प्रासंगिक – दूधः अमृततुल्य अन्न

>> डॉ. अनिता जिंतूरकर

1  जून हा दिवस जागतिक दुग्ध दिन म्हणूनही साजरा केला जातो तो दुधाचे महत्त्व जगाला सांगण्यासाठी! हा दिवस फूड आणि कल्चर ऑर्गनायझेशनने सुरू केला होता. या दिवशी दुधासोबतच दुधापासून तयार होणाऱ्या अन्य पौष्टिक पदार्थांबाबत लोकांना जागरुक केले जाते. दूध प्राचीन काळापासून पौष्टिकतेची खाण मानलं गेलंय. दूध प्यायल्याने एकच लाभ होत नाही तर असंख्य लाभ होतात. ऋषी मुनींच्या काळापासून चांगल्या स्वास्थ्यासाठी दुधाचे सेवन केले जात आहे. आजही गावाच्या ठिकाणी गायीचं ताज दूध काढून पिणे अतिलाभदायक मानले जाते. दुधामध्ये जीवनसत्त्व, खनिज पदार्थ आणि शरीराला मजबूत करणारे अनेक पोषक तत्त्वे असतात.

दूध हे आपल्या आहाराचा मुख्य घटक आहे. पूर्वीच्या काळापासून भारतीय संस्कृतीत दुधाला महत्त्व दिले जाते. दूध व दुधाचे पदार्थ हे सर्व पूजा-अर्चना, नैवेद्य यात वापरले जातात. आहारशास्त्रात दूध व दुधाच्या पदार्थाना ‘संपूर्ण आहार’ असे म्हणतात. याचे कारण असे की, नवजात शिशू आपल्या आयुष्याचे पहिले सहा महिने फक्त दुधावरच अवलंबून असतो. दूध व दुधाचे पदार्थ शाकाहारी अन्नातील मुख्य घटक आहेत. दुधात प्रथिनांचे प्रमाण जास्त आहे. यातील प्रथिने डाळी, कडधान्ये यांच्यातील प्रथिनांपेक्षा उच्च दर्जाची असतात. शाकाहारी अन्नात प्रथिनांचे प्रमाण फार कमी असते. त्यामुळे दूध व त्याचे पदार्थ ही उणीव भरून काढतात. दुधातील प्रथिने उच्च दर्जाची असल्यामुळे शरीराची वाढ, तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्याचबरोबर दुधात कॅल्शियम व डी जीवनसत्त्व असते. दुधामधील कॅल्शियमचा आपल्या हाडांना खूप फायदा होतो. दुधामध्ये लॅक्टोज नावाची साखर-कर्बेदके असतात. या साखरेमुळे दुधाला गोडी येते. साखर न घालता दूध घेतले तरीही त्याला एक नैसर्गिक गोडवा असतो. हा गोडवा लॅक्टोजमुळे येतो.

नवजात अर्भकासाठी दूध हे पोषक अन्न आहे. नवजात दूध इतर पदार्थांचे सेवन करण्यास अक्षम होईपर्यंत ते दुधावर अवलंबून असते. साधारणतः दुधात सुमारे 87 टक्के पाणी आणि 13 टक्के घन पदार्थ आहे. उर्वरित भागात घन घटक असतात म्हणजेच खनिजे आणि चरबी असतात. गाय व म्हशीव्यतिरिक्त विविध कंपन्यांचे पॅकेज्ड दूधही बाजारात उपलब्ध आहे. दुधामध्ये प्रथिने, कॅल्शियम आणि राइबोफ्लेविन (व्हिटॅमिन बी -2) तत्त्व असते, त्याशिवाय फॉस्फरस, मॅग्नेशियम, आयोडीन आणि जीवनसत्त्वे अ, डी, के आणि ई यासह अनेक खनिजे आणि चरबी आणि ऊर्जा असते. दुधातील हे पोषक घटक ते निसर्गाचे सर्वात परिपूर्ण अन्न बनविण्यास मदत करतात.

दुधामधील केसीन रेणूबरोबर कॅल्शियम फॉस्फेटचे रेणू बद्ध असल्याने केसीनच्या अन्ननलिकेतील पचनाबरोबर कॅल्शियम फॉस्फेटचेसुद्धा शोषण होते. दूध हा आपल्या आहारातील महत्त्वाचा कॅल्शियमचा स्रोत बनला आहे. दुधामधील प्रथिने आणि मेदाम्लामुळे लहान मुलांचे पोषण होते. लॅक्टोज या दुधातील शर्करेचे काहीं बालकामध्ये विकराच्या अभावामुळे पचन होत नाही. अशा बालकांना दुधाऐवजी सोयाबीनपासून बनवलेले ‘दूध’ दिले जाते. दूध हे पूर्णअन्न आहे हीसुद्धा समजूत पूर्णपणे खरी नाही. दुधामध्ये लोह नसते. त्यामुळे केवळ दुधावर अवलंबून असलेल्या बालकामध्ये लोहाची कमतरता आढळते. दूध हे पूर्ण म्हणून त्याचा आहारात नियमितपणे वापर केला जातो. लहान मुलांसाठी तर दूध हे पूर्णान्न आहे.

आपली वजनवाढ नियंत्रित ठेवण्यासाठी दररोज दुधाचं सेवन करणे गरजेचं आहे. दूध प्यायल्यामुळे लहान मुलांचं वजन वाढत नाही.

हाडांच्या मजबुतीसाठी दुधामध्ये मोठय़ा प्रमाणावर घटक आहेत. कॅल्शियम, फॉस्फरस, जीवनसत्त्वे, मॅग्नेशियम हे सर्व घटक हाडांच्या विविध विकारांवर महत्त्वाची भूमिका गाजवतात. त्यामुळे हाडे जर व्यवस्थित टिकवायची असतील तर दररोज दूध सेवन करणं गरजेचे आहे. त्यामुळे आपल्या हाडांचं आरोग्य व्यवस्थित राहील.

दूधामध्ये असलेली प्रथिने, कॅल्शियम, जीवनसत्त्व ब, ड, पोटॅशियम फॉस्फरस, मॅग्नेशियम अँटी ऑक्सिडेंट हे घटक आपली हाडे आणि दात मजबूत करण्यासाठी उपयुक्त   आहेत. लॅक्टोजमुळे दुधाला गोडी येते. त्यामुळे मधुमेह व्यक्तीसाठी दूध फायदेशीर आहे.

हृदय व्यवस्थित तर शरीर व्यवस्थित. त्यासाठी दुधाचं सेवन करणे गरजेचे आहे. दुधामध्ये पोटॅशियम असतं. रक्तदाब संतुलित राखला जातो. त्यामुळे हृदयाच्या संबंधित आजार असतील तर ते दूध दररोज प्यायल्यामुळे कमी होतील. दुधामध्ये आरोग्य व्यवस्थित राहण्यासाठी खूप सत्त्व आहे. त्यामुळे दूध आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे. दूध प्यायल्यामुळे आपले शरीर स्वस्थ राहू शकतो.

जगभरामधे दूध व दुग्धजन्य पदार्थांचा वापर एक अन्नपदार्थ म्हणून केला जातो. मनुष्यप्राणी फार पूर्वीपासून दुधाचे सेवन करत आला आहे. त्यासाठी खास दूध देणारे प्राणी पाळण्यात येतात. दुग्धोत्पादनासाठी प्रामुख्याने गायी पाळण्यात येतात. त्या खालोखाल शेळी, मेंढी, म्हैस या प्राण्यापासून दूध मिळवले जाते. दुग्धोत्पादनासाठी भौगोलिकतेप्रमाणे उपलब्ध प्राणी जसे उंट, याक, मूस आदींचाही वापर केला जातो. कमी अधिक प्रमाणात घोडा, गाढव, रेनडियर, झेब्रा या प्राण्यांपासून दुग्धोत्पादन होते. मानवी आयुष्यात अशा प्रकारे दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचे आरोग्याच्या दृष्टिकोनातून महत्त्व आहे.