मराठी लेखकांची व्यवहारनिरक्षरता

1

>> प्रतीक पुरी

पुस्तकं ही आता पैसा कमावण्यापेक्षा प्रतिष्ठा किंवा प्रसिद्धी कमावण्याचा एक मार्ग झाली आहेत. त्यातूनच वाङ्मयचौर्याचाही प्रश्न उपजला आहे. संशोधनपर साहित्यात तर सर्रास वाङ्मयचौर्य केलं जातं. इंटरनेटवर मुबलक प्रमाणात साहित्य उपलब्ध असल्यानं तिथून सरळ उचलेगिरी करण्याचे प्रकार मराठीत नवीन नाहीत, पण हे प्रकार उघडकीसही येतात. कारण इंटरनेटवर खोटंदेखील फार काळ टिकू शकत नाही. तरीदेखील वाङ्मयचौर्य काही थांबलेलं नाही.

जागतिक पुस्तक दिन आणि स्वामित्व हक्क दिन म्हणून 23 एप्रिल हा दिवस जगभर साजरा केला जातो. त्यानिमित्तानं मराठी साहित्य व्यवहारातील काही गोष्टींवर प्रकाश टाकणे हा या लेखाचा उद्देश आहे. मराठी साहित्य व्यवहार हा बहुधा व्यावसायिकतेपेक्षा भावनेवरच केला जात असतो. त्यात विश्वास ही एक अटळ भावना असते. विश्वासाच्या जोरावर केल्या जाणाऱया या व्यवहारांमध्ये सहसा लेखकांचीच फसवणूक होत असते, तर कधी प्रकाशक आणि अन्य घटकांचीही फसवणूक होते. लेखकांची फसवणूक मोठय़ा प्रमाणात होते. कारण लेखक होण्याचा त्यांचा उत्साह त्यांना नडतो. येनकेनप्रकारेण आपल्या नावावर एखादं पुस्तक प्रसिद्ध व्हावं आणि आपण लेखक व्हावं ही अनेकांची इच्छा असते. त्यामुळे त्याचा लाभ उठवणारे प्रकाशकही असतात. हे हौशी लेखकही त्यांच्या भूलथापांना बळी पडतात आणि कोणतीही खबरदारी न घेता त्यांच्याशी व्यवहार करतात. त्यानंतर जेव्हा त्यांची फसवणूक होते तेव्हा ते त्याचा दोष प्रकाशकांवर ढकलतात, पण यातून ते काही धडा शिकतात का, तर नाही. कारण लेखक होण्याची हौस त्यांना स्वस्थ बसू देत नाही. त्यामुळे नवोदित लेखकांसाठी या काही सूचना आहेत.

– लेखक होणं ही एक गंभीर प्रक्रिया आहे. त्याचा आदर करा आणि आपल्या अतिउत्साहाला आवर घाला.
– पुस्तक प्रकाशनासाठी प्रकाशक निवडताना आधी थोडा अभ्यास करा, जाणत्यांना विचारा आणि पुस्तकाच्या विषयानुसार प्रकाशनाची निवड करा.
– प्रकाशकांकडे जाताना सर्व तयारी करून जा. तुमच्या लिखाणाची संपूर्ण, सुव्यवस्थित अशी स्थळप्रत, पुस्तकाविषयीचे एक सुस्पष्ट व थोडक्यात टिपण तयार करा.
– प्रकाशन व्यवहार करताना करार होईल याची काळजी घ्या. त्यावर सही करण्याआधी तो नीट वाचून घ्या. सर्व गोष्टी आधीच नीट समजून घ्या, नंतर वाद घालण्यात काहीच अर्थ नसतो.
– तुमचं पुस्तक चांगलं असेल तर त्यासाठी प्रकाशक मिळेलच, पण तुम्हीही उगाच कोणत्याही पुस्तकासाठी प्रकाशकाला पिडू नका. शेवटी हा एक व्यवसाय आहे आणि प्रकाशकांनीही त्यांची एक बाजू असते.

मराठीत सध्या हौशी लेखक मोठय़ा प्रमाणावर वाढले आहेत. त्यांच्याकडे पैसाही आला आहे. त्यामुळे कोणा प्रकाशकानं पुस्तक छापलं नाही तर स्वतःच पैसा खर्च करून पुस्तकं काढली जातात, पण याचा एकूण साहित्य व्यवहाराच्या गुणवत्तेवर परिणाम होत असतो. पुस्तकं ही आता पैसा कमावण्यापेक्षा प्रतिष्ठा किंवा प्रसिद्धी कमावण्याचा एक मार्ग झाली आहेत. त्यातूनच वाङ्मयचौर्याचाही प्रश्न उपजला आहे. संशोधनपर साहित्यात तर सर्रास वाङ्मयचौर्य केलं जातं. इंटरनेटवर मुबलक प्रमाणात साहित्य उपलब्ध असल्यानं तिथून सरळ उचलेगिरी करण्याचे प्रकार मराठीत नवीन नाहीत, पण हे प्रकार उघडकीसही येतात. कारण इंटरनेटवर खोटंदेखील फार काळ टिकू शकत नाही. तरीदेखील वाङ्मयचौर्य काही थांबलेलं नाही. अगदी ललित साहित्यातही हे प्रकार मोठय़ा प्रमाणात घडतात. विशेषतः कथालेखनाच्या बाबतीत हे प्रकार जास्त घडतात. दिवाळी अंकांमध्ये इतरांच्या कथा आपल्या नावावर खपवण्याची एक जुनी लज्जास्पद परंपरा आपल्या इथे आहे. मूळ लेखकाला श्रेय न देणं, त्याच्या कथा आपल्या आहेत असं रेटून सांगणं हे नेहमीच घडतं. पूर्वी हे प्रकार उघड होत नव्हते किंवा झाले तरी मूळ लेखकापर्यंत पोहोचणं कठीण होतं. सध्या हे प्रकार उघड होण्याचं प्रमाण वाढलं असलं आणि मूळ लेखकापर्यंत पोहोचता येत असलं तरीही तो लेखक (ती लेखिका) किंवा त्याचा / तिचा प्रकाशक यात जास्त लक्ष घालत नाही. कारण आर्थिकदृष्टय़ा ते परवडत नाही. त्यामुळे या लेखक चोरांचं फावतं. मग यावर उपाय काय? तुमची नैतिकता, तुमचा प्रामाणिकपणा हाच यावरचा उपाय आहे. तुम्ही जर तुमच्या लिखाणाशी, वाचकांशी व स्वतःशी प्रामाणिक असाल तर असले लज्जास्पद प्रकार तुम्ही कधीच करणार नाहीत. एरवी हे होतच राहील आणि त्यावर कायदेशीर कारवाईही शक्य नसल्यानं या चोर लेखकांचं फावत राहील.

आपलं साहित्य या वाङ्मयचौर्यातून वाचवायचं असेल तर काय करावं हा मग आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे. सामाजिक माध्यमांमुळे आजकाल कोणीही आपलं लिखाण तिथे टाकतो आणि मग काही दिवसांनी ते भलत्याच नावानं त्याच्याकडेच परत येतं. त्यावर मग काही काळ गवगवा होतो आणि सारा प्रकार विसरला जातो. कारण मुळात त्या साहित्याची लायकीच नसते, पण तुम्ही जर काही गंभीर लिखाण केलं असेल – त्यातही नाटक किंवा एखादी कथा, कादंबरी ज्यावर चित्रपट, मालिका होण्याची शक्यता असते- अशा वेळी तुमच्या लिखाणाच्या स्वामित्व हक्काविषयी तुम्ही सावधगिरी बाळगायला हवी. तुमच्या साहित्याचे स्वामित्व हक्क तुम्हाला नवी दिल्लीतील स्वामित्व हक्क कार्यालयात नोंदवता येऊ शकतात. इंटरनेटवर त्याची सविस्तर माहिती तुम्हाला मिळू शकते. दुसरं म्हणजे तुमच्या स्वतःकडेही त्याचे ऑनलाइन पुरावे ठेवणे. एखाद्याला सॉफ्ट कॉपी पाठवताना, वर्ड फाईलवर तुमचा वॉटरमार्क टाकणं, इ मेल्समध्ये तुमच्या नावाचा, तारखांचा, विषयांचा सविस्तर उल्लेख करणं आदी गोष्टी संभाव्य फसवणुकीतून तुम्हाला वाचवू शकतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हुरळून न जाता, योग्य विचार करून जर निर्णय घेतला तर भविष्यातील फसवणूक तुम्ही नक्कीच टाळू शकता.

लिखाण ही एक गंभीर कृती आहे आणि लिखित शब्द हे कायम टिकतात. त्यामुळे आपण काय लिहितो, कसं लिहितो, त्याचे पुढे काय व कसे परिणाम होणार आहेत याचा संबंधित लेखकानं कायम विचार करावा. त्याच्या लिखाणात व व्यवहारातही जर व्यावसायिकता असेल आणि त्यानं तोच आग्रह समोरच्याकडूनही धरला तर त्याची फसवणूक होण्याची शक्यता कमी असते. आजच्या जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्तानं साहित्य व्यवहारातील सर्वांना व्यावसायिकतेची लागण होवो या शुभेच्छा!