प्रासंगिक – व्हॅलेंटाईन डे आणि आपल्या परंपरा

>>विलास पंढरी 

इसवी सनाच्या तिसऱ्या-चौथ्या शतकात होऊन गेलेल्या कालिदासाने वर्णन केलेला वसंत पंचमी म्हणजेच मदनोत्सव हा व्हॅलेंटाईन डेसारखाच प्रेम व्यक्त करणारा आणि काकणभर सरस असलेला उत्सव आपण जगभर काय, देशपातळीवरही पोहोचवू शकलो नाही.

एका हिंदी सिनेमात एक आजोबा  आजीला वसंत पंचमीला प्रपोज करतात असं दाखवलं आहे. त्यामुळे वसंत पंचमी हा हिंदुस्थानी व्हॅलेंटाईन डे असं म्हणायला हरकत नाही. वसंत पंचमीला विठ्ठल-रखुमाईचं लग्न झालं असंही भक्त मानतात. त्यामुळे पंढरपुरात वसंत पंचमी हा देवाचा लग्नसोहळा साजराही केला जातो. देशातल्या काही भागांत वसंत पंचमीला सरस्वतीची पूजा करण्याचीही पद्धत आहे.

हिंदुस्थानी संस्कृतीत प्रेमाचं वेगळं महत्त्व आहे. वसंत पंचमी हा दिवस प्रेमात, आनंदात घालवतात. हिंदुस्थानात अनेक ठिकाणी रती आणि कामदेव यांचं पूजन करण्याची प्रथा आहे. म्हणून हा हिंदुस्थानींचा व्हॅलेंटाईन डेच आहे. कालिदासाच्या काळात वसंत पंचमीला मदनोत्सव असं म्हटलं जात असे. वसंत पंचमीच्या दिवशी मदन देवता म्हणजे कामदेवतेची पूजा करण्याची प्रथा होती. आपल्या शरीराची व रतिक्रीडेची पूजा केली जात असे. रस, भाव, शृंगार यांचा हा उत्सव होता असे उल्लेख ‘मृच्छकटिक’ आणि कालिदासाच्या ‘मालविकाग्निमित्र’ या संस्कृत नाटकांत आढळतात. राजे-महाराजे आपल्या राजवाडय़ात मदनोत्सव या दिवशी साजरा करीत असत असे उल्लेखही आढळतात.

पश्चिम बंगालमध्ये अजूनही वसंत पंचमीला प्रेमाच्या उत्सवाचं रूप आहे. पश्चिम बंगालमध्ये वसंत पंचमीच्या दिवशी  सरस्वतीची पूजा केली जाते. पूर्वीच्या काळी सरस्वती पूजेच्या दिवशी मुली पहिल्यांदा साडी  नेसत. हा प्रेमाचा दिवस म्हणून साजरा करण्याची परंपराही इथे जुनी आहे.विशेष म्हणजे गेल्या काही वर्षांत लोक हा प्रेमाचा पारंपरिक दिवस ‘व्हॅलेंटाईन डे’सारखाच साजरा करू लागले आहेत.

प्रसन्न वातावरण असलेल्या गुलाबी थंडीत वसंत ऋतू व वसंत पंचमी येते. योगायोगाने व्हॅलेंटाईन डेही याच सुमारास येतो, पण आपल्या परंपरा आपण  विसरत चाललोय आणि मार्केटिंगचा जमाना असल्याने वसंत पंचमी कधीच मागे पडली  असून व्हॅलेंटाईन डे मोठय़ा प्रमाणात साजरा होऊ लागला आहे.

प्रेमाचे प्रतीक असलेला पाश्चिमात्य संस्कृतीमधील ‘व्हॅलेंटाईन डे’ (14 फेब्रुवारी) तर हिंदुस्थानी संस्कृतीमधील ‘कामदेव व रती’ या प्रेमिकांच्या जोडीतील कामदेव अर्थात मदन याचा जन्मदिवस म्हणजे ‘वसंत पंचमी’. हे दोन्ही दिवस 1986 आणि 2013 साली एकाच दिवशी आले होते. माघ शुक्ल पंचमी म्हणजेच ‘वसंत पंचमी’ला मदनाचा जन्म झाला. या दिवशी ‘रती-मदना’ची पूजा केली जाते. प्रेमाचे प्रतीक असलेला पाश्चिमात्य संस्कृतीमधील व्हॅलेंटाईन डे दरवर्षी 14फेब्रुवारीला जगभर साजरा केला जातो. तिसऱ्या शतकात रोममधील क्लॉडियस दुसरा या  राजाने तरुण मुलांनी विवाह करू नये असा एक नियम लागू केला होता. त्याच्या मते विवाहित पुरुषांपेक्षा

अविवाहित पुरुष चांगले सैनिक असतात. त्या काळातील व्हॅलेंटाईन या धर्मगुरूला हे अयोग्य वाटल्याने त्याने राजाच्या नियमाचे पालन न करता गुपचूप प्रेमी युगुलांचे विवाह लावणे चालू ठेवले. जेव्हा राजा क्लॉडियसला हे कळले, तेव्हा त्याने व्हॅलेंटाईनला ठार मारण्याचा आदेश देत त्याची तुरुंगात रवानगी केली. रोमच्या कारागृहात असलेला व्हॅलेंटाईन कारागृहातील तुरुंगाधिकाऱ्याच्या तरुण मुलीच्या प्रेमात पडला. मृत्यूपूर्वी त्याने तिला एक पत्र पाठवले आणि त्यात “तुझ्या व्हॅलेंटाईनकडून’’ असे पत्राच्या शेवटी  लिहिले. तेव्हापासून अशी पत्रे प्रेमवीर लिहू लागले. आजही असे लिहिलेली पत्रे उपलब्ध आहेत. काही लोकांचे मत आहे की, व्हॅलेंटाईनची पुण्यतिथी साजरी करण्यासाठी फेब्रुवारीमध्ये व्हॅलेंटाईन डे साजरा केला जातो. पुढे पाचव्या शतकाच्या शेवटी पोप जिलेसियसने 14 फेब्रुवारी या दिवसाला ‘सेंट व्हॅलेंटाईन डे’ म्हणून घोषित केला.

या दिवसाचा प्रेमाशी संबंध मात्र बऱ्याच वर्षांनंतर प्रस्थापित झाला.विशेष म्हणजे पाश्चात्त्य संस्कृतीतील हा दिवस हिंदुस्थानात तरुणाईचा एक आवडता दिवस झाला आहेच, पण हल्ली पूर्ण आठवडाभर साजरा करण्याची  पद्धत रुजली आहे. 7 ते 14 फेब्रुवारी या आठवडय़ात रोझ डे, प्रपोज डे,चॉकलेट डे, टेडी डे, प्रॉमिस डे, हग डे, किस डे आणि व्हॅलेंटाईन डे म्हणजेच व्हॅलेंटाईन डेच्या आठवडय़ातील सर्वात महत्त्वाचा दिवस,14 फेब्रुवारी! हे सगळे दिवस आणि त्यांची साजरा करण्याची पद्धती पाहिल्यास प्रेमासारख्या पवित्र भावनेचे बाजारीकरणच झाल्याचे स्पष्ट दिसते.