लेख : मुद्दा : दप्तराचे ओझे एक आजार

>>  जयराम देवजी

शिक्षणात पालकांच्या इच्छा आणि अपेक्षा, शिक्षकांचा साचेबंद स्वभाव, संस्थाचालकांच्या मनमानी कल्पना आणि सरकारच्या नुसत्याच प्रसिद्ध होणाऱ्या नियमावल्या या सर्वांचं ओझं विद्यार्थ्यांच्या मनावर लादले जात आहे. याचा शिक्षण व्यवस्थेमध्ये कुठेही विचार होताना दिसत नाही. 1977 मध्ये स्थापन झालेल्या ईश्वरभाई पटेल समितीपासून 1993 मध्ये स्थापन झालेल्या यशपाल समितीपर्यंत सर्वच समित्यांनी भरभक्कम दप्तराचे ओझे चिमुरड्यांच्या पाठीवरून कमी करण्याबाबत शिफारसी केल्या होत्या. ख्यातनाम लेखक आर. के. नारायणन यांनीही 1991 मध्ये मुलांच्या पाठीवर लादल्या जाणाऱ्या ओझ्याचा विषय छेडला होता, परंतु करीअरसाठी चाललेली तीक्र स्पर्धा आणि स्पर्धेत मागे पडण्याची भिती या दोन बाबी चिमुकल्यांच्या वेदनांपेक्षा प्रभावी ठरल्या.

दप्तराच्या ओझ्याचे दुष्परिणाम पाहिले तर विद्यार्थ्यांचे आरोग्य खरोखर संकटात येत असल्याचे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. जड दप्तर घेऊन जाणाऱ्या विद्यार्थ्यांना पाठदुखी, मानदुखी, पाठीच्या कण्याचा आकार बदलणे, फुप्फुसाची कार्यक्षमता कमी होणे, सांधे आखडणे, मांड्यांवर ताण येणे अशा विविध शारीरिक व्याधी जडत आहेत. काही विद्यार्थ्यांना दप्तरांच्या ओझ्यामुळे एका बाजूला झुकणे आणि खांदे पाडून उभे राहणे अशा अयोग्य सवयी जडलेल्या आहेत, तर काही विद्यार्थ्यांना गुडघेदुखीचाही त्रास होतो. दप्तराच्या ओझ्यामुळे उद्भवणाऱ्या या सर्व शारीरिक व्याधींसाठी पहिला कारणीभूत ठरणारा घटक म्हणजे पालक आहे. त्याच्या दप्तराचे वजन कमी करण्यापेक्षा पाण्याची बाटली, जेवणाचा डबा, गृहपाठाच्या वह्या, खासगी प्रकाशकांची मार्गदर्शके, नसलेल्या तासांची वह्या-पुस्तके असतात. ते पाहण्याची जबाबदारी पालकांची आहे.

शासनानेसुद्धा अभ्यासक्रमाची व्याप्ती वाढवून पाठय़पुस्तकांचे आकार वाढवले आहेत. पाठय़पुस्तकांचा दर्जा वाढविण्याच्या नादात दप्तरांचे ओझे वाढत आहे याचा विचार झालेलाच नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या प्रश्नाकडे कुणीही गांभीर्याने पाहायला तयार नाहीत. न्यायालयाचे निकालसुद्धा सातत्याने लागताहेत. त्याचे परिणाम काहीही दिसत नाहीत. याला जबाबदार कोण? म्हणूनच दप्तराचे ओझे वाढवण्यापेक्षा अध्ययन, अध्यापनाचे ओझे वाढवण्यासाठी सर्वांनी आपली मानसिकता सकारात्मक करणे हेच याला खरे उत्तर आहे. ‘दप्तराचे ओझे’ हा आजार ठेवण्यामागे शासन, संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक, पालक आणि प्रकाशक सर्वच जण जबाबदार आहेत. शिक्षकांनी प्रभावी पद्धतीने शिकवावे आणि विद्यार्थ्यांनी ते समजून घ्यावे ही खरे अध्ययन-अध्यापनाची प्रक्रिया आहे. पाठय़पुस्तके ही घरी अभ्यास करण्यासाठी असून शाळेत घेऊन जाण्यासाठी नव्हेत हा विचार दृढ झाला तर आपोआप दप्तराचे ओझे कमी होईल.