मुद्दा : बळी एव्हरेस्टचे, हौसेचे की छंदाचे?

84

>> पंढरीनाथ सावंत

जगातील सर्वात उंच पर्वत शिखर एव्हरेस्टवर (उंची 8848 मीटर) चढण्याच्या प्रयत्नांना नेमकी सुरुवात कधी झाली माहीत नाही, पण माणसाचे पाऊल या शिखरावर प्रत्यक्ष पडेपर्यंतच्या काळात मॅलरी नावाचा फक्त एक गिर्यारोहक एव्हरेस्ट चढण्याच्या प्रयत्नात नाहीसा झाला, असा समज होता. त्याने एव्हरेस्ट सर केले असा दावादेखील काही लोकांनी केला होता. त्याचे बर्फात गाडलेले प्रेत अलीकडेच सापडले.

1952 साल अनेक बाबतीत महत्त्वाचे ठरले. एलिझाबेथ इंग्लंडची राणी म्हणून सिंहासनावर बसली. हिंदुस्थानने लोकशाही प्रजासत्ताकाची राज्यघटना स्वीकारली आणि न्यूझीलंडचा एडमंड हिलरी आणि शेरपा तेनसिंग यांनी एव्हरेस्टच्या माथ्यावर पहिले पदार्पण केले.

हिलरींनी हा विजय राणी एलिझाबेथला अर्पण केला. त्यांना ‘सर’ ही पदवी मिळाली.

त्यानंतरच्या काळात एव्हरेस्ट विजयाच्या तुरळक बातम्या येत होत्या. कर्नल बहुगुणा, बचेंद्री पाल यांनी एव्हरेस्ट सर केले. पण सध्या जशी चांगल्या हंगामात एव्हरेस्ट सर करण्यास गिर्यारोहकांची झुंबड उडते आहे तशी पूर्वी उडत नव्हती. एव्हरेस्ट परिसराला गिर्यारोहकांनी टाकून दिलेल्या वस्तूंनी प्रचंड कचराकुंडीचे स्वरूप येणे, गिर्यारोहक मरणे या गोष्टी गेल्या दहापाच वर्षांतल्या आहेत.

17 मे, रोजी पुण्याचा 27 वर्षे वयाचा निहाल अशफाक बागबान नावाचा माणूस एव्हरेस्टच्या उतारावरून खाली येत असताना थकव्यामुळे (डिहायड्रेशन) मरण पावला. त्यानंतर नेपाळी अधिकाऱयांनी सांगितले की, मार्चमध्ये गिर्यारोहणाचा हंगाम सुरू झाल्यापासून 15 जण मरण पावले आहेत किंवा बेपत्ता झाले आहेत. त्यात 7 हिंदुस्थानी होते. त्याच दिवशी एक ठाण्याची व एक ओडिशामधली अशा दोन स्त्र्ाया उतरत असताना मरण पावल्या.

ठाण्याच्या 54 वर्षे वयाच्या अंजली कुलकर्णी शिखरावरून उतरत असताना कोसळल्या. त्यांची मोहीम नेणाऱ्या अरुण ट्रेक्स ऍण्ड एक्सपीडिशनच्या म्हणण्यानुसार ट्रफिकमुळे त्या ऊर्जा टिकवू शकल्या नाहीत. फुपडेत शेर्पाच्या मते गिर्यारोहकांची भयंकर गर्दी झाल्यामुळे कॅम्पपर्यंत खाली यायला तीन तास जास्त लागतात. हे अशा प्रकारच्या मृत्यूचे कारण बनले. शरीरातले पाणी आणि त्याबरोबर आयुष्यही संपते. 20 तारखेला 5 आदिवासींनी एव्हरेस्ट सर केले आणि इतर सहाजण मरण पावले.

एव्हरेस्ट सर करण्यासाठी उतावीळ झालेल्या गिर्यारोहकांची संख्या इतकी वाढली आहे की, शेवटच्या टप्प्यात त्यांनी एकच रांग लावून चढण चढावी लागते आणि त्याच प्रकारे उतरावी लागते. यात इतका वेळ जातो की शरीरातले पाणी संपते. कोणाला प्र्राणवायू कमी पडतो. गर्दी होण्याचे मूळ कारण म्हणजे हौशी एव्हरेस्ट वीरांची संख्या प्रचंड वाढली आहे. त्यातच हवामान चांगले असण्याचा थोडासा काळ जो मिळतो त्यातच आपलाही विजय पदरात पाडून घ्यावा ही भावना. अशा चांगल्या हवामानाच्या दिवशी शेकडो जण चढाई करतात आणि मग त्यात काही लोक प्राणास मुकतात.

यामध्ये केवळ हौशी मंडळींना दोष देता येणार नाही. ते पेसा खर्चायला तयार असतात. शिखरे पादाक्रांत करण्याला उत्तेजन करण्याऱ्या संस्था-संघटना जागोजाग स्थापन झाल्या आहेत. त्या अशा मोहिमा अर्थात घसघशीत पैसे घेऊन आयोजित करतात. काठमांडूला गेल्यावर प्रथम सरकारची परवानगी मिळवावी लागते. सरकारला चांगला पैसा मिळतो. ते किती जणांना परवानग्या दिल्या, एवढी माणसे एकावेळी चढाई करू शकतील का, याचा विचार सरकारचे अधिकारी कशाला करतील?  सारांश, एव्हरेस्टवर मोहिमा संघटित करण्यापासून नेपाळ सरकारच्या परवानग्या मिळेपर्यंत, मार्गदर्शक व ओझेकरी शेर्पा पुरविणाऱ्या स्थानिक संस्थांपर्यंत एक मोठी निर्दय धंदेवाईक साखळी तयार झाली आहे. तिला एकावेळी दहा माणसे गेली  काय किंवा हजार गेली काय, पर्वा नसते. गेला तर तुमचा जीव गेला, आमचा पैसा आम्हाला मिळाला अशी ही शोकांत गोष्ट आहे.

आपली प्रतिक्रिया द्या