समुद्री जीवांची तस्करी कशी रोखता येईल?

>> संजीवनी धुरी-जाधव

नुकतीच समुद्री अश्वांच्या तस्करीची घटना समोर आली. यांच्याव्यतिरिक्त कासवं, टर्टल्स्, अन्य मासे, मगर यांचीही तस्करी होत असते. जी बऱयाचदा आपल्यासमोर येतच नाही. कशी रोखायची ही तस्करी?

जगण्याचा प्रत्येकाला अधिकार आह. नुकतीच समद्री घोडय़ांची तस्करी केल्याची घटना उघडकीस आली आहे. त्याबाबत समुद्री जिवांची तस्करी कशी रोखता येईल याबाबत जाणून घेऊया केंद्रीय समुद्री मत्स्य संशोधन संस्थेचे निवृत्त समुद्र वैज्ञानिक डॉ. विनय देशमुख यांच्याकडून.

डॉ. विनय देशमुख सांगतात की, समुद्री घोडा हा एक मासा आहे. या माशाचे तोंड बुद्धिबळाच्या घोडय़ासारखे असते. शरीर लांबट असते आणि शेपूट वळलेली असते. हा मासा ज्या ठिकाणी आपण सहज जाऊ शकत नाही अशा ठिकाणी सापडतो. समुद्री किनाऱ्याच्या काही भागाखाली गवत असते. फार थोडय़ा ठिकाणी समुद्रकिनारी अशी ठिकाणे दिसतात. रामेश्वरजवळ, रत्नागिरी या ठिकाणी हे सापडतात. अशा काही मोजक्या ठिकाणांवर हे समुद्री घोडे सापडतात. या समुद्री घोड्याच्या चार जाती देशात सापडतात. त्यातली सोनेरी रंगाची जात हिप्पोकॅम्पस कुडा ही आपल्या इथे सापडते आणि या जातीची सगळय़ात जास्त तस्करी केली जाते.

seahorse

या माशाचे वैशिष्ट्य
या माशाचे वैशिष्ट्य असे आहे की, नर आणि मादीचे मिलन झाल्यावर त्यांच्या बाळांचा सांभाळ मादी करत नाही. यातल्या नराच्या पोटाला पिशवी असते आणि या पिशवीमध्ये हे छोटे जीव आसरा घेतात आणि त्या आश्रयाने तिथे राहतात. नर मासा त्यांचा सांभाळ करत असतो. काही देशांमध्ये या माशांचे फार आकर्षण आहे आणि औषधी म्हणून त्यांचा वापर केला जातो. विशेषता चायनीज लोक या माशांचा व्यवहार करत असतात. त्यांच्यासाठी हवी ती किंमत देत असल्याने त्या किमतीला आपल्या इथे लोक बळी पडतात. खरं तर त्या माशामध्ये कुठलाही औषधी गुणधर्म नाही असे सांगूनसुद्धा ते माशांना पकडतात. यामागे अंधश्रद्धाच म्हणावी लागेल असे डॉ. देशमुख सांगतात.

समुद्री जिवांची तस्करी
समुद्री जिवांच्या तस्करीबाबत डॉ. देशमुख सांगतात, अनेक समुद्री जिवांची तस्करी केली जाते. त्यात समुद्री कासव, काही मासेही आहेत. समुद्री कासवं आकाराने फार मोठी असतात. त्यामुळे समुद्री कासवांची शक्यतो तस्करी होत नाही. पण त्यांची पिले असतात त्यांची तस्करी होण्याची शक्यता जास्त असते. ज्या कासवांची तस्करी होते त्यांना ‘स्टार टर्टल’ म्हणतात. या कासवाला पाच-पाच, दहा-दहा हजार मोजणारी माणसे आहेत आणि मग त्यांची तस्करी होऊन देशाबाहेर पाठवतात. बऱ्याच वेळा शंख आहेत त्याची तस्करी केली जाते. त्यांचा वैशिष्टय़पूर्ण आकार असतो आणि ते लोकांना घरात शोपिस म्हणून ठेवायला आवडतात. शार्क नावाचे मासे आहेत ज्यांना आपण मुशी म्हणतो त्यांचे दात, जबडा, काही विशिष्ट्यपूर्ण खवलं असतात, त्यांची पाखं असतात याचं चायनीज लोक सूप बनवतात. आपल्याकडे दुसरा मासा रांजा मासा, त्याला गिटार फिश म्हणतात. याची पण पाखं काढून सुकवतात आणि त्याची तस्करी करतात.

turtle-1

तस्करी रोखण्यासाठी

  • समुद्री जीवांना समुद्रातच राहु द्या.
  • सर्व प्राण्यांच्या आणि जलचरांच्या सुरक्षेच्या बाबतीत कठोर पावले उचलायला हवीत, त्याची अंमलबजावणी होते की नाही यावरही बारीक आणि सतर्क नजर ठेवणे गरजेचे आहे. त्यासाठी स्वच्छ प्रतिमेचे आणि प्रामाणिक वनाधिकारी निवडायला हवेत.
  • मुळात आपल्या इथे प्राण्यांना नेहमी दुय्यम दर्जा दिला जातो. माणूस हा सर्वश्रेष्ठ प्राणी आहे आणि इतर प्राणी माणसाच्या उपयुक्ततेनुसार. त्यांचे संवर्धन ही मानसिकता बदलायला हवी.
  • निसर्गाने प्राणी आणि माणूस यात भेद केलेला नाही. इतर प्राण्यांपेक्षा जर माणसाला अधिक बुद्धिमत्तेचे वरदान लाभले असले तर त्याने आपली सद्सद् विवेकबुद्धी जागरूक ठेवून स्वतःबरोबर पर्यावरणाच्या हिताचाही विचार करणे संयुक्तिक ठरेल.
  • जलचरांना वाचवायचे असेल तर सर्वप्रथम तेथील स्थानिक आणि कोळी समाजाचे समुपदेशन करणे गरजेचे आहे.
  • अंदमान-निकोबार द्विपसमुहावर जिथे समुद्र हीच मोठी नैसर्गिक संपत्ती आहे तिथे मासेमारीला बंदी आहे. तेथील जलचर अत्यंत सुरक्षित जीवन जगतात. हा आदर्श शासनाने आणि कायद्याने महाराष्ट्रात आणि देशातल्या इतर भागांत ठेवायला काहीच हरकत नाही.