ग्रंथोत्सव

1

>> नमिता वारणकर

येत्या 23 तारखेला जागतिक पुस्तक दिन आहे. आज अनेक मनोरंजनाची साधने आली असली… अगदी इ पुस्तके आली असली तरी हातात पुस्तक घेऊन वाचण्याचा आनंद निराळाच असतो.

आजूबाजूच्या जगाशी ओळख करून देऊन माणसाचं आयुष्य समृद्ध करतात ती पुस्तकं… व्यक्तीच्या जीवनात आनंद फुलवतात… पुस्तकांच्या सहवासात मनाला धीर मिळतो, शब्दसंपदा वाढते. वाचन ही कला असून यामुळे सकारात्मक दृष्टी, दूरदृष्टी, जिज्ञासूपणा, आनंदी वृत्ती, ज्ञानात भर असे अनेक फायदे होतात. लहानांपासून मोठय़ांपर्यंत पुस्तक हा जिव्हाळ्याचा विषय… आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलवणारी, विचारांना समृद्ध करण्याऱया, मनावरचा ताण कमी करणाऱया, पुस्तकांचे जग मात्र आज बदलत आहे. वाचनालयाची जागा मोबाईल, ई-बुक, किंडल यांनी घेतली आहे. अनेक ऑनलाईन साईट्सवरही विविध विषयांवरील पुस्तके मोठय़ा प्रमाणात उपलब्ध आहेत. पुस्तकांचा हा प्राचीन इतिहास हस्तलिखितांपासून सुरू झालेला आहे. त्यामुळे हस्तलिखितं ते आजची पुस्तक यांमध्ये कालानुरुप अनेक बदल झाले आहेत.

पुरातन संस्कृतीत लेखनासाठी दगड, माती, झाडांची साल, धातूचे पत्रे इत्यादींचा वापर होत असे. भूर्जपत्र किंवा ताडपत्रावर हस्तलिखिते म्हणजे हाताने ग्रंथ लिहिले जात असत. अशा ग्रंथांच्या संग्रहाला सरस्वती भांडागार म्हटले जाते. ताडपत्राची ओलसर पाने प्रथम कोरडी करून मग आवश्यक त्या आकारात कापून घेत. त्यावर लिहायचा मजकूर अणकुचीदार पदार्थाने कोरून घेत. छपाई यंत्राचा शोध लागण्यापूर्वी सर्व पुस्तके हाताने लिहिली जात असत. त्यानंतर बदलत्या काळानुसार पुस्तकांच्या छपाईत ऑफसेट लिथोग्राफी, वेब प्रेस, शीट फेड प्रेस, डिजिटल छपाई असे अनेक नवनवे बदल होत गेले.
सध्या बाजारात येणाऱया नव्या पुस्तकांच्या वाढत्या मागणीविषयी मॅजेस्टिकचे वितरक आशय कोठावळे सांगतात, व्यक्तिमत्त्व विकास, व्यवस्थापनशास्त्र, या पुस्तकांचा खप जास्त असला, तरी यापेक्षा वेगळ्या म्हणजे इस्त्रायलची मोसाद, टेड टॉक्स, रॉ, गांधीनंतरचा भारत अशी काही गुप्तहेर संघटना, राजकीय, अनुवादित पुस्तकांची मागणी मोठी आहे. वेगळे, अनोखे विषय लोकांना आवडतात. त्याशिवाय बेस्ट सेलरमध्ये पु. ल. देशपांडे, जयवंत दळवी, व.पु. काळे, गो. नी. दांडेकर, अनंत नाडकर्णी, कृष्णाजी बाम, विश्वास पाटील, दुर्गराज भागवत, अनिल अवचट, सुधा मूर्ती या लेखकांची पुस्तके वाचली जातात.

बऱयाचदा असं म्हटलं जातं की, वाचन कमी होतंय. तर असं म्हणू शकत नाही. कारण पुस्तकांची संख्या महिनोन् महिने वाढतेय. प्रकाशक नवनवीन पुस्तकं प्रकाशित करत आहेत. ते विकली जातायत. वाचली जातायत. वाचनसंस्कृती कमी झाली असती तर पुस्तकांचं प्रमाण कमी झालेलं दिसलं असतं.ललित मासिकात महिनाभरात प्रकाशित झालेल्या पुस्तकांची यादी असते. तेवढी पुस्तकं महिन्याभरात दुकानात येतात. कुठे ना कुठे मागणी आहे म्हणूनच पुरवठा होत आहे. सध्या अनुवादित पुस्तकांचं प्रमाण जास्त आहे. एखादं पुस्तक बेस्ट सेलर झालं की, ते तीन महिन्यांत अनुवादित होऊन विक्रिला येतं, असं त्याचं म्हणणं आहे.

पुस्तकांच्या प्रसिद्धीसाठी…
उत्पादनाची गुणवत्ता सुधारतेय. यामुळे पुस्तकांची निर्मिती चांगली होतेय. प्रकाशक पूर्वीपेक्षा जागरूक झाले आहेत. पुस्तकांच्या प्रसिद्धीसाठी प्रकाशकांनी स्वतंत्र मासिक सुरू केलय. त्यात पुस्तकाचा विषय कसा ठरला आणि ते पुस्तक छापल्यानंतर दुकानात येईपर्यंत काय प्रक्रिया झाली या विषयावर प्रकाशक लिहू लागले आहेत.

खरेदी पद्धत आणि वाचनाचे अनेक पर्याय
खरेदी पद्धत आणि वाचनांच्या अनेक पर्यायांविषयी त्यांचे मत आहे की, पुस्तक वाचनासाठी ऍप, ई-बुक, ऑडियो बुक, किंडल असे अनेक पर्याय आहेत तसेच खरेदीसाठीही ऍमेझॉन, फ्लिपकार्ट, बुकगंगा, ग्रंथद्वार, अक्षरधारा, मायबोली, रसिकसाहित्य असे अनेक पर्याय असले तरीही ई-बुक वाचनाचं प्रमाण मराठीत खूपच कमी आहे. कारण ती वाचण्यासाठी माणूस टेसॅव्ही हवा. आताची पिढी मोबाईलवर वाचण्यास सराईत आहे. पुढे ती ई-बुक्सच वाचेल. शिवाय ग्रंथदालनात पुस्तक बघन, चाळून आनंद घेत विकत घेता येतात, मात्र यासाठी ज्यांना वेळ नाही ते ऑनलाईन खरेदी करणं पसंत करतात. यामुळे खरेदीची पद्धत बदलतेय. रिटेलपेक्षा ऑनलाईन पुस्तकं जास्त खरेदी केली जाती, असे असले तरीही पुस्तकांच्या प्रत्यक्ष खरेदीवर याचा काहीही परिणाम होत नाही.

[email protected]