१८ वं वरीस मोक्याचं!

>> शिल्पा घोणे, योगतज्ञ

सतत तारेवरची कसरत करणाऱ्या आपण स्त्रियांनी २०१८ साली खऱ्या अर्थाने १८ वर्षांच्या होऊया.

दिवसभर सर्वांसाठी, सर्वांची काळजी घेणारी स्त्री स्वतःकरिता कधी विचार करत नाही. त्यामुळे महिलांनो, नवीन वर्षाची सुरुवात ‘वर्क लाइक ट्वेण्टी ऍण्ड लूक लाइक एटीन’ या संकल्पाने करूया. चला तर शरीराने, मनाने अठरा वर्षीय होऊया.

सगळ्यात आधी स्वतःला न्याहाळा. आंतरबाह्य आरोग्य उत्तम राखणे आवश्यक असते, ते सहज शक्य असते. जसे एखादे वादळ अथवा काही नैसर्गिक आपत्ती येण्याआधी आपल्याला निसर्ग जसा त्यापूर्वी सूचना देतो तसेच आपले शरीरही आपल्याला संकेत देत असते. शेवटी ते पिंडी ते ब्रह्मांडी…या धोक्याच्या सूचनांना दुर्लक्षित करू नका. उदाहरणार्थ हळूहळू वजनाचा काटा वाढणे, सांध्यांची, हाडांची वरचेवर होणारी कुरकूर, शारीरिक क्षमता हळूहळू कमी होणे असे अनेक संकेत आपल्याला आपले शरीर देत असते. वेळीच त्याची दखल घेतली तर उतारवयात अथवा रजोनिवृत्तीच्या काळात ज्या तक्रारींना सामोरे जावे लागते ते बहुतांशी टाळता येईल. यासाठी भगवद्गीतेतील एक श्लोक नमूद करावेसे वाटते, ज्यात तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील.

युक्त आहार विहारस्य
युक्तचेष्टस्य कर्मसु ।
युक्तस्वप्नाव बोधस्य
योगो भवति दुख हा ।।

जी व्यक्ती आपला आहार, विहार, निद्रायोग्य, करमणूक आणि कर्म करण्याच्या सवयीत नियमित असते तो योगाभ्यासाद्वारे सर्व दुखापतीवर मात करू शकते. खरंच आपल्या या सर्व सवयी व योगाभ्यास केला तर आपले जीवन आंतरबाह्य सुलभ, सुरेख होईल यात शंकाच नाही.

आपला दिवस तीन भागांत विभागून घ्यायचा आठ-आठ-आठ. त्यासाठी आठ तास झोप, आठ तास काम, आठ तास कुटुंब, स्वतः, मित्रपरिवार, व्यायाम, पण हेच होणं कठीण असतं. त्याप्रमाणे वेळ देण्याचा प्रयत्न तर करा.

आहार
शक्यतो उत्तम प्रोटिन, जीवनसत्त्वे, खनिजे असलेला आहार घ्यावा आणि दिवसातून चारवेळा खाण्याचे नियोजन करावे. आहारात पन्नास टक्के शिजवलेला व पन्नास टक्के नैसर्गिक परिपक्व झालेला आहार असावा. आपल्याला रुचेल व पचेल तेच खा. रात्रीचे जेवण किमान दोन तास झोपण्याआधी घ्या.दुपारच्या जेवणात हलके जे सहज पचेल असे असावे. जेव्हा आपण आठवडय़ाचा मेनू बनवतो तेव्हा इतरांबरोबर स्वतःचाही विचार आवर्जून करा. लक्षात घ्या,तुम्ही काय खाल? उगीच वाया जाते, राहिलंय म्हणून ते संपवायला हवे असा विचार न करता उरलेल्या अन्नाचे दान करा.

लक्षात ठेवा
– स्वतःच्या व्यायामाकरिता, योगाकरिता जरूर वेळ काढा. किमान रोज एक तास त्यासाठी वेळ द्यायला हवा. यात अर्धा तास प्राणायाम, धारणा, ध्यान याकरिता जरूर ठेवा, पण यात सातत्य असायला हवे. त्याबरोबर हेही लक्षात असायला हवे की, आपली रोजची कामे म्हणजे व्यायाम नाही.

– प्रत्येक गोष्ट सकारात्मक नजरेने पहा. जेव्हा आपण दुखावले जातो, तेव्हा स्वतःला दुखापत करणेच सोडा. आपोआप परिस्थितीत बदल होतो. भूतकाळ व भविष्यकाळापेक्षा वर्तमानात राहून त्याचा आनंद घ्या.शेवटी दुःख, आनंद आपल्या मानण्यावर असते हे विसरू नका. जेव्हा तुम्ही आनंदी असता तेव्हा शरीरांतर्गत व बाह्य अनेक सकारात्मक बदल होत असतात.

– घरातील काम ऑफिसमध्ये नको व ऑफिसचं घरी नको. कारण ही आपल्याकरिता तारेवरची कसरत असते. त्यामुळे सगळ्यात आधी वेळेचे नियोजन करा. आठवडय़ाचे अन्नपदार्थांचे वेळापत्रक बनवा. त्याबरोबरच अन्न, व्यायाम, योगा, कुटुंब, ऑफिसची वेळ या सगळ्याचे नियोजन करा.

– केवळ स्वतःसाठी वेळ जरूर काढा. जो फक्त तुमच्याकरिता असेल. त्यात तुमचा छंद जोपासा, मित्रमैत्रिणींबरोबर बसून अवांतर गप्पा मारा, फिरायला जा. तुम्हाला आवडते ते करा.