकॉनॉमी टॉयलेटची संकल्पना साकारता येईल.