लेख : ठसा : व्यंकटेश आबदेव

89

>> दादा वेदक

विश्व हिंदू परिषदेचे धडाडीचे कार्यकर्ते आणि मंत्री व्यंकटेश नारायण आबदेव यांनी संघाच्या, परिषदेच्या कार्यप्रणालीवर अविचल श्रद्धा ठेवून आपले कर्तृत्व विकसित केले. हिंदू समाजाला प्रेरक दिशा देण्याचे कार्य केले. स्वामी विवेकानंद म्हणतात, ‘जगाचा इतिहास म्हणजे मोजक्या श्रद्धावंतांची जीवनकथा होय.’ श्रद्धा ही  मानवाच्या जीवनास दिशा, गती, आकार, वेग आणि तेज देते. त्यामुळे श्रद्धावान माणूस तेजस्वी, ओजस्वी, मनस्वी यशस्वी होतो. हेच आबदेव यांच्या बाबतीत सांगता येईल. 28 मे 2019 रोजी ते चिरंतनाच्या प्रवासास गेले; आणि तीन  – साडेतीन वर्ष मृत्यूसमवेत अखंड चाललेला संघर्षही शांत झाला. विदर्भ प्रांतात नागपूरजवळील ब्रह्मपुरी या गावी 21 नोव्हेंबर 1952 रोजी त्यांचा जन्म झाला. ब्रह्मपुरी येथेच दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करून येथील नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयात बी.कॉम., एम.कॉम. पदवी प्राप्त केली. शैक्षणिक कालखंडातच आबदेव यांना सामाजिक कार्याची आवड निर्माण झाली. शालेय शिक्षणाबरोबरच राष्ट्रीय विचारसरणीचे बाळकडू त्यांना मिळाले. शिवाय वडील नारायणराव आणि आई शालिनीदेवी यांचे संस्कार होतेच. ते बाळासाहेब या नावाने ओळखले जायचे.

बाल्यकाळापासून ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडले होते. ब्रह्मपुरीत नित्य संघ शाखेत अनुसंधानात राहिले. महाविद्यालयात असताना ते अ. भा. विद्यार्थी परिषदेच्या कार्यात सक्रिय होते. त्यांचा कार्यप्रवास ब्रह्मपुरी गावातून सुरू झाला आणि दिल्लीत केंद्रीय स्तरापर्यंत पोहोचला. 1975च्या सुमारास आबदेव यांनी सर एस.ए.ज्युनिअर महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून नोकरी स्वीकारली. साधारणतः 1984च्या सुमारास जंजिरा मुरूड येथे विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष म्हणून कार्यभार स्वीकारून विहिंपच्या कार्यास प्रारंभ केला. 1988 मध्ये ते रायगड जिल्हय़ाचे मंत्री झाले, तर 1990 च्या सुमारास रायगडचे विभागीय मंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारली. 1988 मध्ये त्यांनी आळंदी येथील विशाल हिंदू संमेलनाच्या धर्तीवर जंजिरा मुरूड येथे विराट हिंदू संमेलनाचे आयोजन केले. संमेलन यशस्वितेसाठी मुरूड तालुक्यामधील 67 गावांत भक्ती फेरीच्या माध्यमातून सजीव संपर्क केला. त्यामुळे 25 हजारांची उपस्थिती लाभली. हिंदू राष्ट्राचे हे छोटे स्वरूप बघून करवीर पीठाचे शंकराचार्य विद्याशंकर भारती आणि तरुण भारतचे तत्कालीन संपादक वि. ना. देवधर आश्चर्यचकित झाले. आबदेव यांच्या समर्थ नेतृत्वाची ही पोचपावती होती.

विश्व हिंदू परिषदेच्या सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमाचा एक भाग म्हणून मुंबईत 2014 मध्ये बी.के.सी. परिसरात दीड लाखांच्या उपस्थितीत विराट हिंदू संमेलन संपन्न झाले. त्यावेळी अशोकजी सिंघल, कांची कामकोटी पीठाचे शंकराचार्य जयेंद्र सरस्वती, नरेंद्र महाराज, विश्वेश्वरानंद महाराज, संघाचे सहसरकार्यवाह दत्ताजी होसबाळे उपस्थित होते.  विहिंपच्या कार्यप्रणालीवर व वरिष्ठ पदाधिकाऱयांवर नितांत श्रद्धा होती. 2004 साली प्रतापगड आंदोलनाचा महत्त्वाचा विषय होता. काही आक्रमक मुस्लिम समाजकंटकांनी अफझल खानाच्या कबरीचे उदात्तीकरण चालवले होते. ते तत्काळ थांबवावे, यासाठी हे आंदोलन व्यंकटेश आबदेव यांच्या नेतृत्वाखाली 12 सप्टेंबर रोजी सातारा जिल्हय़ात  पाचवड येथे निश्चित झाले. त्यासाठी जिल्हय़ातून आठ ते दहा हजार लोक एकत्र आले. एकाचवेळी पाचवड, पोद्दारपूर या ठिकाणी झालेल्या आंदोलनाच्या वेळी पोलीस बंदोबस्तही कडेकोट होता. भूमिगत असलेले आबदेव व त्यांचे सहकारी आंदोलनाच्या ठिकाणी प्रकट झाले. प्रतापगडावर  कडेकोट बंदोबस्त असताना ते कार्यकर्त्यांसह पोहोचले. या आंदोलनामुळे कबरीच्या ठिकाणी झालेले बांधकाम पाडण्यासाठी उच्च न्यायालयाने आदेश दिला. संघर्षात अग्रेसर असणारा अफझल खान मेमोरियल ट्रस्ट बेकायदेशीर ठरवण्यात आला. शिवप्रताप दिन उत्सव शासनाच्या वतीने तिथीप्रमाणे करण्यास प्रारंभ झाला. शासकीय इतमामानुसार शिवछत्रपतींना तोफा व बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना दिली जाऊ लागली. शिवप्रताप दिनाच्या दिवशी शासकीय सुट्टी जाहीर होऊन त्या दिवशी मुलांसाठी कार्यक्रमांचे आयोजन होऊ लागले. विशेष म्हणजे या आंदोलनामुळे अगणित कार्यकर्त्यांना संघर्षमय आंदोलनाच्या कार्याची दिशा मिळाली. यामुळे आबदेव यांचे नेतृत्व सिद्ध झाले.

 

आपली प्रतिक्रिया द्या