दोन दीर्घांक

सामना प्रतिनिधी । मुंबई

चटाटो आणि हाऊसगुल असे दोन गमतीशीर नावांचे दीर्घांक प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत.

सामाजिक विषय निखळ विनोद करत सशक्तपणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचे प्रयोग मराठी रंगभूमीवर होऊ लागले आहेत. यामध्ये ‘चटाटो’ आणि ‘हाऊसगुल’ या नाटय़कृतींची भर पडली आहे. प्रायोगिक रंगभूमीवरील हे दीर्घांक प्रेक्षकांच्या सोयीकरिता रंगमंचावर एकत्रित सादर होत आहेत.

दोन दीर्घांकांच्या एकाच वेळी सादरीकरणामुळे प्रेक्षकांना कमी तिकिटात दोन वेगवेगळ्या विषयांवरील नाटकं बघायला मिळतील. या उद्देशाने आम्ही ‘चटाटो’ आणि ‘हाऊसगुल’ हे विषय घेऊन प्रेक्षकांसमोर आलो आहोत, असे दिग्दर्शक विनोद जाधव सांगतात.

अस्तित्व आणि इप्रोव्हायझेशन प्रस्तुत, ३० सेकंद मिडिया हाऊस निर्मित प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱया या विनोदी दीर्घांकाची निर्मिती झाली आहे. चटाटो ही लेखक विनोद हडप यांच्या लेखणीतून साकारलेली नाटय़कृती आहे. हेमंत साठे आणि दीपेश मलबारी यांची निर्मिती असलेल्या या प्रयोगांची प्रस्तुती ‘अस्तित्व’ ही नाटय़संस्था करत आहे.

‘चटाटो’ या नाटकात संदीप रेडकर आणि विनोद जाधव ही दोनच पात्रे असून ती वेगवेगळ्या व्यक्तिरेखा साकारतात. ‘चटाटो’ या दीर्घांकात बेकारी हा विषय हाताळण्यात आला आहे. व्यक्तीला पडत्या काळात घ्यावी लागणारी मेहनत यावर हे नाटय़ भाष्य करतं. चटाटो म्हणजे चटईला टाचणी टोचणे हा नाटकातील पात्राला मिळलेला मंत्र. या मंत्राच्या बळावर ते पात्र कसं यश मिळवत प्रगती करतं, यावर आधारित हा दीर्घांक आहे. हल्ली अनधिकृत बांधकामे तोडली जातात, इमारती पाडल्या जातात यावर आधारित ‘हाऊसगुल’ हे लोकनाटय़ असून निर्माता संघाच्या दीर्घांक स्पर्धेत या नाटकाची दुसऱया क्रमांकासाठी निवड झाली होती.

विषयांच्या निवडीविषयी ते सांगतात की, समाजातील सर्वसामान्य व्यक्तींना आज दररोज ज्या समस्यांना सामोरं जावं लागतं अशा पद्धतीचे विषय आम्ही निवडले आहेत. सामाजिक स्तरावरचे विषय विनोदी अंगाने मांडण्यासाठी पात्रांची नावेही घर, सात-बारा अशी ठेवली आहेत. ती पात्रे त्यांच्या नावाप्रमाणेच एकमेकांशी संवाद साधतात आणि आपल्या समस्या मांडतात. संपूर्ण नाटकभर ही दोनच पात्रे अंगतुकाचं काम करतात.

वेगळ्या पद्धतीचं लोकनाट्य
चटाटो आणि हाऊसगुलमधील विषय सर्वसामान्य माणसाच्या जवळचे आहेत. नाटक बघितल्यावर प्रेक्षक पोटभर हसूनही जातील, सध्या अशा पद्धतीची लोकनाटय़ पाहायला मिळत नाहीत. लोकनाट्य आणि दीर्घांकावर आधारित एक वेगळ्या पद्धतीचा प्रयोग प्रेक्षकांना पहायला मिळेल. शिवाय यंदाच्या काळा घोडा महोत्सवात हे लोकनाट्य विशेष लोकप्रिय ठरले होते. प्रेक्षकांसाठी आम्ही सादर केलेला निखळ मनोरंजनाचा प्रयोग प्रेक्षकांच्या निश्चितच पसंतीस उतरेल असा विश्वास विनोद जाधव व्यक्त करतात.