मुद्दा : परीक्षा तर संपली, पुढे काय?

1

>>स्नेहा अजित चव्हाण

चला परीक्षा तर संपली, पण या सुट्टीत काय करणार आहात ते तरी ठरविले असेलच. येत्या दोन महिन्यांच्या दीर्घ सुट्टीत काही ना काही करायला हवे. जर ठरविले नसेल तर मात्र ठरवाच. किमान या दोन महिन्यांच्या सुट्टीत काय करायचे ते ठरवा.

तुम्हाला कशाचा ना कशाचा छंद असेल तर तो छंद विकसित करण्यासाठी ही सुट्टी घालवा. उदाहरणार्थ चित्रकला, पोहणे, पर्यटन, संग्रह करणे, ऐतिहासिक स्थळांना भेटी देणे, भरतकाम, विणकाम, मातीकाम, कास्ट शिल्पे, काचकाम, अभिनय करणे, वादन, नृत्य करणे, व्यक्तिमत्त्व विकास, संवाद, कौशल्य विकसित करणे किंवा यासारख्या अनेक गोष्टी शिकण्यासारख्या असतात. त्या शिकण्यासाठी नियोजन करा. कोणाकडून हे शिकायचे आहे त्याची माहिती काढा. त्यांची भेट घेऊन त्याबद्दलची सखोल माहिती घ्या. त्या विषयात प्रावीण्य असलेल्या व्यक्तीकडून मार्गदर्शन घ्या. त्यातील बारकावे समजवून घ्या. घरातल्यांना मी छंद जोपासणार आहे हे समजून सांगा. त्यासाठी लागणारा कालावधी, पैसा किती खर्च येणार ते सांगा. शिका, पण वेळ वाया घालवू नका. या सुट्टीचा फायदा घेऊन स्वतःचे आत्मपरीक्षण करा. आपण आपला स्वअभ्यास करीत असताना तुम्हाला तुमच्या आवडीच्या विषयातील करीयरची माहिती मिळवणे गरजेचे आहे.

जे करीअर निवडाल त्यातले जाणकार बनण्याचा पूर्ण प्रयत्न करा. प्राधान्य कशाला द्यायचे ते ठरवा. ज्यामध्ये तुम्हाला करीअर करता येईल अशा 10 विद्याशाखांची यादी तयार करा. यादी तयार झाल्यावर त्यातून आणखी शॉर्ट लिस्ट करीत करीअरचे तीन पर्याय निवडा. तुम्ही शॉर्ट लिस्ट तयार केलेल्या करीअरच्या बाबतीत अधिक माहिती मिळविण्यास सुरुवात करा. हे करीत असताना त्या क्षेत्रात कोणते अभ्यासक्रम आवश्यक आहेत, हे अभ्यासक्रम कोणकोणत्या महाविद्यालयांत किंवा विद्यापीठांत उपलब्ध आहेत याची माहिती मिळवा. ही माहिती मिळवल्यानंतर त्या क्षेत्रात काम करणाऱ्यांच्या भेटी घेऊन प्रत्यक्ष ते काम करीत असताना कोणकोणत्या अडचणींना सामोरे जावे लागते याचीही माहिती घ्या आणि त्यानंतर तुम्ही करीअर निवडीचा योग्य निर्णय घ्या. केवळ एखाद्या क्षेत्राला समाजात चांगली पत आहे म्हणून त्या क्षेत्रात करीअर करण्याचा निर्णय घेऊ नका. करीअर निवडात तुमची आवड व क्षमता महत्त्वाची ठरते.

यासाठी प्रथम स्वतःची बौद्धिक क्षमता, अभिरुची, अभियोग्यता, स्वभाव वैशिष्टय़े, शारीरिक व मानसिक कुवत जाणून घ्या. उदा. संगणकाचे आकर्षण, संगणकाची भाषा शिकण्यामागचा फरक समजल्यावर त्याचा ध्यास घेणाराही नेमका निर्णय घेऊ शकता.

यापेक्षा आगळेवेगळे करायचे असेल तरीही मार्गदर्शन घेऊन काम करा. गरज पडली तर समुपदेशकाची मदत घ्या. परीक्षांचा अभ्यास करायचा असेल तर कोणत्या परीक्षा भावी आयुष्यात देणार आहात, त्याचे स्वरूप काय असेल त्यावर विचार करा. आपले ध्येय काय आहे त्यानुसार पुढचा मार्ग निवडा. काहींना असे वाटते की, सुट्टी म्हणजे रिकामटेकडेपणा, पण तसे काही नसते हे नेहमी लक्षात ठेवा. असे म्हणतात की, रिकाम्या वेळेत आपण जे करीत असतो तसे आपण घडत असतो.

(करीअर समुपदेशक)