लेख – महिला सबलीकरण आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर

>> प्रा. सचिन बादल जाधव

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या देशातील स्त्रियांचे कौटुंबिक आणि व्यक्तिगत जीवन सर्वार्थाने स्वतंत्र केले. त्याचबरोबर समाज पातळीवरही तिच्या प्रश्नांची सोडवणूक केली. स्त्री म्हणून जिथे जिथे तिचे शोषण होते ते सर्व कालबाह्य नियम, कायदे, प्रथा, परंपरा यांना मूठमाती देण्याचे बळ महिलांच्या अंगी येण्यासाठी जे जे करता येईल ते ते त्यांनी केले. हिंदुस्थानी समाज व्यवस्थेत तिचे स्थान अतिशय तळाशी होते. म्हणून तिच्या शोषणाच्या संधीही अधिक होत्या.  बाबासाहेबांनी सगळ्याच क्षेत्रांत महिलांना न्याय मिळवून दिला.

जागतिक महिला दिन दोन दिवसांपूर्वी साजरा झाला. आपल्या देशात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून स्त्री-पुरुष विषमता दूर केली. अर्थात मनामनांतील विषमतेची जळमटं अजूनही समूळ घालवण्यास काही मंडळी तयार नाहीत. त्यांच्या नागरीकरणाची, प्रबोधनाची नवी वाट चोखाळावी लागणार आहे. महिला, दलित आणि आदिवासींना सुरक्षित वाटावं असं वातावरण निर्माण करण्याची गरज आहे. महिलांवरील अत्याचारांची तर परिसीमा दररोज ओलांडली जात आहे.

अत्याचाराला बळी पडणाऱ्या मानवी आणि घटनात्मक हक्कांपासून वंचित राहणाऱ्या महिलांना न्याय मिळवून देण्याची गरज सबंध समाजाची आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजातील सर्वच जाती-धर्माच्या महिलांकडे माणूस म्हणून पाहिले. त्यांच्या सर्व प्रकारच्या हक्कांचा कायम आग्रह धरला. धर्मानं नाकारलेले अधिकार महिलांना मिळावेत म्हणून त्यांनी ‘हिंदू कोड बिल’ यांसारख्या कायद्याचा आग्रह धरला. प्रसंगी आपल्या कायदा मंत्रीपदाचा या कायद्यासाठी राजीनामा दिला. त्यांच्या या कार्यांची माहिती आज विविध क्षेत्रांत सन्मानाने काम करणाऱ्या महिलांनाही नाही.

बाबासाहेबांनी महिलांच्या प्रगतीचा अनेक अंगांनी विचार केला. त्यात महिलांच्या आरोग्याचा विचार करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कुटुंब नियोजनाचा आग्रह धरला. बाबासाहेब याबाबत म्हणतात, “कोणत्याही कारणासाठी का होईना, ज्यावेळी एखाद्या स्त्रीची मूल होऊ देण्याची इच्छा नसेल त्या वेळी तिला गर्भधारणा टाळता येण्याची मुभा असली पाहिजे आणि संतती जन्माला घालणे हे सर्वस्वी तिच्या इच्छेवर अवलंबून असले पाहिजे.’’ यातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची स्त्र्ायांबाबत तळमळ, कारुण्य आणि समज दृष्टिपथास येते.

व्यक्तीचे जीवन दोन प्रकारचे असते एक सार्वजनिक, दुसरे वैयक्तिक. या दोन्ही जीवनात काही समाज मान्यता, परंपरा, धर्म आणि जातीने घालून दिलेले निर्बंध असतात. हे निर्बंध व्यक्तीच्या विकासापेक्षा परंपरा, जाती, धर्माच्या संरक्षणासाठीच अधिक असतात. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हे ओळखून आपल्या देशातील स्त्रियांचे कौटुंबिक आणि व्यक्तिगत जीवन सर्वार्थाने स्वतंत्र केले. त्याचबरोबर समाज पातळीवरही तिच्या प्रश्नांची तितक्याच गांभीर्याने सोडवणूक केली. स्त्री म्हणून जिथे जिथे तिचे शोषण होते ते सर्व कालबाह्य नियम, कायदे, प्रथा, परंपरा यांना मूठमाती देण्याचे बळ महिलांच्या अंगी येण्यासाठी जे जे करता येईल ते ते त्यांनी केले. हिंदुस्थानी समाज व्यवस्थेत तिचे स्थान अतिशय तळाशी होते. म्हणून तिच्या शोषणाच्या संधीही अधिक होत्या. तिच्या कामाला, श्रमालाही मूल्य दिले जात नव्हते. त्यामुळे कामाच्या ठिकाणीही तिचे शोषण होत असे, तिला दुय्यम वागणूक दिली जात असे. बाबासाहेबांनी या सगळ्याच क्षेत्रांत महिलांना न्याय मिळवून दिला.

बाबासाहेबांनी खाणीतील महिला कामगारांच्या प्रश्नांची सोडवणूक केली. त्यांच्याच प्रयत्नांमुळे ब्रिटिश सरकारमध्ये बाबासाहेब मजूर मंत्री असताना स्त्री-पुरुषांना समान वेतन मिळण्याचा कायदा केला. काम करणाऱ्या महिलांना प्रसूतीपूर्व काळात ठरावीक विश्रांती आणि सेवा मिळाली पाहिजे यासाठी कायदे केले. ‘प्रसूतीची रजा’ मंजूर करण्याचाही कायदा केला.

बाबासाहेबांनी स्त्रियांच्या दास्यांचे आणि तिच्या अवनतीचे मूळ शोधून काढले. जातीची जडणघडण आणि स्त्रियांचे शोषण हे एकमेकांशी पूरक असल्याची सैद्धांतिक मांडणीही त्यांनी केली. विवाहाचा हक्क महिलांना असावा, स्वतःचा जोडीदार निवडण्याचा हक्क महिलांना असावा, घटस्फोटाचा हक्क असावा. विवाहानंतरही आई-वडिलांच्या मिळकतीत स्त्रियांना समान हक्क असावा. स्त्रियांना पोटगी, दत्तक विधान, अज्ञानत्व आणि पालकत्व यांचे अधिकार असावेत यासाठी हिंदू कोड बिलात तरतुदी केल्या. या तरतुदीसह नंतर हे हिंदू कोड बिल टप्प्याटप्प्याने हिंदुस्थान सरकारने मंजूर केले. त्यामुळे स्त्रियांच्या हक्कांना कायद्याचं संरक्षण मिळालं.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्त्रियांकडे आर्थिक स्वायत्तता, क्षमता, परिपूर्णता असेल तर ती स्वावलंबी होऊ शकते. स्त्रियांचा आत्मविश्वास वाढतो. आत्मबल वृद्धिंगत होते. त्यातून वर्तमानात जगताना भविष्याचाही साकल्यानं विचार करून त्या प्रगतीची विविध दालनं पादाक्रांत करू शकतात. आर्थिक आणि शैक्षणिक प्रगतीमुळे स्त्रियांना स्वतःचा शोध घेता येईल. त्यातून त्या स्वतःच्या विकासाबरोबरच कुटुंबाचा आणि देशाच्या विकासात भर घालतील. या सर्व प्रक्रियेतून परावलंबित्वातून त्या स्वतःची सुटका करून घेऊन त्यांचा आत्मविश्वास वाढेल, आत्मबल वाढेल असाही मानस बाबासाहेबांच्या विचार आणि कृतीत होता. त्यामुळेच देशातील पन्नास टक्के स्त्रियांना सर्वदृष्टय़ा सक्षम करण्याचे काम बाबासाहेबांनी केलं आहे, असे आपण आज ठामपणे म्हणू शकतो.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रज्ञा, शील आणि करुणा या बुद्धाच्या तत्त्वज्ञानावर असीम प्रेम होते. ‘नीती’ आणि ‘चारित्र्य’ हे केवळ स्त्रियांचा अलंकार आहेत, असे हिंदुस्थानी समाजात मानले जात होते, पण बाबासाहेबांनी ‘नीती’ आणि ‘चारित्र्य’ हे अलंकार पुरुषांनाही आवश्यक आहेत, असे ठामपणे सांगितले. केवळ प्रज्ञा असून चालत नाही, प्रज्ञेबरोबरच शील आणि करुणा स्त्री-पुरुषांच्या अंगी नसतील तर माणूस माणूस राहत नाही असे ते म्हणत.

‘नीतिमान’ आणि ‘चारित्र्यसंपन्न’ नागरिक आपण घडवू शकलो नाही. त्यातूनच ‘स्त्री’ला उपभोग्य वस्तू समजून तिच्यावर अत्याचार करण्याची मानसिकता वाढीस लागली आहे. सार्वजनिक जीवनात नीतीभ्रष्ट, चारित्र्यहीन व्यक्तींना महत्त्व आणि प्रतिष्ठा प्राप्त होत आहे. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे हिंदुस्थानी स्त्रियांच्या आर्थिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक अशा विविध अंगांनी सक्षमीकरण करण्याच्या कार्यातील अग्रणी आहेत. एवढेच नव्हे तर स्त्रीमुक्तीचे तेच खरे प्रणेते आहेत, असे म्हटले तर वावगे ठरू नये.