ठसा : कृ. पां. सामक

6

कृष्णराव पांडुरंग ऊर्फ कृ. पां. सामक यांच्या निधनाने जुन्या पिढीतील एक अभ्यासू पत्रकार आणि मार्गदर्शक काळाच्या पडद्याआड गेला आहे. मराठी वृत्तपत्रसृष्टीच्या आजच्या पिढीला हे नाव कदाचित परिचित नसेलही, पण जुन्या पिढीतील मराठी पत्रकारितेचे ते एक बिनीचे शिलेदार होते. विशेषतः मंत्रालय आणि राजकीय पत्रकारिता व कृ. पां. सामक हे एक प्रदीर्घ काळ जोडलेले नाते होते. ध्येयवादी पत्रकारितेचे ते ज्येष्ठ प्रतिनिधी होते. आज मुंबईच्या आझाद मैदानात मराठी पत्रकार संघाची जी स्वतःची वास्तू दिसते ती मिळाली सामक यांच्याच कार्यकाळात. 1970-71 या वर्षी सामक हे मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष झाल्यानंतर या वास्तूचे काम धसास लागले आणि मार्गी लागले. पत्रकार संघाच्या शेजारीच असलेली प्रेस क्लबची वास्तू मिळविण्यातही सामक यांचा मोठा वाटा होता. त्यांच्याच पुढाकाराने मंत्रालय विधिमंडळ वार्ताहर संघाचीही स्थापना झाली. त्यावरूनही सामक यांनी मराठी वृत्तपत्रसृष्टीसाठी किती पायाभूत कार्य करून ठेवले आहे याची कल्पना येते. स्वातंत्र्योत्तर काळात मराठी पत्रकारांच्या पिढय़ा घडविण्याचे कार्य ज्या ज्येष्ठ पत्रकारांनी केले त्यात ‘कृ.पां.’ यांचेही नाव घ्यावे लागेल. सामक हे खरोखर हाडाचे पत्रकार होते. म्हणजे राजकीय पत्रकारितेत त्यांचा हातखंडा होताच, पण ती करीत असताना पत्रकारांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी मुंबई मराठी पत्रकार संघ, मंत्रालय विधिमंडळ वार्ताहर संघ आणि इतर संघटनांच्या माध्यमातून तसेच राजकीय वर्तुळाशी असलेल्या त्यांच्या स्नेहपूर्ण संबंधातून सतत धडपड केली. तत्कालीन सत्ताधारी, विविध पक्षांचे आमदार, नोकरशहा यांच्याशी कृ. पा. सामक यांचे अत्यंत जिव्हाळय़ाचे संबंध  होते. मात्र त्याचा वापर व्यक्तिगत कामांसाठी अथवा गैरकामांसाठी त्यांनी कधीच केला नाही. त्यांची पत्रकारिता ही ध्येयवादी होती. सरळमार्गी होती. कोणाच्याही ‘ऋणा’त ती कधी राहिली नाही. निखळ राजकीय बातमी हेच सामक यांचे वैशिष्टय़ होते. विधिमंडळ आणि मंत्रालयात वार्ताहर म्हणून अनेक वर्षे त्यांनी काम केले. हे करीत असताना राजकीय बातमीचे सगळे निकष सामक यांच्या वृत्तलेखनात दिसत. बरीच वर्षे मंत्रालयात रिपोर्टिंग करूनही कधी त्यांच्या एखाद्या बातमीकडे कुणी बोट दाखवू शकले नव्हते. फक्त ‘मंत्रालय एके मंत्रालय’ किंवा ‘विधिमंडळ एके विधिमंडळ’ असे सामक यांच्या राजकीय बातमीदारीचे स्वरूप नव्हते. विधिमंडळाचे अधिवेशन असेल तर रेग्युलर बातम्यांशिवाय ‘लॉबी’तील राजकारणाच्या बातम्यादेण्यावरही त्यांचा कटाक्ष असे. अधिवेशनाचे वृत्तांकन करताना सरकार व विरोधी पक्ष या दोघांना समान न्याय देण्यावर त्यांनी कायम भर दिला. शिवाय सामक यांचा स्वभावही मितभाषी होता. ‘बातमी’शिवाय अन्य कुठले हितसंबंध त्यांनी त्यांच्या पत्रकारितेत निर्माण होऊच दिले नाहीत. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात तसेच सरकारी कर्मचारी-नोकरशहा यांच्यात त्यांच्याबद्दल कायम आदराची भावना राहिली. अर्थात प्रदीर्घकाळ राजकीय बातमीदारी करूनही त्यांनी कोणते मोठे पद स्वीकारले नाही किंवा त्यासाठी एका वृत्तपत्रातून दुसऱया वृत्तपत्रांत उडय़ा मारल्या नाहीत. आज जे चित्र दिसते. त्या पार्श्वभूमीवर सामक यांचे हे वैशिष्टय़ निश्चितच वेगळे म्हणावे लागेल. सुरुवातीला मुंबईच्या कापड गिरणीत नोकरी करणारे कृ.पां.सामक स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या प्रेरणेने पत्रकारितेत आहे. 1945 च्या सुमारास त्यांनी सांगलीतील साप्ताहिक विद्यममधून लिखाण सुरू केले. नंतर ‘प्रभात’, ‘लोकमान्य’, ‘गावकरी’ आदी दैनिकांतून प्रवास करीत ते दै. ‘लोकसत्ता’मध्ये स्थिरावले. तेथेच त्यांनी प्रदीर्घ राजकीय पत्रकारिता केली. 1980 मध्ये सेवानिवृत्त होईपर्यंत ते तेथेच होते. या साडेतीन दशकांची त्यांची पत्रकारिता नेहमीच ध्येयवादी आणि नैतिक मूल्यांना न सोडणारी राहिली. ते हाडाचे पत्रकार होते. पत्रकारांच्या समस्या सोडविण्याची तळमळ त्यांना होती. पत्रकारितेतील त्यांच्या कार्याची पावती म्हणून त्यांना ‘चंद्रकांत व्होरा’, ‘अनंत हरी गद्रे’, ‘ग. गो. जाधव’ आदी पुरस्कारांनी गौरविण्यात आले. जुन्या पिढीतील एक सच्चा पत्रकार म्हणून त्यांचे नाव मराठी वृत्तपत्रसृष्टीच्या इतिहासात कायमचे नोंदवले जाईल.