लेख : वेब न्यूज :तंत्रज्ञान कंपन्यांतील व्यापारयुद्ध निगराणीखाली

44

>>स्पायडरमॅन

सध्या जागतिक व्यापार हे जणू एक युद्धच बनू लागले आहे. आपल्या प्रतिस्पर्धी कंपन्यांचे नुकसान करण्यासाठी, त्यांचा व्यवसाय कमी करण्यासाठी विविध क्षेत्रातील दिग्गज कंपन्या वेगवेगळय़ा प्रकारच्या युक्त्या, प्रलोभने वापरत आहेत. अनेकदा बेकायदेशीर मार्गांचा वापर, बेहिशेबी सवलती देऊन या व्यापार क्षेत्रात आपल्या प्रतिस्पर्धी कंपन्यांच्या व्यापारावरती हे दिग्गज प्रभाव टाकताना सर्रास दिसत आहेत. मात्र अनेक मोठ्या देशांनी आता या कंपन्यांच्या अशा कारभाराला चाप लावण्याचे ठरवले असून त्या दृष्टीने पावले उचलण्यास सुरुवातदेखील केली आहेत.

अमेरिकेने सध्या आपली नजर सिलिकॉन व्हॅलीच्या गैरकारभारावरती रोखलेली असून फेसबुक, गुगल आणि ऍपलसारख्या तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपन्या अमेरिकेच्या ‘Federal Trade Commission (FTC)’ आणि ‘justice department’ सारख्या महत्त्वाच्या न्यायसंस्थेच्या रडारावरती आलेल्या आहेत. या कंपन्या आपल्या ताकदीचा आणि व्यापार जगातील पत अयोग्य प्रकारे वापर करून इतर लहान कंपन्यांवरती प्रभाव तर टाकत नाहीत ना, यासाठीचा तपास आता या सरकारी यंत्रणा करणार आहेत. Federal Trade Commission (FTC) ही संस्था फेसबुकची तपासणी करणार आहे, तर ‘justice department’ हे गुगलच्या कारभाराची तपासणी करणार आहे. यासंदर्भात अमेरिकेतील काही मोठ्या वृत्तसंस्थांनी बातमी दिलेली आहे. या बातमीनंतर नॅसडॅकच्या बाजारात फेसबुकचे शेअर 7 टक्केने तर ऍपलचे 3 टक्के खाली कोसळल्याची बातमी आहे. व्यापार क्षेत्रात विशेषतः सिलिकॉन व्हॅलीमध्ये होत असलेल्या अशा अनेक गैरप्रकारांच्या तक्रारीनंतर ट्रम्प प्रशासनाने व्यापाराच्या समान संधी आणि सुशासन या दृष्टीने कठोर कारवाईचे संकेत दिले असल्याची चर्चा यानिमित्ताने जागतिक पातळीवरती होत आहे. अमेरिकेच्या नंतर आता इतर युरोपीय राज्ये, आशियातील प्रमुख देश आपल्या नियमांमध्ये काय बदल करतात व आपापल्या देशातील व्यापार सुधारणांसाठी काय पावले उचलतात हे बघणे महत्त्वाचे असणार आहे. दुसरीकडे फेसबुक, गुगल अथवा ऍपल या कोणत्याच कंपनीने अजूनही अधिकृतरीत्या या बातमीवरती आपली प्रतिक्रिया दिलेली नाही.

आपली प्रतिक्रिया द्या