ठसा – वसंत तावडे

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित झालेले ज्येष्ठ आणि निष्ठावान शिवसैनिक वसंत तावडे शिवसेनेच्या स्थापनेपासून कार्यरत आहेत. शिवसेनेच्या अनेक आंदोलनात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. वसंत तावडे हे मूळचे गिरगावकर.  शिवसेनेच्या स्थापनेच्या वेळी जे हजारो मराठी तरुण शिवसेनाप्रमुखांच्या विचारांनी भारावून गेले त्यापैकी वसंत तावडे एक. शिवसेना नेते सुभाष देसाई यांना त्यांनी सतत मोलाची साथ दिली. शिवसेना तसेच ‘प्रबोधन’ संस्था या दोन्ही ठिकाणी वसंत तावडे यांनी मोलाचे योगदान दिले आहे. १९७० च्या दशकात शिवसेनेच्या व्यापार विभागातर्फे स्टेशनसमोर चारचाकी गाडीवर सुरू केलेले (कांदे-बटाटे, फळे, लॉटरीची तिकिटे) विक्री केंद्र, मराठी फेरीवाल्यांना धंद्यासाठी मदत, फटाके विक्री, अ. भि. गोरेगावकर शाळेच्या क्रीडांगणावर आयोजित भव्य नाटय़ महोत्सव, ग्रामपंचायत मार्गावरील परप्रांतीय फेरीवाल्यांशी शिवसैनिकांनी केलेला दीर्घकाळ संघर्ष अशा अनेक आंदोलनात तावडे यांचा सक्रिय सहभाग राहिला. टोपीवाला वाडीतील सुप्रसिद्ध गणेशोत्सव बंद पडू नये म्हणून त्यावेळी सुभाष देसाई यांच्या नेतृत्वाखाली तो उत्सव आरे मार्गावरील जयकर स्मृती बिल्डिंगच्या आवारात दणक्यात साजरा करण्यात आला होता. त्यातही तावडे यांचा सहभाग होता. ‘शिवसेना अमर झाली’ हे पुस्तक त्यांनी लिहिले आहे. त्याशिवाय ‘वसंतश्री’ हा त्यांचा दिवाळी अंकही अत्यंत दर्जेदार साहित्याने भरलेला असतो. अनेक वर्षांपासून अत्यंत कष्टपूर्वक हा अंक ते नियमितपणे प्रकाशित करीत आहेत. त्यांच्या या अंकाला अनेकदा सर्वोत्कृष्ट दिवाळी अंकाचे पुरस्कारही मिळाले आहेत. वसंत तावडे आज वयाच्या ८१ व्या वर्षात पदार्पण करीत आहेत, मात्र  त्यांचा कामाचा उत्साह आजही कायमच आहे.